
Chandrapur News: केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलजीवन मिशनकडे निधीअभावी चंद्रपूर जिल्ह्यात कंत्राटदारांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे बंद असलेल्या योजनांचा फेरनिविदा काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये जवळपास पन्नासहून अधिक कामांचा समावेश असल्याची माहिती आहे.
‘हर घर जल’चा नारा देत केंद्र शासनाने जलजीवन मिशन हा उपक्रम २०१९ मध्ये हाती घेतला. केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलजीवन मिशनसाठी केंद्र आणि राज्य शासनाने भरीव निधीची तरतूद केली. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशनअंतर्गत १६८४ कामे घेतली.
कामांची संख्या जास्त होती. निविदा प्रक्रियेत जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील कंत्राटदारांचा समावेश होता. जलजीवन मिशनची कामे २०२४ मध्ये पूर्ण करावयाची होती. त्यामुळे सुरुवातीपासून कंत्राटदारांना कामाच्या टप्प्यानुसार निधी देण्यात आला. त्यामुळे कामे वेगात सुरू होती. सध्या जिल्ह्यातील १००५ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत.
८३३ योजनांमधून पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून केंद्र शासनाकडून एक रुपयाही जलजीवन मिशनला मिळाला नाही. हीच परिस्थिती राज्य शासनाची आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूक कालावधीत विविध योजना राज्य सरकारने सुरू केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी योजनांकडे वर्ग करण्यात आला.
नियमित योजनांना निधी मिळणे कठीण झाले. निधीच मिळत नसल्याने जलजीवन मिशनची जिल्ह्यातील अनेक कामे गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. कंत्राटदारांना वारंवार सांगून ते काम करण्यास फारसे उत्सुक दिसत नाही. ग्रामपंचायतींकडूनही जिल्हा परिषदेला या कामांच्या फेरनिविदा काढण्याची मागणी सातत्याने होत आहे. कामे ठप्प असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेनेही आता याची गंभीर दखल घेतली आहे. बंद असलेल्या योजनांच्या फेरनिविदा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे.
दादापूर, धानोलीपासून सुरुवात
वरोरा तालुक्यातील दादापूर आणि धानोली येथील पाणीपुरवठा योजनेचे काम के. एम. देव यांना देण्यात आले होते. दादापूर येथील कामाचा कार्यारंभ आदेश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २७ ऑक्टोबर २०२२ रोजी दिला. या कामाची मुदत २६ नोव्हेंबर २०२३ अशी होती. धानोली येथील कामाचा कार्यारंभ आदेश ३१ जानेवारी २०२३ रोजी देण्यात आला.
त्याची काम करण्याची मुदत ३० मे २०२४ होती. सध्या या दोन्ही गावांतील कामे ७० टक्के पूर्ण झाली आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ही दोन कामे कंत्राटदारांनी बंद केली आहेत. ही काम करण्याबाबत अनेकदा कंत्राटदाराला सूचना देण्यात आल्या.
मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. मागील सहा महिन्यांपासून ही दोन्ही कामे बंद आहेत. या कामांची फेरनिविदा करण्याची मागणी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे केली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही या दोन्ही कामांची फेरनिविदा करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आता या दोन्ही कामांच्या फेरनिविदा निघणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.