Indian Politics Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Politics : दिल्ली किती जवळ किती दूर?

Team Agrowon

सुनील चावके

Politics of Maharashtra Vidhansabha : शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा पार पडला. तीन दिवसांच्या दिल्ली वास्तव्यात त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत कोणकोणत्या राजकीय आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, याचा त्यांना अंदाज आला असेल.

यंदा महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनेही निर्णायक ठरणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी करणारी महाविकास आघाडी भक्कम आणि एकजूट असल्याचा संदेश उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीने दिला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केल्यापासून उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे हेही सत्ताधाऱ्यांचे लक्ष्य ठरले.

त्यांच्यातील हे साधर्म्य त्यांची दिल्लीच्या राजकारणाशी नाळ जोडण्यात नकळत हातभार लावणारे ठरले आहे. २०१९नंतर उद्धव ठाकरे यांची ही तिसरी दिल्लीभेट ठरली.

दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्यावर भर दिला. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना ते स्वतः जाऊन भेटले. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि दिग्विजय सिंह तसेच खासदार छत्रपती शाहू महाराज, रजनी पाटील, विशाल पाटील, नीलेश लंके तसेच विश्‍वजित कदम, जितेंद्र आव्हाड ही राज्यातील नेतेमंडळी त्यांच्या भेटीसाठी आली.

तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, आम आदमी पार्टीचे संजय सिंह आणि राघव चढ्ढा, समाजवादी पक्षाचे आदित्य यादव त्यांना इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी म्हणून भेटले.

गेल्या दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना-उबाठा पक्षाच्या आमदार अपात्रता आणि पक्ष व चिन्ह प्रकरणांविषयी कपिल सिब्बल यांच्याशी त्यांनी बातचीत केली. पाच महिन्यांपासून तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांची भेट घेतली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी सहकुटुंब दीड तास व्यतीत केला. उद्धव ठाकरेंशी संवाद साधणारे धनखड केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या गोटातील एकमेव व्यक्ती ठरले.

दिल्लीच्या राजकारणाशी उद्धव ठाकरे यांचे संबंध प्रस्थापित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने ‘१०,जनपथ’ आणि ‘सहा, जनपथ’पाठोपाठ संजय राऊत यांचे ‘१५, सफदरजंग लेन’ निवासस्थान हेही राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र बनले आहे. याच ‘१५,सफदरजंग लेन’ बंगल्याशी कॉमन वॉल असलेल्या ‘सात, सफदरजंग रोड’ बंगल्याला वीस वर्षांपूर्वी स्व. प्रमोद महाजन यांच्यामुळे राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान लाभले होते.

महाजन यांच्याप्रमाणेच आक्रमक भाषाशैलीने दिल्ली आणि महाराष्ट्रातील प्रसिद्धिमाध्यमांना आकर्षित करून घेण्याचे काम संजय राऊत करीत आले. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात भाजपवगळता सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांशी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करुन संजय राऊत यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांचे दिल्लीतील महत्त्व अबाधित ठेवले आहे.

शिवसेना-भाजप युतीच्या काळात जागावाटप आणि समन्वयावरून उद्धव ठाकरे यांचे प्रमोद महाजनांसोबत खटके उडायचे. त्या वेळी उद्धव ठाकरेंना ‘सात, सफदरजंग रोड’ बंगल्यात येण्याची कधी गरजही पडली नव्हती. पण बदललेल्या राजकीय परिस्थितीत दिल्लीत मोर्चेबांधणी करताना त्यांच्यासाठी शेजारचा ‘१५, सफदरजंग लेन’ बंगला उपयुक्त ठरला. उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी येऊन शरद पवार यांनीही या बंगल्याचे महत्त्व वाढवले.

उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीभेटीत महाविकास आघाडीतील जागावाटपाचे सूत्र ठरले नसले तरी त्या दृष्टीने तिन्ही पक्षांमध्ये सामंजस्य आणि समन्वय निर्माण होण्यात त्यामुळे हातभार लागला आहे. महाविकास आघाडीत कोणीही मोठा आणि धाकटा भाऊ नसेल, असे विधान त्यांनी केले. पण जागावाटपाच्या बाबतीत मित्रपक्षांना झुकते माप न देता ‘हार्ड बार्गेनिंग’ करणे हा उद्धव ठाकरे यांचा २५ वर्षांपासूनचा राजकीय स्वभाव बनला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही त्याची झलक दिसली. मात्र विधानसभा निवडणुकीत सांगलीची पुनरावृत्ती होऊन आघाडीतील सौहार्दाला धक्का बसणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. लोकसभा निवडणुकीत नऊ जागा जिंकताना कळत-नकळत झालेल्या चुका दुरुस्त करण्यावर त्यांना भर द्यावा लागेल.

त्यांच्या पक्षाला वर्षभर आधी मिळालेली ‘मशाल’ महाराष्ट्राच्या जनमानसात पुरतेपणाने पेटली नाही. शरद पवार यांच्या पक्षाने ‘घड्याळ’ गमावल्यानंतर ‘तुतारी’ चिन्हाचा अल्पावधीत, प्रभावीपणाने कसा प्रचार केला, याचा अभ्यास त्यांना करावा लागेल.

मुख्यमंत्रिपदावरील दावे-प्रतिदावे

‘‘पाच वर्षांपूर्वी आपण मुख्यमंत्री होऊ असा स्वप्नातही विचार केला नव्हता. पण आलेली जबाबदारी पार पाडण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. आपण मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केले, असे सहकारी पक्षांना वाटत असेल तर मुख्यमंत्री म्हणून मी हवा की नाही, हे त्यांनाच विचारा,’’ असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

मुख्यमंत्रिपदासाठी आपण इच्छुक असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले असले तरी लोकसभेच्या १३ जागा जिंकून राज्यात अव्वल क्रमांकावर पोहोचलेल्या काँग्रेसलाही मुख्यमंत्रिपद खुणावते आहे. लोकसभा निवडणुकीत ‘स्ट्राइक रेट’च्या बाबतीत आपल्या सहकारी आणि प्रतिस्पर्धी पक्षांना चकित करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पुन्हा त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास तो पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी बघ्याच्या भूमिकेत राहणार नाही.

अशा स्थितीत मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार, हे तिन्ही पक्षांच्या संख्याबळावर अवलंबून असेल. बंद दारामागच्या चर्चेतून मुख्यमंत्रिपद निश्‍चित होईल. पण त्यासाठी आधी महाविकास आघाडीला सत्तेत यावे लागेल.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीपेक्षाही परस्परपूरक ठरणारा समन्वय आणि एकजूट वाढविण्यावर भर द्यावा लागेल. जागावाटपात उद्धव ठाकरेंना काँग्रेसशी स्पर्धा करावी लागेल, हे उघडच आहे. राहुल गांधी कदाचित त्यांना काँग्रेसपेक्षा जास्त जागा देतीलही.

पण निकालाअंती काँग्रेसचे संख्याबळ जास्त भरून मुख्यमंत्री कोणाचा हा प्रश्‍न आला तर त्यात तडजोड करतील असे वाटत नाही. कारण महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात सर्व बड्या नेत्यांचा विरोध असूनही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राहुल गांधी यांचे लाडके ठरले आहेत. परिणामी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे संख्याबळ तुल्यबळ ठरले तर राहुल गांधी पटोले यांना पसंती देण्याची शक्यता जास्त आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची ठरलेली दिल्ली भेट आटोपून मुंबईत परतताना उद्धव ठाकरे यांना निवडणुकीसाठी सज्ज होणाऱ्या त्यांच्या पक्षापुढच्या आव्हानांचा तसेच सत्ता आलीच तर महाविकास आघाडीत उद्‌भविणाऱ्या सत्तासंघर्षाची स्पष्ट कल्पना आली असेलच. दिल्ली आपल्याला अनुकूल झाल्याचा त्यांना तूर्तास आभास होत असला तरी प्रत्यक्षात दिल्ली किती दूर आहे, याचा अंदाज त्यांना विधानसभा निवडणुकीनंतरच येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT