अनुप्रीता जोशी, डॉ. शीतल चव्हाणके
Jowar : ज्वारीमध्ये उच्च पौष्टिक मूल्य असते, ज्यामध्ये उच्च प्रमाणात असंतृप्त चरबी, प्रथिने, तंतूमय घटक आणि फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शिअम आणि लोह यांसारखी खनिजे आणि जीवनसत्त्व बी-१ बी-२, बी-३ भरपूर प्रमाणात आढळते.
त्यात कॅलरी आणि सूक्ष्मअन्नद्रव्ये देखील जास्त आहेत. ज्वारीमध्ये ब्लूबेरी आणि डाळिंबांपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्वारी चयापचय सुधारण्यास मदत करते. ज्वारीत असलेले तंतूमय घटक हृदयासाठी उत्तम असते.
शरीरातील घातक कोलेस्ट्रॉल एलडीएल कमी करते. यामुळे हाडे बळकट होतात. ज्वारी खाणे कर्करोगाची शक्यता कमी करते. यात असलेले तंतूमय घटक मधुमेहासाठी फायदेशीर असते.
आरोग्यदायी फायदे
१) सेलिआक आजार असलेल्या लोकांसाठी, वजन कमी करण्यासाठी ग्लूटेन मुक्त आहार असलेल्या लोकांसाठी ज्वारी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.
२) मधुमेहींसाठी आणि वजन कमी करू पाहणाऱ्यांसाठी ज्वारी हा उत्तम आहार पर्याय मानला जातो. ज्वारी हळूहळू पचते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी राखून ठेवते.
तसेच संपूर्ण गव्हाच्या तुलनेत ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. अशा प्रकारे, रक्तामध्ये ग्लुकोज सोडण्यास अधिक वेळ लागतो आणि रक्तातील साखरेची पातळी राखते.
३) ज्वारी तंतूमय घटकांनी समृद्ध असल्याने, ज्वारी सेवन केल्यावर तृप्ततेची भावना देते. हे उपासमार कमी करण्यास मदत करते आणि अतिरिक्त अन्न वापर कमी करते.
४) ज्वारीमध्ये मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. शरीरात कॅल्शिअम शोषण वाढवते आणि हाडांचे आरोग्य राखते.
५) ज्वारी पेशींच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक प्रथिने पुरेशा प्रमाणात पुरवते. प्रथिनांसह, ज्वारी हे आवश्यक जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शिअम, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि बी जीवनसत्त्व यांचा पुरवठा होतो.
६) ज्वारीमध्ये नॉन-हेम लोहाच्या स्वरूपात लोहाचे प्रमाण चांगले असते.
७) ज्वारीमध्ये लोह आणि तांबे दोन्ही भरपूर प्रमाणात असतात, जे रक्ताभिसरण वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. लोह लाल रक्त पेशीचे उत्पादन वाढवते. तांबे लोहाचे शोषण वाढवते. यामुळे निमियाची शक्यता कमी होते.
८) ज्वारीमध्ये नियासिन, जीवनसत्त्व बी ३ भरपूर प्रमाणात असते. उपभोगलेल्या अन्नाला वापरण्यायोग्य ऊर्जा स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी नियासिन अविभाज्य आहे. ज्वारी सातत्यपूर्ण ऊर्जेची पातळी राखण्यास आणि ऊर्जेच्या पातळीतील अचानक वाढ टाळण्यास मदत करते.
मूल्यवर्धित पदार्थ
मल्टीग्रेन आटा
ज्वारीचा आहारात समावेश करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भाकरी. इतर तृणधान्ये किंवा कडधान्यांसह पीठ मिसळून मिश्र धान्य पीठ तयार करता येते. उदाहरणार्थ, ५०% गहू ५०% ज्वारी, बाजरी, सोयाबीन, नाचणी मिसळून मल्टीग्रेन आटा बनवू शकतो.
ज्वारीपासून माल्ट
ज्वारीला मोड आणून पीठ केल्यास त्यातील प्रथिनांची प्रत सुधारते. ज्वारीच्या माल्ट पिठात सोयाबीन आणि नाचणीचे माल्ट पीठ मिसळून मिश्र धान्य माल्ट तयार करून हवाबंद प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत इतर मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यास फायद्याचे ठरते. अशा पिठाची भाकरी, थालीपीठ, पराठे, सूप इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.
पोहे
तृणधान्यांपासून बनवलेले पोहे लहान मुलांमध्ये व सर्व वयाच्या गटांमध्ये लोकप्रिय नाश्ता उत्पादने म्हणून वापरले जातात. सद्यस्थितीला बाजारामध्ये बहुतांशी मक्यापासून बनविलेले पोहे तसेच तांदळापासून बनविलेले पोहे तथा मुरमुरे नाश्ता उत्पादने म्हणून वापरले जातात.
ज्वारीचा लहान आकार आणि जलद हायड्रेशन फ्लेक्स तयार करण्यासाठी अडचणीचे ठरते. परंतु योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने व फ्लेकिंग मशिनच्या साहाय्याने ज्वारीपासून पोहे तयार
करून नाश्ता उत्पादने तयार करणे शक्य आहे. ज्वारीपासून कंडिशनिंग आणि उच्च तापमान व दाबाची प्रक्रिया करून रोलर फ्लेकिंग मशिनद्वारे ज्वारीपासून देखील पौष्टिक पोहे तयार करता येऊ शकतात. हे पोहे ग्लुटेन मुक्त असल्याने यांचा वापर ग्लुटेन ॲलर्जी असलेल्या लोकांमध्ये आरोग्याच्या फायद्यासाठी केला जाऊ शकतो.
फ्लेकिंग मशीन मधून तयार करण्यात येणारे ज्वारीचे पोहे तांदळापासून तयार करण्यात येणाऱ्या पोह्यांप्रमाणे परंतु अधिक पोषणमूल्य असलेले असते.
ज्वारीपासून तयार केलेले पोहे ग्लूटेन मुक्त, उच्च ऊर्जा स्रोत, पचनास हलके व सर्व वयोगटासाठी नाश्ता म्हणून वापरता येण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि पोषण मूल्यांनी भरलेले असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.