Baramati News : माळेगाव सहाकरी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी रविवारी (ता. २२) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नव्या संचालकांचे भवितव्य मतपेटीत बंद करताना सभासदांमध्ये उत्साह होता. चुरशीच्या वातावरणात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रांवर सकाळी १० नंतर गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.
दुपारी साडेतीनपर्यंत ७० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले, तर ‘ब’ वर्ग संस्था मतदार संघात ९० टक्के मतदान झाले होते. मतदान केंद्रावरील गर्दीमुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ झाल्याची चर्चा सुरू होती.
माळेगावसह ६ गटामध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी व उमेदवार अजित पवार यांच्या सूचनेनुसार ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान करून घेण्यास आग्रही होते. त्यामध्ये राजवर्धन शिंदे, बाळासाहेब तावरे, ॲड. केशवराव जगताप, संभाजी होळकर, विश्वासराव देवकाते, मदनराव देवकाते, रामदास आटोळे आदींचा समावेश होता. त्याच पद्धतीने विरोधी सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या गोटातही मतदानाच्या दिवशी एकजूट दिसून आली. त्या पॅनेलचे प्रमुख ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे हे आपल्या सर्व उमेदवारांना अधिकाधिक मतदान होण्यासाठी खूप मेहनत घेताना दिसले.
त्यामुळे कोण पहिल्या, कोण दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकांवर फेकले गेले, अशी जोरदार चर्चा दिवसभर ऐकायला मिळाली. ‘माळेगाव’च्या कार्य क्षेत्रातील ६७ मतदान केंद्रांवरील काही ठिकाणी रांगा, तर काही ठिकाणी गर्दी पहावयास मिळाली. ही प्राप्त विचारात घेता निकाल काय लागेल, याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. बारामती, सांगवी, माळेगाव, पणदरे, खांडज-शिरवली आणि नीरावागज असा गटनिहाय मतदानाचा आढावा घेताना सर्वत्र चुरशीचे मतदान झाल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत सत्ताधारी निलकंठेश्वर पॅनेल विरुद्ध सहकार बचाव शेतकरी पॅनेल यांच्यामध्ये ‘कॉटे की टक्कर’ अशी लढत असल्याचे दिसले. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी एक एक मत केंद्रस्थानी ठेवले होते. याच वेळी दगाफटका होऊ नये, यासाठी दोन्ही गटांच्या नेत्यांनी काळजी घेतली होती. तसेच आपल्याच कार्यकर्ता अथवा गावपुढाऱ्यांकडून गद्दारी होणार नाही, याकडेही बारराईने लक्ष ठेवले होते. निळकंठेश्वर पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर खुद्द अजित पवार यांचे लक्ष होते.
सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख चंद्रराव तावरे, रंजन तावरे, ॲड. जी. बी गावडे, युवराज तावरे, ॲड. शाम कोकरे आदी मतदारांना कारखाना डोळ्यासमोर ठेवून मतदान करा, असे सांगत होते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) बळीराजा पॅनेलचे उमेदवारही मतदारांना आपलेसे करताना आढळून आले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळच्या वेळी माळेगाव येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. बळीराजा पॅनेलचे पदाधिकारी आपले स्वतंत्र अस्तित्व किती मजबूत आहे, हे दाखविण्यासाठी प्रयत्न करीत होते. कष्टकरी शेतकरी पॅनेलचे उमेदवार अधिकाधिक मतदान करून घेत होते.
तिन्ही पॅनेलकडून विजयाचा दावा...
सत्ताधारी गटाचे उमेदवार बाळासाहेब तावरे म्हणाले, ‘क्रॉस व्होटिंग’ काही प्रमाणात झाले. परंतु, ते प्रमाण मर्यादित आहे. अनेक सभासदांनी ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान करण्यावर भर दिला. त्यात राष्ट्रवादीच्या विचारांच्या मतदारांचा अधिकचा समावेश आहे. अजित पवारांचे कट्टर विरोधक रंजन तावरे यांनी मनुष्यरूपी पांडुरंगाने दिलेला कौल आम्ही मान्य करणार आहे.
अर्धपोटी असलेल्या शेतकरी सभासदाला पोटभर अन्न देण्याचा प्रयत्न आम्ही पाच वर्षांत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बळीराजा पॅनेलचे उमेदवार श्रीहरी येळे, गौरव जाधव म्हणाले, ‘‘माळेगावचा कारभार उत्तम चालविण्यासाठी आम्हाला पवार साहेबांचा अशीर्वाद आहे. त्यामुळे सत्तांतर झाल्यास कारखान्याचा पारदर्शकपणे विकास करू.’’
मताला १० हजार भाव?
माळेगावच्या बहुतांश उमेदवारांनी मते विकत घेण्यासाठी वारेमाप पैशांचे वाटप केल्याची चर्चा कार्यक्षेत्रात होती. मताला १० हजार रुपयांचा भाव फुटला आणि ५० रुपयांचे टोकन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रतिकूल स्थितीमुळे ‘क्रॉस व्होटिंग’च्या चर्चेने मात्र भल्या भल्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.