
Baramati News : ‘‘माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकृत उमेदवारांचा निळकंठेश्वर पॅनेल जाहीर केला असून, त्या पॅनेलमध्ये अजितदादा स्वतः उमेदवार आहेत. हा पॅनेल आपण सर्वांनी स्वीकारायचा आणि जिंकून आणायचा. या पॅनेलमध्ये सर्व उमेदवार माझेच आहेत. यापुढील प्रचार काळात कोणीही नाराज व्हायचे नाही. अजितदादांसह सर्व पॅनेल शंभर टक्के निवडून आणायचा निर्धार करायचा आहे,’’ असे आवाहन ‘माळेगाव’चे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी केले.
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत २१ जागांसाठी चौरंगी लढत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उमेदवारी कायम राहिली. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री पवार यांच्या पॅनेलमधून उमेदवारी मिळावी, यासाठी साडेतीनशेपेक्षा अधिक इच्छुकांनी प्रयत्न केले होते. परंतु, २१ जागांसाठी २१ उमेदवारांनाच पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलमध्ये अधिकृत उमेदवारी मिळाली. त्या प्रक्रियेत विद्यमान अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांचेही निळकंठेश्वर पॅनेलमध्ये नाव नसल्याचे गुरुवारी (ता.१२) स्पष्ट झाले.
याविषयी पत्रकारांशी अध्यक्ष जगताप बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निळकंठेश्वर पॅनेलमध्ये इच्छुकांची नाराजी अधिक होती, सर्वजण तेवढ्याच तोलामोलाचे होते, परंतु संबंधितांना मर्यादित जागांमुळे नाइलाजास्तव थांबावे लागले. अजितदादांच्या ताब्यात अनेक सहकारी संस्था अथवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. यापुढील काळात शक्य तितक्या इच्छुकांना त्या संस्थांवर संधी देण्याचा प्रयत्न होणार आहे.
त्यामुळे विरोधकांना आपल्या नाराजीचा फायदा होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. बारामती तालुक्यासह ‘माळेगाव’चा सर्वांगीण विकास अधिक गतीने पुढे घेऊन जाण्यासाठी निळकंठेश्वर पॅनेल बहुमतांनी निवडून आणणे खूप महत्त्वाचे आहे.’’
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे म्हणाले, ‘‘माळेगावचे अग्रस्थान टिकविणे ही सामूहिक जबाबदारी आहे. कारखाना ऊस दराबाबत राज्यात अग्रगण्य साखर कारखान्यांशी स्पर्धा करू इच्छित आहे.
दर्जेदार साखर निर्मितीबरोबर वीज, इथेनॉलसारखे अधिकाधिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी संचालक मंडळाने शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या कारखान्याने कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढविण्यासाठी एआय तंत्रज्ञान (कृत्रीम बुद्धीमत्ता) राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याला सभासदांनी मान्यता दिलेली आहे. त्यासाठी यापुढील काळात संचालक मंडळ व कामगारांच्या योग्य समन्वयातून कमी कालावधीत वरील प्रकल्प यशस्वी करण्यात येईल.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.