Kolhapur Rain News : मागच्या कित्येक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह अनेकांना दिलासा मिळाला आहे. झालेल्या पावसाने रब्बी हंगामाला जोर मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील अनेक तालुक्यात जोरदार झालेल्या पावसाने पाणी नसलेल्या ऊस पिकांना जीवदान मिळाले आहे.
मागच्या ६ महिन्यात अंत्यत कमी पाऊस झाला तर परतीचा पाऊसही न झाल्याने शेतकरी हवालदिल आहे. याचबरोबर यंदा खरीप पिकांचे उत्पादन कमी झाले आहे. जमीनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात १५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या.
मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान काल रात्रीपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज (ता.०८) सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली.
सांगली जिल्ह्यात रात्रीपासून तर कोल्हापूर जिल्ह्यात पहाटेपासून पावसाचा जोर वाढत गेला. सगळीकडे पाणी पाणी झाले असून शिवारात पाणी उभे राहिले आहे. पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकाला दिलासा मिळाला असून रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार आहे. माळरान, डोंगरमाथ्यावरील खोळंबलेल्या रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार आहे. जिल्ह्याच्या पुर्वेकडील काही तालुक्यात तुलनेत पाऊस कमी झाला आहे. आणखी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा तळ असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सांगली जिल्ह्यात आज (बुधवार) पहाटे पासून अवकाळी पावसाने सुरुवात झाली. कालपासूनच सांगली शहरात आणि जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आज (बुधवार) पहाटेपासून जिल्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर सकाळ पासून सांगली, मिरज शहरात मुसळधार पाऊस पडत आहे.
तसेच इस्लामपूर, पलूस, तासगाव, आटपाडी या ग्रामीण भागातही अवकाळी पाऊस पडत आहे. काढणीला आलेल्या भात पिकाचे आणि फुले येत असलेल्या तसेच कोवळे मणी तयार होण्याच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष पिकाचे या अवकाळी पावसामुळे नुकसान होणार आहे. अचानक पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. तसेच दिवाळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.