Maharashtra Agriculture News : राज्यातील जवळपास सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. या विमा रक्कमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल १ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीकविमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून २५ टक्के अग्रीम पीकविमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या जसजशा होत गेल्या त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यानी एकूण १७०० कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रमुख पीकविमा कंपन्यांची धनंजय मुंडे यांनी बैठक घेऊन, अग्रीमचा तिढा तातडीने सोडवण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित पीकविमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले होते. तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना केल्या आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती पीकविमा मंजूर?
नाशिक - शेतकरी लाभार्थी - ३ लाख ५० हजार (रक्कम - १५५.७४ कोटी)
जळगाव - १६,९२१ (रक्कम - ४ कोटी ८८ लाख)
अहमदनगर - २,३१,८३१ (रक्कम - १६० कोटी २८ लाख)
सोलापूर - १,८२,५३४ (रक्कम - १११ कोटी ४१ लाख)
सातारा - ४०,४०६ (रक्कम - ६ कोटी ७४ लाख)
सांगली - ९८,३७२ (रक्कम - २२ कोटी ४ लाख)
बीड - ७,७०,५७४ (रक्कम - २४१ कोटी २१ लाख)
बुलडाणा - ३६,३५८ (रक्कम - १८ कोटी ३९ लाख)
धाराशिव - ४,९८,७२० (रक्कम - २१८ कोटी ८५ लाख)
अकोला - १,७७,२५३(रक्कम - ९७ कोटी २९ लाख)
कोल्हापूर - २२८ (रक्कम - १३ लाख)
जालना - ३,७०,६२५ (रक्कम - १६० कोटी ४८ लाख)
परभणी - ४,४१,९७० (रक्कम - २०६ कोटी ११ लाख)
नागपूर - ६३,४२२ (रक्कम - ५२ कोटी २१ लाख)
लातूर - २,१९,५३५ (रक्कम - २४४ कोटी ८७ लाख)
अमरावती - १०,२६५ (रक्कम - ८ लाख)
एकूण - लाभार्थी शेतकरी संख्या - ३५,८,३०३ (मंजूर रक्कम -१७०० कोटी ७३ लाख)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.