Pune: महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. रत्नागिरी, धाराशिव, अकोला, जालना, नांदेड, बीड, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि लातूर या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक फटका बसला.
हवामान विभागाने दिलेल्या माहीतीनुसार, २७ मे रोजी सकाळी ११ वाजेपासून ते २८ मे सकाळी ११ वाजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगडमध्ये सर्वाधिक १५७ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. तर दापोलीत १४१.७१ मिलिमीटर आणि गुहागरात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील वरवट गावात नदीत तीन जण वाहून गेले. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. कोकणात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले, तर काही भागांत दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे, ज्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भीमा नदीला पूर आल्याने पाभे गावाचा संपर्क तुटला आहे. काटेवाडी परिसरात कॅनॉलला भगदाड पडल्याने पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले होते. पुढील काही दिवस हवामान संवेदनशील राहण्याची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.