Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे अतोनात नुकसान

Team Agrowon

Chalisgaon News : गिरणा पट्ट्यात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्याचे चित्र दिसून आले. जास्तीच्या पावसामुळे कापूस, मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतात पडून असलेल्या मक्याला अंकुर फुटले; तर कपाशी झाडावरच ओली होऊन काळवंडली आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना या नुकसानाची झळ सोसावी लागत असल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. चाळीसगाव तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे कपाशी लाल पडत आहे. तालुक्यातील ९० हजार ३५२ हेक्टरवर जमीन लागवडीखाली आहे. त्यामध्ये बागायत कपाशी ३० हजार ८३८ हेक्टर व जिराईत कपाशी ३२ हजार १३ हेक्टरने लागवड झाली आहे.

एकूण ६२ हजार ८५१ हेक्टर कपाशी लागवड असून काही भागात होणाऱ्या सततच्या पावसामुळे कपाशीच्या बोंडातील सरकीला कोंब फुटले आहेत. मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतशिवारावर जणू अस्मानी संकटच कोसळले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या मुसळधार पावसामुळे हिरावला गेला आहे.

मक्याला फुटले अंकुर

चाळीसगाव तालुक्यात मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पडलेल्या मक्याच्या कणसांतील दाण्यांना अक्षरशः अंकुर फुटत आहेत. ज्या काही शेतकऱ्यांचा मका शेतात उभा आहे, तो सडू लागला आहे. डोळ्यांदेखत होणाऱ्या नुकसानामुळे जगावे तरी कसे? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतात साचलेल्या पाण्यात पडलेली मक्‍याची कणसे व चारा पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावत आहेत.

ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर जणू संक्रांत आली आहे. या पावसाचा तब्बल सत्तर टक्के शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काही शेतांमध्ये पाणी साचल्याने शेताला जणू काही शेततळ्याचे स्वरूप आले होते. तालुक्यात काही ठिकाणी परतीच्या अवकाळी पावसाने आज दुसऱ्या दिवशी पुन्हा हजेरी लावली.

वाघळी, पातोंडा या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. कृषी विभागाने ज्यांचा विमा आहे आणि ज्यांचा विमा नाही अशा दोन्ही नुकसानबाधीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.

सहा तालुक्यांत ६४ हजारांवर शेतकरी बाधित

यावल तालुक्यात २ ऑक्टोबरला झालेल्या पावसामुळे एका गावातील ३ शेतकरी बाधीत असून, केळी व ज्वारी असे ३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यात १० ऑक्टोबरला पावसामुळे ३ गावांमधील ३ हेक्टर केळी पीकधारक ६ शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

१२ ऑक्टोबरला मुक्ताईनगर तालुक्यात ३२ गावातील ७ हजार ५०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात ३ हजार २४५ हेक्टर कापूस, ६१ हेक्टर तूर, २०७ हेक्टर सोयाबीन, १२ हेक्टर ज्वारी, ४९४ हेक्टर मका, १४७ हेक्टर केळी असे ४ हजार १६६ हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

चोपडा तालुक्यात १३ ऑक्टोबरला झालेल्या पावसात ६ गावातील ८५ शेतकरी बाधीत आहेत. यात २६ हेक्टरी मका, ३१ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. पाचोरा तालुक्यात ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान १२९ गावांमधील ५६ हजार ५१२ शेतकरी बाधित झाले आहेत. यात ४६ हजार ८१२ हेक्टर कापूस, ५५३ हेक्टर ज्वारी, तर ५ हजार १३३ हेक्टर मका असे ५२ हजार ९५८ हेक्टर नुकसान झाले आहे. बोदवड तालुक्यात १३ ला झालेल्या पावसामुळे १० गावातील ५१६ शेतकऱ्यांचे २४३ हेक्टर कापूस पिकाचे नुकसानीच्या पंचनाम्याची नोंद करण्यात आली आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस

तालुका पाऊस

जळगाव १९८.६

भुसावळ १८३.३

यावल ८४.५

रावेर ७५.३

मुक्ताईनगर २७२.४

अमळनेर ११३.३

चोपडा १२०.०

एरंडोल १११.७

पारोळा ९७.४

चाळीसगाव ८६.५

जामनेर २३८.०

पाचोरा २०४.१

भडगाव १३६.९

धरणगाव १४४.४

बोदवड २०२.१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

Crop Insurance : शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा

Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT