Dr. Krushnanand Hosalikar Agrowon
ॲग्रो विशेष

Interview with Dr. Krushnanand Hosalikar : राज्यात मे, जूनमध्येही उष्णतेच्या लाटांचा अंदाज

Anil Jadhao 

Head of Indian Meteorological Department, Pune Dr. Conversation with Krishnanand Hosalikar :

हवामान विभाग यंदाच्या माॅन्सूनचा अंदाज कधी जाहीर करणार?

हवामान विभागाच्या कार्यशैलीनुसार माॅन्सूनचा पहिला अंदाज एप्रिलच्या मध्यात दिला जातो. तर दुसरा अंदाज मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जातो. त्यामध्ये देशातील मुख्य चार भौगोलिक भागानुसार जसे की, उत्तर भारत, दक्षिण भारत, मध्य भारत आणि पश्चिम भारत, या भागानुसार पाऊस कसा असेल, पावसाचे वितरण वितरण कसे असेल, याचा प्राथमिक अंदाज दिला जातो.

राज्यात सध्या ऊन वाढलं आहे. तर एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये राज्यातील तापमान कसे राहण्याचा अंदाज आहे?

भारतीय हवामान विभागाने आपल्या अहवालात एप्रिल, मे आणि जून महिन्यांतील तापमान कसे राहील, याचा अंदाज दिला आहे. या तीनही महिन्यांमध्ये दिवसाचे आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता खूपच अधिक आहे. म्हणजे दिवसाचे कमाल तापमान आणि रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा बहुतांश ठिकाणी जास्त राहण्याचा अंदाज आहे.

तापमान सरासरीपेक्षा जास्त किंवा कमी आहे हे कसे मोजले जाते?

हवामान विभागाकडे देशातील सर्व भागांतील तापमानाच्या अनेक वर्षांच्या नोंदी आहेत. जेव्हा आपण म्हणतो एखाद्या भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे, तर त्या वेळी त्या ठिकाणच्या त्या तारखेच्या मागच्या नोंदींची सरासरी काढून ते ठरवले जाते. समजा, हवामान विभागाने असे म्हटले, की १४ एप्रिलला पुण्यातले तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. तर हवामान विभागाने पुण्यातील मागच्या ३० वर्षांतील तापमानाची सरासरी काढली आणि १४ एप्रिलचे तापमान त्या सरासरीपेक्षा जास्त आले आहे, असे समजावे. उदा. पुण्यातील १४ एप्रिलची मागील ३० वर्षांतील कमाल तापमानाची सरासरी ३४ अंश सेल्सिअस असेल आणि आज जर ३६ अंशांची नोंद झाली, तर हवामान विभाग असे म्हणते की पुण्याचे तापमान सरासरीपेक्षा २ अंशांनी जास्त आहे.

एप्रिल ते जून या काळात पाऊस पडण्याची कितपत शक्यता आहे?

एप्रिल ते जून हा पूर्व माॅन्सून काळ समजला जातो. राज्याच्या हवामानाचा ३० वर्षांचा आढावा घेतल्यानंतर राज्याची क्लायमेटाॅलाॅजी ठरवली जाते. या काळात पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यामुळे यंदाही एप्रिल ते जून या काळात पाऊस पडू शकतो. पण हा पाऊस नेमका कधी पडू शकतो, कोणत्या भागात पडू शकतो याचा अंदाज हवामान विभाग वेळोवेळी देईल.

एप्रिल महिन्यातही ऊन जास्त राहील का?

एप्रिल महिन्यात निश्‍चितच दिवसाचे आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. एप्रिल महिन्यात पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामानाने विदर्भात ही शक्यता कमी दिसते. पण विदर्भातही ऊन जास्तच राहणार आहे.

राज्यातील कोणत्या भागात उष्णतेच्या लाटा असतील?

होय, केवळ एप्रिल महिन्यातच नाही तर मे आणि जून महिन्यांतही उष्णतेच्या लाटांचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज आहे. एप्रिल महिन्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत उष्णतेच्या लाटांचे दिवस जास्त असतील. किती जास्त असतील? तर एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा ३ ते ५ दिवस जास्त असतील. थोडक्यात, एप्रिल महिन्यात साधारण जेवढे दिवस उष्णतेच्या लाटा आपण अनुभवतो त्यापेक्षा यंदा ३ ते ५ दिवस जास्त उष्णतेच्या लाटा असतील. उदा. सोलापूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचे दिवस ७ असतात. पण यंदा त्यात आणखी ५ दिवसांची भर पडेल. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो, की यंदा सोलापूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचे दिवस १२ असतील.

आपल्याकडे ऊन वाढलं की लोक सांगतात उष्णतेची लाट आली. पण शास्त्रीयदृष्ट्या उष्णतेची लाट आली हे नेमकं कधी म्हणायचं?

अगदी बरोबर, शेतकरी किंवा सामान्य नागरिक साधारपणे ऊन जास्त जाणवत असेल तर आज उष्णता जास्त आहे, असे म्हणतात. पण उष्णतेची लाट ही वेगळी संकल्पना आहे. त्यातही उष्णतेची लाट आणि अतिउष्णतेची लाट असे दोन प्रकार आहेत. ते ठरवण्याचे काही नियम आणि निकष आहेत. जर एखाद्या ठिकाणच्या सरासरी तापमानातील वाढ जर ४.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, तर त्या ठिकाणी उष्णतेची लाट आल्याचे मानले जाते. पण जर तापमानातील वाढ ६ अंशांपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी अति उष्णतेची लाट समजली जाते. पण केवळ तापमानात वाढ झाली म्हणूनच उष्णतेची लाट आणि अतिउष्णतेची लाट आली असे जाहीर केले जात नाही. त्यासाठी आणखी दोन निकष पूर्ण व्हावे लागतात. एक म्हणजे तापमानातील ही वाढ केवळ त्या एका ठिकाणीच असता कामा नये; तर त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूच्या आणखी दोन ठिकाणी अशी नोंद असायला हवी. दुसरे म्हणजे या नोंदी किमान २ दिवस असल्या पाहिजेत. हे दोन्ही निकष पूर्ण होत असतील तर हवामान विभाग त्या ठिकाणी उष्णतेची लाट आहे, की अति उष्णतेची लाट आहे हे जाहीर करते. उदा. समजा पुण्याच्या आजच्या तापमानाची सरासरी ४० अंश असेल, पण प्रत्यक्ष ४६ अंशांची नोंद झाली, तर ती ठरते अति उष्णतेची लाट; पण नोंद ४४.५ अंशांची झाली असेल, तर त्यास उष्णतेची लाट मानले जाते. उष्णतेच्या लाटांपासून बचाव करण्यासाठी शेतकरी आणि सर्वच नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत.

हवामान विभाग उष्ण रात्रीचेही अंदाज देत आहे. पण उष्ण रात्र म्हणजे नेमके काय?

साधारणपणे आपण केवळ दिवसाच्या तापमानाकडे जास्त लक्ष देतो. पण रात्रीच्या तापमानाचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी आहे. रात्री जर तापमान जास्त असेल तर शरीराला हवा तेवढा आराम मिळू शकत नाही. रात्रीचा थकवा गेला नसेल, तर दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. याचा परिणाम आपल्या कामावरही होत असतो. त्यामुळे रात्रीचे तापमान कसे राहते, हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे हवामान विभाग दिवसाच्या उष्णतेबरोबरच रात्रीच्या उष्णतेचाही अंदाज देते.

उन्हाळ्यात उष्माघाताच्या घटनाही घडतात. त्याबद्दल काय सांगाल?

खरे तर उष्माघात होण्याला दोन-तीन घटक जबाबदार असतात. एक म्हणजेच तापमान. नेहमीच उष्माघात जास्त तापमानाला म्हणजेच ४२ किंवा ४३ अंश सेल्सिअस तापमानालाच उष्माघात होईल, असे नाही तर त्यापेक्षा कमी तापमान असतानाही उष्माघात होऊ शकतो. पण तापमान जेवढे जास्त तेवढी उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. दुसरे म्हणजे तुम्ही किती वेळ बाहेर उन्हात आहात, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. तिसरं म्हणजे तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण किती आहे. तुमचे खाणेपिणे हा घटकही महत्त्वाचा ठरतो. तसेच आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मोकळी हवा आहे का, हे देखील महत्त्वाचे आहे.

कधी कधी तापमान कमी असतानाही उकाडा जास्त असतो, असे का घडते?

कधी कधी हवामान विभाग म्हणतं, की तापमान ३४ अंश आहे. पण लोक म्हणतात आज जास्त उकडत आहे. त्यामुळे हवामान विभाग चुकीचं सांगतं आणि तापमान जास्त असेल, असे लोक म्हणतात. कारण त्यांना जे जाणवतं त्यावरून ते म्हणतात. या वेळी हवेतील तापमान आणि आर्द्रतेमुळे त्यांना उकडतं आणि तापमान जास्त असल्याचे जाणवते. समुद्र किनारपट्टीच्या भागात हे जास्त घडत असतं. त्यामानाने राज्याच्या आतल्या भागात हे कमी जाणवते. पण कधी कधी मेघगर्जनेसह पाऊस पडतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. त्याच वेळी जर वाढलेले तापमान ३८ अंश असेल, तर ते ४० किंवा ४२ अंशही भासतं; कारण उकाडा वाढलेला असतो.

‘एल निनो’ बद्दल काय अंदाज आहे?

सर्वसाधारणपणे प्रशांत महासागरातील तापमान सरासरीपेक्षा काहीसं वाढलं तर त्या वातावरणीय परिस्थितीला आपण ‘एल निनो’ असं म्हणतो. त्यात सर्वसाधारण, मध्यम आणि तीव्र ‘एल निनो’ असे टप्पे आहेत. जानेवारी २०२४ मध्ये तीव्र एल निनो होता. पण आता झपाट्याने खाली येत आहे. ही खूप चांगली बाब आहे. अंदाज आहे, की जूनमध्ये न्यूट्रल म्हणजेच तटस्थ स्थिती होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर ‘ला निना’ स्थिती निर्माण होण्याची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT