चवीला गोड आणि कमी उष्मांक असलेले पेय म्हणून नीरा ओळखली जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत (Summer Season) शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी नीरा फायदेशीर ठरते. नारळ आणि ताडाच्या झाडांना फुलोरा यायला लागला की तो दोरीने घट्ट बांधून त्याच्या टोकाला कोयत्याने चीर दिली जाते.
त्यातून बाहेर पडणारा द्रव खाली मडक्यात साठवला जातो. यालाच ‘नीरा’ म्हणतात. याचप्रमाणेच बेटूला या प्रजातीच्या ‘ब्रीच’ या वनस्पतीपासून ‘ब्रीच वॉटर’ (ब्रीच सॅप) मिळविले जाते.
हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. अमेरिका, उत्तर युरोप आणि चीन या देशांमध्ये फार पूर्वीपासून हे पाणी सर्वांना परिचित आहे.
ब्रीच सॅप (वॉटर) हे पाण्यासारखे दिसत असून चवीला किंचित कमी गोड असते. या पाण्यामध्ये मुबलक प्रमाणात विविध पोषक घटकांचा समावेश असतो.
यात मॅग्नेशिअम आणि मँगेनीज यांचे मुबलक प्रमाण असते. शर्करा आणि कॅलरीचे प्रमाण कमी असते. विविध सौंदर्यप्रसाधने आणि त्वचेच्या आरोग्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये याचा वापर केला जातो.
आढळ
ब्रीच ही वनस्पती समुद्रसपाटीपासून साधारण ३५०० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या पर्वतीय भागांतील जंगलामध्ये आढळते. भारतामध्येही अरुणाचल प्रदेश, दार्जिलिंग, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, सिक्कीम आणि उत्तरांचल या ठिकाणी या वनस्पती आढळून येतात.
काय आहे ब्रीच वॉटर
- हिवाळ्यात ब्रीच या वनस्पतीमध्ये विविध पोषकतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला जातो. त्यांचे नंतर सॅप (म्हणजेच पाणी) मध्ये रूपांतर होते. हे पाणी वसंत ऋतूच्या प्रारंभी वनस्पतीमधून बाहेर सोडले जाते. झाडांमधून पाण्याच्या स्वरूपात बाहेर पडते, त्यास ब्रीच सॅप असे म्हणतात.
- हे सॅप पाण्याप्रमाणेच रंगविरहीत, स्वच्छ आणि चवीला थोडेसे कमी गोड असते. बाहेर पडल्यानंतर साधारण २ ते ३ दिवसांत त्यावर आंबण्याची क्रिया घडून अधिक आम्लिय बनते. ब्रीच वॉटर (पाणी) पाण्याप्रमाणेच पिले जाते. याशिवाय सिरप, बिअर आणि वाइन अशा पदार्थांमध्ये मिसळून सेवनासाठी वापर होतो.
मिळविण्याची पद्धती
ब्रीच वनस्पतीपासून मिळणाऱ्या पाण्याला ‘ब्रीच सॅप’ असे म्हणतात. ब्रीच सॅप मिळविण्याची पद्धती ही रबर उत्पादनासारखीच आहे. यात झाडाच्या खोडावर छोटे छिद्र पाडले जाते. या छिद्रातून पडणारे पाणी एका भांड्यात गोळा केले जाते.
आरोग्यदायी फायदे
- विविध पोषक घटकांनी समृद्ध.
- जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात.
- जीवनसत्त्व ‘क’च्या कमतरतेमुळे होणाऱ्या स्कर्व्ही आजारापासून बचावासाठी उपयोगी.
- कर्बोदके, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, मँगेनीज, झिंक यांचे मुबलक प्रमाण.
- याशिवाय फॉस्फरस, पोटॅशिअम, फॉलिक आम्ल, जीवनसत्त्व क आणि कॉपर हे देखील आढळून येतात.
- हाडांची जडणघडण आणि मजबुतीसाठी फायदेशीर.
- वृद्ध महिलांमध्ये उद्भवणाऱ्या पाठीच्या विकारांमध्ये फायदेशीर.
- त्वचा निरोगी आणि लवचिक बनविण्यास मदत करते.
- अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास फायदेशीर.
- डोळ्याखालील काळे वर्तुळे आणि वयोमानानुसार चेहऱ्यावरील येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
- केसांच्या आरोग्याची उत्तम असून, वाढ चांगली होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.