Bhagar Millet Agrowon
ॲग्रो विशेष

Proso Millet : आरोग्यदायी पौष्टिक भगर

Team Agrowon

अनिकेत पोपळघट, डॉ. आर. बी. क्षीरसागर

भगर पिकाची उत्पादकता इतर तृणधान्याच्या तुलनेत कमी असली तरी आरोग्याच्या दृष्टीने हे पीक अत्यंत पौष्टिक आहे. यामध्ये तंतूमय घटक, प्रथिने, आणि लोहाची मात्रा चांगल्या प्रमाणात आहे. हे पीक ६० ते ७० दिवसांत तयार होते. या पिकाची मुळे जमिनीत खोलवर जातात, त्यामुळे ती कोरडवाहू क्षेत्रात टिकाव धरते. या पिकाच्या फुलोऱ्याला झुबक्यांमध्ये दाणे लागतात, जे परिपक्व होऊन तयार होतात.

औषधी गुणधर्म

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामध्ये तंतूमय घटक अधिक असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. यातील फॅटी अॅसिडमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

लोह आणि कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. यातील भरपूर प्रथिने आणि अमिनो अॅसिड्समुळे शरीरातील स्नायूंना ताकद मिळते आणि संपूर्ण शारीरिक विकासाला चालना मिळते.

भगरीमध्ये विविध फायटोकेमिकल्स असतात, जे शरीराच्या अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. यामध्ये फ्लॅवोनॉइड्स, सॅपोनिन्स, आणि टॅनिन्ससारखे घटक आढळतात. हे सर्व घटक शरीरात अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतात आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करतात. फ्लॅवोनॉइड्स हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत, तर सॅपोनिन्स हृदयविकार टाळण्यास मदत करतात. यातील टॅनिन शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढण्यास उपयुक्त ठरतात.

आरोग्यदायी फायदे

मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, आणि कॅन्सर यासारख्या आजारांवर भगर उपयुक्त ठरते. भगरीमध्ये कमी कॅलरी असते, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगला पर्याय आहे.

तंतूमय घटकांचे प्रमाण अधिक असल्यामुळे पचनक्रियेसाठी भगर लाभदायक ठरते.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी भगर उपयुक्त आहे. यामधील प्रथिने आणि लोहामुळे शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो आणि अशक्तपणा दूर होते.

समस्येवरील उपाय

भगर विषबाधा मुख्यत्वे पीक वाढविण्याच्या प्रक्रियेदरम्यान आणि नंतरच्या साठवणीच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे उद्भवू शकते. अयोग्य व्यवस्थापनामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊन विषारी द्रव्य भगरीच्या दाण्यांमध्ये तयार होऊ शकते, ज्यामुळे लोकांना विषबाधा होण्याची शक्यता असते.

भगरच्या दाण्यांवर ओलावा किंवा खराब साठवणुकीमुळे अॅफ्लाटॉक्सिन विकसित होतात. हे विषारी पदार्थ शरीरातील यकृतावर गंभीर परिणाम करू शकतात.

विषबाधेमुळे पोटात दुखणे, उलटी, अतिसार अशा लक्षणांचा अनुभव येऊ शकतो. शरीरात ऊर्जा कमी होते आणि शारीरिक दुर्बलता निर्माण होते.

उपाययोजना

भगरच्या साठवणीसाठी योग्य तापमान आणि ओलावामुक्त वातावरणाची आवश्यकता आहे. ओलावा आणि उष्णतेमुळे बुरशी तयार होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे भगर साठवणूक कोरड्या जागी करावी.

काढणी योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करणे गरजेचे आहे. पिकाची काढणी उशिरा किंवा लवकर केली तर ओलावा वाढतो, ज्यामुळे बुरशी वाढू शकते. काढणी नंतर लगेच स्वच्छता करून, कोरडी करणे आवश्यक आहे.

बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या भगरच्या नमुन्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. विशेषत: अॅफ्लाटॉक्सिन आणि इतर विषारी द्रव्यांच्या तपासणीसाठी विशेष प्रयोगशाळा चाचण्या कराव्यात.

मूल्यवर्धित पदार्थ

भगरीचा वापर अनेक मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये केला जातो. यामध्ये पीठ, लाडू, बिस्किट, नाचणी, पापड, आणि इतर खाद्यपदार्थांचा समावेश होतो. भगरीचे पोषण मूल्य अत्यंत उच्च आहे. १०० ग्रॅम भगरीमध्ये साधारणत: ३.६ ग्रॅम प्रथिने, ६.७ ग्रॅम तंतूमय घटक, १२.२ मिग्रॅ लोह, आणि १८ मिग्रॅ कॅल्शिअम असते. तसेच जीवनसत्त्व ब, फॉस्फरस, आणि मॅग्नेशिअम यांचे प्रमाणही जास्त असते.

खिचडी : भगरच्या ताज्या दाण्यांसह बनवलेली खिचडी पोषणदृष्ट्या समृद्ध आणि स्वादिष्ट असते.

ढोकळे : पिठापासून बनवलेला ढोकळा पचायला हलका असतो.

पिठले, पापड, उपमा तयार करता येतो.

लाडू : पिठातून बनवलेले लाडू पौष्टिक असतात.

इडली, डोसा : पिठातून बनवलेली इडली तसेच डोसा स्वादिष्ट असतो.

- अनिकेत पोपळघट,

९८५०५७६३९७

(अन्नतंत्र महाविद्यालय,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT