Indrjeet Bhalerao Agrowon
ॲग्रो विशेष

Indrjeet Bhalerao: तळमळीचं फळ शेवटी मिळत म्हणजे मिळतं!

मन लावून अभ्यास करतं. शिक्षक होतं. शिक्षक झालो म्हणून एकटाच या दुःखाच्या खातेऱ्यातून बाहेर पडलो, भावंडांचं काय ? आई-वडिलांचं काय ? नोकरी लागल्यानंतर काही दिवसात या गोष्टींचा तो विचार करू लागतो.

Team Agrowon

- इंद्रजीत भालेराव

नऊ महिने नऊ दिवस झाले तरी सासू म्हणते शेताला चल. टोपल्यात सुनेची भाकरी बांधून सासू निघते देखील शेताला. पाठीमागून निघालेली सून मी येऊ शकत नाही म्हणून परत फिरते. सासू मात्र सरळ शेताला निघून जाते.

घरी थांबलेली एकटीच सून तासाभरानं बाळंत होते. घरीही कोणी नसतं, शेजारीपाजारीही कुणी नसतं. बाजेवर बसल्या बसल्या बाळंत झालेली ही बाई स्वतःच्या हातात लेकरू घेऊन बाजेच्या ठाव्यावरच नाळ तोडते. बाळाची लव पुसून घेते. स्वतःच उठून बाळाच्या स्नानासाठी पाणी तापायला ठेवते. तेव्हा बाळ बाजेवर टॅहा टॅहा करतो. तू आवाज ऐकून दूरच्या घरातली एक बाई येते, पाहते तर या घरची सून बाळंत झालेली. मग ती तिला मदत करू लागते. काळजांभूळ, मांडीवर न मावनारं लेकरू पाहून बाळंतिणीचा शिनभाग हलका होतो.

ही बाई पुढं त्या लेकराला घेऊन रोजच शेतात जात राहते. राबत राहते. तिला दुसरा पर्याय नसतो. बाभळीच्या सावलीला टोपल्यात ठेवलेलं लेकरू लहानपणापासून आपल्या आई-वडिलांचे कष्ट पाहतं. हळूहळू जाण यायला लागली तसतसं ते ठरवतं यांना या कष्टातून बाहेर काढायचं. आणि एक दिवस त्या मायबापांना कष्टातून बाहेर काढतं देखील. त्यासाठी सुरुवातीपासून शाळेचा ध्यास घेतं.

मन लावून अभ्यास करतं. शिक्षक होतं. शिक्षक झालो म्हणून एकटाच या दुःखाच्या खातेऱ्यातून बाहेर पडलो, भावंडांचं काय ? आई-वडिलांचं काय ? नोकरी लागल्यानंतर काही दिवसात या गोष्टींचा तो विचार करू लागतो. नवोदयला प्रवेश मिळावा म्हणून तयारी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वर्ग घ्यायला तो सुरुवात करतो.

पहिल्या वर्षी त्यानं वर्ग घेतलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी नवोदयला लागतात. आपण सहज केलेल्या एखाद्या कामातून आपणाला आपल्यातल्या कौशल्याचा शोध लागतो आणि आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार होतो. तसंच काहीसं बाबासाहेबांचं झालं. मग त्यांचेच शिक्षक मित्र त्यांना आग्रह करतात आमच्याही मुलांचे वर्ग तू घे. हळूहळू त्या वर्गांची प्रसिद्धी इतकी होते की आज महाराष्ट्रातून त्याच्या वर्गात मुलं शिकायला येतात. प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा लागते.

केवळ दोनशे मुलांना तिथं प्रवेश मिळतो. त्यासाठी एक मोठी यंत्रणा उभी करावी लागते. मोठी इमारत भाड्यानं घ्यावी लागते. विद्यार्थ्यांच्या निवास भोजनाची व्यवस्था करावी लागते. मग त्यासाठी तो घरातली, गावाकडची सगळी माणसं घेऊन येतो. सगळ्यांना शहरात काम देतो. एमए होऊन सुशिक्षित बेकार असलेल्या आणि शेतात राबणाऱ्या भावालाही तो शहरात घेऊन येतो. त्याला स्वतःच घर बांधून देतो. या वर्गांचं व्यवस्थापन त्याच्याकडं सोपवतो. स्वतःसाठी एक उत्तम घर बांधतो. आई-वडिलांना स्वतःच्या घरात ठेवतो.

हे सगळं करत असताना शाळेकडं नकळत दुर्लक्ष होईल म्हणून शाळेचा राजीनामा देतो. पण तो ज्या शाळेत शिक्षक असतो त्या गावातले लोक आणि तिथले शिक्षणाधिकारी त्याचा राजीनामा स्वीकारत नाहीत. कारण त्याच्या ह्या सर्व व्यापाचा परिणाम शाळेच्या कामावर तो मुळीच पडू देत नसतो.

उलट त्याचं विद्यार्थ्यांना जीव लावनं आणि तिथल्याही विद्यार्थ्यांना तितक्याच प्रामाणिकपणे शिकवणं हे गावकऱ्यांना आणि शिक्षणाधिकाऱ्यांना हवं असतं. तुझ्या वर्गाला मार्गदर्शन करून तू शाळेत नोकरी कर, तुझ्या या वर्गांची आम्हाला काहीही अडचण नाही, असं म्हणून त्याला त्या वर्गाचं मार्गदर्शक म्हणून राहायला सांगितलं जातं. तो आपल्या 'मिशन नवोदय प्रवेश' या उपक्रमासाठी शिक्षकांची एक फळीच उभी करतो. यानिमित्तानं पस्तिस सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो.

ही गोष्ट आहे बाबासाहेब होळकर यांची. काल (२९-०६-२०२३) जालन्याला त्यांनी नवोदय साठी निवड झालेल्या त्यांच्या वर्गातल्या ११७ विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ ठेवला होता. त्यानिमित्तानं गेलो तेव्हा त्यांच्या आयुष्याची ही सगळी कथा मला समजली. तसं बाबासाहेब होळकर यांना मी मागच्या बारा वर्षापासून ओळखतो.

ते मूळचे परभणी जिल्ह्यातले सेलू जवळच्या एका खेड्यातले. मेंढपाळ समाजातले. त्यांना नोकरी लागली नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातल्या ठाणगाव नावाच्या गावी. माझे सिन्नरचे मित्र राहुल पगारे यांनी त्या परिसरात माझे अनेक कार्यक्रम ठरवले. तेव्हा ठाणगावच्या शिक्षकांनीही ठाणगावला एक व्याख्यानमाला सुरू करायची असं ठरवलं. पहिल्या वर्षीच्या पहिल्या व्याख्यानमालेसाठी मी यावं असं राहुल पगारे आणि बाबासाहेब होळकर यांना वाटलं. मी तिथं गेलो तेव्हा या धडपडणाऱ्या शिक्षकाला मी पाहिलं होतं.

ज्या गावात ते शिक्षक होते त्या ठाणगावात ते किती लोकप्रिय आहेत, किती विद्यार्थीप्रिय आहेत ते मी पाहिलं होतं. एखादा माणूस मुळातच सतत राबत राहतो. आपल्या भोवतीच्या माणसांसाठी सतत काहीतरी करत राहतो. त्यामुळंच भोवतीची माणसं त्याला आपल्या जवळून दूर जाऊ द्यायला तयार नसतात. पण गावापासून इतक्या दूर असलेल्या त्यांनी प्रयत्न करून मराठवाड्यात बदली करून घेतली.

स्वतःच्या जिल्ह्यात नाही तर नाही जिल्ह्याला लागून असलेल्या जालना जिल्ह्यात त्यांची बदली झाली. पुढच्या बारा वर्षात बाबासाहेबांनी हे सगळं वैभव उभं केलं. नवोदयच्या तयारीचे वर्ग तर जोरात चालतातच पण बाबासाहेबांनी आता एक हायस्कूलही उभं केलेलं आहे. हा धडपडणारा माणूस कुठं थांबणारच नाही. वैयक्तिक विकासही तो करतो आहे. वाचन उत्तम आहे. भाषा आणि बोलणं प्रभावी आहे. त्यामुळं कीर्तन आणि व्याख्यानंही सुरू केलेली आहेत. तिथंही हा माणूस लोकप्रियता मिळवतो आहे.

असल्या प्रचंड ऊर्जा असलेल्या माणसाकडं पाहिलं की आपणालाही भरपूर बळ मिळतं. बाबासाहेबांना मी विचारलं, सर तुमचं वय किती ? ते म्हणाले, चाळीस वर्षे. म्हटलं, सकाळी किती वाजता उठता ? म्हणाले, चार वाजता. म्हटलं झोपता किती वाजता ? म्हणाले, अकरा वाजता. तरीही बाबासाहेब ताजे आणि तरतरीत वाटत होते.

उत्स्फूर्त वाटत होते. कुठलाही थकवा नाही. चाळीशित लोकांना होणारा कुठलाही आजार त्यांना झालेला नाही. अतिशय ऊर्जावान असं हे व्यक्तिमत्व. आपल्या दुःखाचं, दारिद्र्याचं भांडवल करत न बसणारं आणि आपण धडपडत राहिलो, दृष्टी नीट असली, मन निर्मळ असलं की कसं आपण पुढं पुढं जात राहतो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेब होळकर.

बारा वर्षांपूर्वी बाबासाहेबांना मी आवडण्याचं कारण होतं ते म्हणजे मी त्यांच्याच जिल्ह्यातला आहे हे एक आणि त्यांच्या जन्माची कथा आणि माझ्या जन्म या कवितेत मी सांगितलेली माझ्या जन्माची कथा सारख्याच आहेत हे दुसरं कारण.

काल त्यांच्या आईच्या तोंडून बाबासाहेबांची जन्मकथा ऐकली. जी मी वर दिलेली आहे. खरंतर ती त्यांच्याच भाषेत लिहायला हवी. किंबहुना ती त्या सांगत असताना चित्रिकरण करून ठेवायला हवं. कारण त्यांची भाषा, त्यांच्या बोलण्यातली उत्कटता आपल्यासमोर ते दृश्य उभं करते. ती ताकद आपल्या प्रमाण भाषेत नाहीये. या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या सर्व कुटुंबाला भेटता आलं याचाही मला खूप आनंद झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT