Indian Agriculture
Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : शेतीशास्त्र अन् संस्कृतीत हवा सुसंवाद

Team Agrowon

डॉ. भास्कर गायकवाड - ९८२२५१९२६०

वाढती उपासमार आणि निसर्गाचा होणारा ऱ्हास यासाठी आजचे शेतीशास्त्र (Agriculture Science) उपयुक्त ठरत नसून मागील दहा हजार वर्षांपासून सुरू झालेल्या शेतीपद्धती आणि संस्कृती याबरोबर सुसंवाद व्हावा याची जाणीव जागतिक पातळीवर व्हावी.

आजच्या या प्रगत शेतीपद्धतीमुळे आम्ही निसर्गावर मात केली असा समज (गैरसमज) करून घेत असतानाच निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती (Indian Agriculture) केल्यामुळे अनेक समस्या- संकटांना सामोरे जावे लागत आहे. संशोधनातून अनेक नवनवीन तंत्रज्ञान (Agriculture Technology) विकसित होत असतानाच अनेक प्रश्‍नही निर्माण होत आहेत. संशोधक, नियोजनकर्ते आणि शासन यांच्या शेतीशास्त्राकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये बदल होण्याची गरज आहे.

महात्मा गांधींनी १० जून १९४७ रोजी एका सभेला उद्देशून आपल्या भाषणात सांगितले होते, पहिला धडा हा शिकला पाहिजे की आपण स्वावलंबी, स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होण्यासाठी आपल्या संस्कृतीचा विचार करून तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. आपल्या देशातील मोठ्या प्रमाणातील पशुधन सर्वांना दूध पुरवू शकते. दुधाचे उत्पादन कमी येते हा आपला दोष आहे.

देशातील हवामान, जमिनीची विभिन्नता आणि संस्कृतीच्या जिवावर आपण देशातील समाजालाच नव्हे तर जगातील समाजाला अन्न खाऊ घालू शकतो. मात्र त्यांच्या या वक्तव्याकडे ‘गांधीवादी तत्त्वज्ञान’ अशी हेटाळणी झाली आणि आपल्या स्वतःच्या वैभवाला (विभिन्न जमीन, हवामान, जैवविविधता, संस्कृती, परंपरा) मूठमाती देत परदेशी तंत्रज्ञान डोक्यावर घेतले.

आज आम्ही सांगतो, की देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. परंतु आजही जगाच्या उपाशी राहणाऱ्‍या संख्येच्या ३३ टक्के समाज आमच्या या खंडप्राय देशामध्ये आहे ही निश्‍चितच अभिमानाची बाब नाही. पंजाब, हरियानासारख्या राज्यांमध्ये पहिल्यांदा हरितक्रांती झाली. हरितक्रांतीपूर्वी तेथे पिकांमध्ये विभिन्नता होती. त्यामुळे तेथील जमीन, पर्यावरण चांगले होते. हरितक्रांतीनंतर भात, गहू यांचे उत्पादन वाढले. तेलबिया, कडधान्ये उत्पादन बंद झाले. त्याचा परिणाम जमीन, पर्यावरणावर झाला.

आज तेथील ९० ते ९५ टक्के जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.३० टक्क्यांच्या खाली आहे. तसेच ३५ ते ४० टक्के जमिनीचा सामू, क्षारता वाढून उत्पादकता घटली आहे. याचा परिणाम पीक उत्पादनावर झाला. तसेच तेथील शेतकऱ्‍यांची आर्थिक स्थिती बिघडून त्याचा परिणाम सामाजिक सुरक्षेवर झाला आहे. हीच परिस्थिती देशामध्ये तसेच जगामध्ये झाली आहे.

एक पीक पद्धती, नवीन तंत्रज्ञानाचा जास्त वापर आणि पारंपरिक ज्ञानाची केलेली हेटाळणी यामुळे आज शेती व्यवसाय जागतिक पातळीवर शाश्‍वत राहिलेला नाही. शेतीशास्त्राचा अवलंब करताना निसर्गाचा विचार केला जात नाही. इतर सजीवांप्रमाणेच मानवही निसर्गातील एक सजीव आहे. माणसाला बुद्धी जास्त दिल्यामुळे त्याने निसर्गाला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु निसर्ग कोणाचाही दास होऊ शकत नाही. या सर्व बाबींचा विचार पूर्वीच्या शेती पद्धतीमध्ये होता. निसर्गाचा विचार करूनच शेती व्यवसाय केला जात होता. शेती एक सांस्कृतिक नवनिर्मिती आहे. अशा पद्धतीची शेती पूर्वी केली जात होती.

हजारो वर्षांच्या शेती पद्धतीला संस्कृतीची जोड होती. अनेक चालीरीती आणि पद्धतीमागे शास्त्र होते. शेतीमधील या श्रद्धेला अज्ञानातून आम्ही अंधश्रद्धेचे रूप दिले. अमावास्येच्या दिवशी नांगरट न करणे, वड- पिंपळाची पूजा करणे, शेण-गोमूत्राला धनाचे- लक्ष्मीचे रूप देणे, जमीन व गायीला मातेचा दर्जा देणे, धान्याच्या राशीची पूजा करणे, श्रावणात जमिनीची मशागत न करणे यांसारख्या अनेक श्रद्धा- पद्धती होत्या. अर्थात, त्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. त्यासाठी शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे.

आजच्या प्रगत शेतीशास्त्रामध्ये मात्र शेतीसंस्कृतीला कोठेही स्थान देण्यात आले नाही. एका देशातील तंत्रज्ञान आंधळेपणाने दुसऱ्या देशात वापरले जाऊ लागले. तेथील हवामान, जमीन, राहणीमान, खाण्याच्या सवयी यांचा विचार केला गेला नाही. नैसर्गिक साधनसंपत्ती, जैवविविधता यांचाही प्रगत शेतीशास्त्रामध्ये विचार केला नाही. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, अशी म्हण आहे. परंतु प्रगत शेतीशास्त्रामध्ये तर रासायनिक शेतीला आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निविष्ठांचा मोठ्या प्रमाणात अवलंब झाला. त्यासाठी जमीन, पाणी आणि पर्यावरणाचा यथेच्छ वापर झाला. परिणामी, जमिनी नापिक झाल्या. पाणी विषयुक्त झाले.

अन्नधान्यामध्ये विषाचे प्रमाण वाढले. पूर्ण अन्न म्हटले जाणाऱ्‍या दुधात कीटकनाशकांचे अंश वाढले. शेती उत्पादन वाढले त्याबरोबर खर्चही वाढला, कर्जबाजारीपणा वाढला, आत्महत्या वाढल्या. शेतीचा उच्च दर्जा कनिष्ठ झाला. शेतीप्रधान देशामध्ये ही परिस्थिती तर इतर देशांची काय स्थिती? तेथे सरकारच्या अनुदानावर समाज शेती करतो, अन्यथा तेथे पुढे होऊन कोणीही शेती करायला तयार नाही, हे चित्र थांबले पाहिजे. यामध्ये बदल झाला पाहिजे.

निसर्ग टिकला तर सर्व समाज टिकेल. त्यासाठी शेती पद्धतीमध्ये योग्य बदल होण्याची गरज आज जागतिक पातळीवर सर्वांनाच झाली आहे. त्यामुळेच शेतीशास्त्र आणि संस्कृती यांचा अंतर्गत संवाद व्हावा आणि त्याद्वारे योग्य तंत्रज्ञान विकसित होऊन शाश्‍वत शेती उत्पादन मिळून शेतीला एक प्रतिष्ठा निर्माण झाली पाहिजे. यापुढील काळात कृषी संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित होत असताना सर्व बाबींचा एकात्मिक विचार करण्याची गरज आहे. नवीन तंत्रज्ञानाची पारंपरिक ज्ञान आणि संस्कृती यांच्याबरोबर योग्य सांगड घालण्याची गरज आहे.

तंत्रज्ञान कितीही चांगले असले तरी ते निसर्गाच्या विरोधात, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास करणारे असेल तर अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे टाळले पाहिजे. भारतासारख्या सांस्कृतिक देशामध्ये पूर्वजांनी अनेक शेती उत्पादन तंत्रज्ञान दिलेले आहेत. जगातील वनस्पती, प्राणी आणि एकूणच जीवसृष्टीपैकी ८० ते ९० टक्के जीवसृष्टी भारतामध्ये असून, याचा फायदा करून घेणे आवश्यक आहे. उत्पादन वाढविणे हाच उद्देश न ठेवता निसर्गाचे, सर्व जीवसृष्टीचे संवर्धन- संगोपन करण्याची जबाबदारी मनुष्यप्राण्यावर आहे.

शेतीकडे कारखानदारीच्या स्वरूपात न पाहता नवनिर्मिती करणारी एक नैसर्गिक साधनसंपत्ती, सुविधा म्हणून बघायला हवे. त्यासाठी मानवाचा निसर्गाबरोबरच योग्य सुसंवाद होण्याची गरज आहे. जंगले, जंगलातील जीवसृष्टी, प्राणिमात्र यांचाही सर्व निसर्ग आणि नैसर्गिक उपलब्धीवर मानवासारखाच हक्क आहे या दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे.

दरम्यान, अतिरेकीपणाने निसर्गातील साधनसंपत्तीची लूट केली तर निसर्गाचा थोडासा धक्का किती मोठ्या प्रमाणात असतो याची जाणीव मागील काही वर्षांपासून बघतोच आहोत. म्हणूनच मानवाच्या शाश्‍वत जीवनासाठी निसर्गाचा शाश्‍वत विकास करायला पाहिजे. निसर्गात जास्त ढवळाढवळ करून त्याचा क्रोध ओढवून घेणे मानवाला झेपणारे नाही. शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी शेतीशास्त्र आणि संस्कृती यांचा अंतर्गत सुसंवाद होणे आवश्यक आहे. या सुसंवादातूनच मानवाचे भविष्य सुखकर होणार आहे.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT