Rural Development Agrowon
ॲग्रो विशेष

Village Development : जलसंवर्धन, ग्रामविकासात ‘जीआयएस’ महत्त्वाचे...

Water Conservation : ग्रामविकास, जलसंवर्धनाच्या कामांचे नियोजन करताना उपलब्ध संगणक आणि इंटरनेट या तंत्रज्ञानाला उपग्रहामार्फत मिळणारी भौगोलिक माहितीची जोड देणे आवश्यक आहे. त्यासाठी जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम (जीआयएस) या साधन कसे उपयुक्त ठरते, ते आज समजाऊन घेऊयात.

Team Agrowon

सतीश खाडे

Importance of Geographic Information System : महाराष्ट्रात आज बहुतांशी गावात उच्चशिक्षित युवा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आहेत. गेल्या काही वर्षांत ग्रामसभा अधिकाधिक बळकट होत असून, ग्रामविकासामध्ये नवनवीन कल्पना मांडून अंमलबजावणीसाठी प्रयत्नही सुरू आहेत. गेल्या दीड दशकापासून केंद्र सरकारचा निधी थेट गावात पोहोचत आहे. त्याला जोड मिळत आहे, ती गावातील तरुणांनी एकत्र येत सुरू केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या आणि विविध खासगी कंपन्यांच्या ‘सीएसआर’ फंडाची आणि ‘एनजीओ’ मार्फत येणाऱ्या निधीची. यातील प्रत्येकाचा प्रमुख उद्देश आहे तो ग्रामविकासाचा. म्हणजेच गावाची समृद्धता सर्वार्थाने वाढवणे, टिकवणे याला महत्त्व आहे. ‘स्मार्ट व्हिलेज’ हा परवलीचा शब्द ठरत आहे. आता बहुतांश गावात संगणक आणि इंटरनेट पोहोचले आहे. ते नसले तरी स्मार्टफोन व त्या माध्यमातूनही इंटरनेट तर नक्कीच पोहोचले आहे. त्याचा वापर ग्रामविकास कामांच्या नियोजनात करण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानाला उपग्रहामार्फत मिळणारी भौगोलिक माहितीची जोड देणे आवश्यक आहे. त्यासाठी जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम (जीआयएस) या साधन उपयुक्त ठरू शकते.

विविध देशांनी आकाशात अनेक उपग्रह सोडले आहेत. आपली ‘भारतीय अंतराळ संस्था’(ISRO) ही चांद्रयान, मंगळयान, अनेक उपग्रह, रॉकेट्स यांची निर्मिती करत असते. त्यांनी अवकाशात सोडलेल्या उपग्रहाद्वारे जमिनीवरील, समुद्रावरील असंख्य बाबींची माहिती टिपून साठवली जाते. हे साध्य होते, ते भौगोलिक माहिती प्रणालीमुळे. ही माहिती सामान्यतः नकाशे आणि छायाचित्राच्या स्वरूपात उपलब्ध केली जाते. कारण काही माहितीसाठी शुल्क असले तरी लोकहिताच्या व ग्रामविकासासंबंधात बहुतांश सर्व माहिती सर्वासाठी मोफत उपलब्ध आहे. या माहितीचा उपयोग आपल्या गावातील विविध संसाधने, विकासकामे व जलसंवर्धनाच्या कामांच्या नियोजनासाठी करणे शक्य आहे.

पाणी नियोजनात उपयोगात येणारी माहिती

गावच्या सीमा, गावातील सूक्ष्म पाणलोटाच्या सीमाही उपग्रहावरील माहितीमध्ये दिसतात. हे पाणलोट एकापेक्षा अधिक असतील तर तेही दिसतात. या पाणलोट क्षेत्राचे चढ व उतार (समुद्रसपाटीपासूनची उंची, कंटूर लेव्हल) आकडेवारीसह दिसतात. म्हणजे गावातील ओढा, नाला किंवा नदीला येणारे पाणी कुठपासून जमा होत कसे कसे वाहत येते, ते अभ्यासता येते.

गावातील छोटे-मोठे सर्व प्रवाह एकाच वेळी दिसतात. ते कुठे कुठे मोठ्या प्रवाहाला मिळतात, त्यांना कोणत्या दिवशी पहिल्या पावसाचे पाणी आले यापासून रोज वाहणारे पाणी, पात्राच्या बदलणाऱ्या सीमा, (म्हणजेच आलेला पूर, पुराच्या सीमा, प्रवाह कधी आटायला सुरू झाला, तो हळूहळू आटत पूर्ण कधी आटला वगैरे.) सर्व माहिती पाहता येते. त्याच्या अगदी १९९० पासूनची रोजची छायाचित्रे उपलब्ध आहेत.

नैसर्गिक जलस्रोतातून पाणी वाहिले, बंधाऱ्यात अडवले किंवा तळे भरले, रिकामे झाले इतकेच काय, मानवनिर्मित मोठ्या शेततळ्यांतील पाणीसाठ्याची बदलती अवस्था, त्यांच्या तारखा, कालावधी अभ्यासता येतो. मग त्यावर आधारित नियोजनाचे अचूक निर्णय घेता येतात.

पावसाळ्यात जलस्रोतांत (उदा. तळी, बंधारे, ओढे, नदी, शेततळे) आलेले पाणी जमिनीत मुरून ते किती दूरपर्यंत पोहोचते, याचीही माहिती निरीक्षणातून मिळते. जलस्रोतातील वाढलेल्या पाण्याच्या पातळीने जमिनीत मुरलेले पाणी व त्यातून बहरलेली शेती व आटल्यानंतर कोणत्या परिसरात वाळलेली शेती दिसते, यावरून या पाण्याच्या प्रवासाचा अभ्यास करता येतो. मग त्यावर आधारित केलेले पाणी नियोजन अधिक अचूकतेचे जाऊ शकते.

गावाच्या पूर्ण क्षेत्राचे निरीक्षण एकाच नकाशावर एकाच वेळी करता येते. या छायाचित्रे व नकाशे स्वरूपातील माहितीमुळे पाणलोटाचे क्षेत्रफळ, जंगल क्षेत्र, पडीकक्षेत्र, दलदलीचे क्षेत्र, शेतीखालील क्षेत्र अशा सर्व क्षेत्रांची माहिती मिळते.

याबरोबरच उपग्रह त्या क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचीही नोंद करतो. या मिळणाऱ्या माहितीमुळे किती मि.मी. पाऊस झाल्यावर ओढे, नाले, नदीला किती पाणी येईल; त्या प्रवाहाची पात्रात रुंदी किती असेल, पाण्याचा प्रवाह (रन ऑफ) किती असेल हेही काही सोपे गणिताने काढता येते. यातून संभाव्य पूर परिस्थितीसह विविध बदलांवर लक्ष ठेवता येते. आपल्याला पूर्व नियोजन करता येते.

प्रवाहाच्या पूर रेषा ठरवता येतात. पूर रेषांच्या आत बांधकामे व काही अडथळे निर्माण झाले असतील तर त्याचीही नोंद होते. योग्य ती कार्यवाही व नियोजन करता येते. ओढ्याच्या जवळ काही विकासकामे करायचे असतील तर त्या संबंधित निर्णय घ्यायलाही त्याचा उपयोग होतो.

पाणी साठवणूक कुठे केली म्हणजे ते जास्तीत जास्त उपयुक्त ठरेल यावर आधारित बंधाऱ्यांची, तलावाची जागा ठरवता येते.

जलस्रोतात एकूण पाणी किती साठले आहे, हे सहसा कोणी मोजत नाही. त्याचे मुख्य कारण बंधाऱ्यात किंवा तलावात साठलेल्या पाण्याचा आकार खूपच अनियमित असतो. या छायाचित्रांना अन्य तंत्राची जोड दिल्यास त्याचे क्षेत्रफळ क्षणात काढता येते. साठलेल्या पाण्याची उंची माहीत झाली की घनफळ काढता येते. घनफळ म्हणजे त्या तलावात साठलेले पाणी. त्याद्वारे किती एकर क्षेत्र पाट पाण्याने वा सूक्ष्म सिंचनाने भिजवता येईल, याचेही गणित करता येते.

उपग्रह आपल्याला जमिनीलगतच्या खडकांविषयी माहिती देतो. उदा. खडकाचे प्रकार, त्यांची रचना, त्यांची पाणी साठवणूक शक्यता इ. या माहितीवर आधारित कुठे पक्का पाषाण आहे, कुठे सछिद्र खडक आहे हे समजते. त्याचा उपयोग विंधन विहीर, विहीर तळे, बंधारा बांधकाम यांच्या जागा ठरवण्यासाठी हमखास होतो. तसेच पाणलोट क्षेत्रावर करावयाच्या विविध रचनांच्या जागाही बिनचूक ठरवता येतात. उदा. सी.सी.टी., फार्म बंडिंग, ट्रेनचेस, बोल्डर डॅम, रिचार्ज शाफ्ट, गॅबियन बंधारा इ.

गावातील शेतीखालील क्षेत्रामध्ये पिके, गायरान, जंगल, बागायती, जिरायती किती व कोठे आहे हे समजते. त्याला भूमिअभिलेख विभागाच्या नकाशाची जोड दिल्यास प्रत्येक शेतकऱ्याच्या सीमा, त्यात झालेले अतिक्रमण, वापरात झालेला बदल या बाबीही समजू शकतात. बरे ही माहिती रोज नोंदवली जात असल्याने त्यातील थोडाही बदल व कधी झाला हे स्पष्टपणे कळते. इतकेच नाही तर कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे आणि कोणाच्या शेतात कोणते पीक आहे (थोडक्यात पीकपाहणी) हेही बघता येते.

वन क्षेत्रातील वनांचे प्रकार, त्यांच्या सीमा, त्यांचे क्षेत्रफळ, त्यांच्या जागा हेही सहज साध्य नोंदवलेले सापडते, उदा. बांबू वन, कुरण, सागवान वन, इ.

कोणती पिके सुदृढ आहेत, कुठल्या शेतातील पिके भुकेली किंवा तहानलेली आहेत, पानांच्या रंगावरून त्यातील अन्नद्रव्यांची कमतरताही सांगता येते. त्यामुळे खते, पाण्याचे नियोजन करणे शक्य होते.

पावसामुळे मातीची धूप कोठे व किती प्रमाणात होते आहे, कोणती शेते वाहून गेली हे समजते. ते वाचवण्यासाठी संभाव्य उपाययोजना आखता येतात.

कोणत्याही आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे अचूक करता येतात. कारण आपत्तीपूर्वीची पिकाची, गावाची, संपत्तीची अवस्था आणि आपत्तीनंतरची अवस्था याचा भक्कम पुरावा तयार झालेला असतो.

गावच्या जमिनीचे प्रकार व मृदा नकाशे उपग्रहाने काढलेले फोटो आणि इतर प्रणाली यामुळे तयार झालेले आहेत. तेही उपलब्ध असतात. त्यावर आधारित पीक निवड, त्याला द्यावयाच्या अन्नघटकांचे नियोजन करता येते.

गवत पट्ट्यात, डोंगरावर, जंगलात लागलेले वणवे आणि वणव्यामुळे जळालेले क्षेत्र यांच्याही नोंदी मिळतात. दरवर्षी वणव्यामुळे किती क्षेत्राचे नुकसान होते, याची माहिती मिळू शकते. ती अभ्यासून उपाययोजना आखता येतात.

कोकणातील समुद्रकाठाच्या गावात खाड्यांचे क्षेत्र, त्यामध्ये भरत चाललेला गाळ, पाण्याच्या बदलत्या रंगावरून प्रदूषणाची तीव्रता, कांदळवनांचे घटते वा वाढते क्षेत्र यांसारख्या अनेक बाबींच्या अचूक नोंदी सापडतात.

गेल्या ४०-४५ वर्षांची गावच्या सर्वांगीण माहितीचा मागोवा घेता येतो. त्यावर गावच्या सर्व बाबतीत झालेला बदल, त्याच्या निश्‍चित तारखा, बदलाचे प्रभावक्षेत्र अशा अनेक बाबींचा संदर्भ आपल्याला मिळतो. त्यावरून कोणकोणत्या वर्षी दुष्काळ पडला होता, त्याची व्याप्ती, परिणाम किंवा कोणत्या वर्षी पूर आले, त्याची व्याप्ती, परिणाम यांचाही आढावा घेता येतो.

अशी सर्व माहिती दररोज नोंदवून साठवली जात असते. ती २४ तासांनंतर पाहण्यास उपलब्ध होते. तिचा उपयोग करून ग्रामविकास किंवा जलसंधारण, संवर्धनाच्या कामांमध्ये अचूकता आणता येईल. पुढील भागात ही माहिती उपग्रहाद्वारे कशी नोंदवली जाते, ते पाहू.

सतीश खाडे, ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT