Ginger Production Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Production : आल्याच्या खोडव्याने दिले घवघवीत यश

Ginger Crop : अभ्यास व हुशारी आली कामी

Team Agrowon

संतोष मुंढे

Ginger Success Story : सुलतानपूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील प्रयोगशील शेतकरी दीपक चव्हाण यांनी केवळ पीक उत्पादन, दर्जा यावरच भर दिलेला नाही. बाजारभाव, आनुषंगिक परिस्थितीचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. म्हणूनच यंदा मार्चमध्ये विक्रमी दर असून, आल्याची विक्री त्या वेळी न करण्याचा संयम बाळगला. ऑगस्टपर्यंत खोडवा व्यवस्थापन केले. उत्पादन वाढवले. काढणीचे टप्पे व व त्यानुसार विक्री करीत चांगल्या दराने या पिकात घवघवीत यश व समाधानही कमावले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानपूर येथील युवा शेतकरी दीपक चव्हाण यांची प्रयोगशील व प्रगतिशील, अभ्यासू शेतकरी अशी ओळख आहे. वडील पांडुरंग यांच्या तीन मुलांपैकी सर्वात मोठे प्रवीण ‘कॉन्ट्रॅक्‍टर’. दुसऱ्या क्रमांकाचे सुभाष व तिसऱ्या क्रमांकाचे दीपक वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीची पूर्ण जबाबदारी सांभाळतात. एकूण ५५ एकर शेती आहे. यंदा १० एकरांत हिरवळीचे पीक, पाच एकरांत ‘अमृत पॅटर्न’ पद्धतीने कपाशी, सहा एकर सोयाबीन व अन्यमध्ये कलिंगड, ३० गुंठे हळद, अडीच एकर फ्लॉवर अशी पिके आहेत.

शेतीतील मास्टर दीपक

दीपक यांच्या कुटुंबाने तीस वर्षांपासून आले पिकात सातत्य ठेवले आहे. त्यांच्या आले शेतीतील प्रयोगांची दहा वर्षांपूर्वी ‘ॲग्रोवन’मध्ये यशकथा प्रसिद्ध झाली. वेळोवेळी व्यवस्थापनात सुधारणा, बदल व काटेकोरपणा आणत त्यांनी एकरी उत्पादन व दर्जा वाढवला आहे. बाजारपेठ व हवामानाचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यातूनच दरवर्षी पिकांचे क्षेत्र ते निश्‍चित करतात. स्वरूप शेतकरी उत्पादक कंपनीही त्यांनी स्थापन केली आहे.

आले पिकातील प्रयोगशीलता

अगदी सुरुवातीला सरी वरंबा, त्यानंतर साडेचार फुटी बेड, सिंगल लॅटरल अशी लागवड असायची. आता पाच फुटी बेड, दोन बेडमध्ये १० इंच अंतर, दोन ओळींत एक फूट, दोन कंदांमध्ये ७ ते ८ इंच अंतर व डबल लॅटरल अशी पद्धत असते. पूर्वी बैलचलित अवजाराच्या साह्याने मातीची भर लावली जायची. आता पॉवर टिलरच्या वापराने श्रम कमी केले आहेत. संपूर्ण ५५ एकरांत ठिबक, जैविक खते, बुरशीनाशके, विद्राव्य खते यांचे काटेकोर नियोजन करून एकरी १२५ ते १४० क्विंटल असे उत्पादकतेत सातत्य आहे.

दरवर्षी १० एकर असलेले आले क्षेत्र यंदा १३ एकरांवर नेले आहे. दीपक यांच्या अनुभवानुसार आले पिकात पाच वर्षापैकी तीन वर्षे मंदी किंवा बरोबरी तर दोन वर्षे उत्पन्नाची असतात. मागील तीन वर्षे मंदीचा काळ होता. यंदा व पुढील वर्षी या पिकात पैसे मिळतील या आशेने यंदा क्षेत्र वाढविले. सन २०२५ च्या जूनमध्ये पुन्हा क्षेत्र कमी केले जाईल असे नियोजन आहे.

मागील वर्षांचे हुशारीचे नियोजन

मागील वर्षी साडेसहा एकर क्षेत्र होते. मे २०२२ मध्ये लागवड होती. त्याची काढणी मार्च २०२३ मध्ये आली. त्या वेळी दर क्विंटलला १५ हजार रुपये असे होते. मागील तीन वर्षे हेच दर दोन हजार ते चार हजार या दरम्यान अत्यंत कमी असल्याने घरच्यांनी या विक्रमी दरात विक्रीचा आग्रह धरला. उत्पादनही एकरी १२५ क्‍विंटलपर्यंत अपेक्षित होते.

पण दीपक यांनी अनुभव, अभ्यास, कौशल्य व बाजारपेठेचे विश्‍लेषण यांचा पुरेपूर वापर केला. ऑगस्टपर्यंत खोडवा ठेवला तर उत्पादन किमान दीड पट वाढणार होते. साहजिकच त्या वेळी दरही चांगले राहून चांगले पैसे होण्याची शक्यता व संधीही होती. फक्त संयम बाळगणे गरजेचे होते.

हुशारी कामी आली

मार्चच्या दरम्यान एकरभरातील प्लॉटची काढणी बेण्यासाठी केली. ऑगस्टच्या पहिल्या टप्प्यात
दर सुमारे १३ हजार रुपये होते. त्यावेळी काही क्षेत्रावरील आले विक्रीचा निर्णय घेतला. खोडव्याच्या एकरी २४५ क्विंटलपर्यंत मिळालेल्या उत्पादनाची विक्री जागेवरच झाली. व्यापाऱ्याकडे काढणीचे नियोजन होते. ऑगस्टच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील विक्री केली.

त्या वेळीही साधारण हाच दर होता. त्या वेळी एकरी उत्पादन २७५ क्विंटल मिळाले होते. आता अजून साडेतीन एकरांतील खोडवा ठेवला असून, त्याचे एकरी ३०० क्विंटलपर्यंत उत्पादन अपेक्षित आहे. मार्चमध्ये दर जास्त होते पण एकरी उत्पादन खोडव्याच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे ऑगस्टपर्यंत थांबण्याचा निर्णय सार्थ ठरून या पिकात
उत्पादन व उत्पन्नाच्या अंगाने घवघवीत यश मिळाले.

टोमॅटोही फायदेशीर

बाजारपेठ व आवक यांचा अभ्यास करून पीक नियोजनाला महत्त्व देणाऱ्या दीपक यांनी यंदा मेमध्ये ३२ गुंठ्यांत टोमॅटो घेतला. आतापर्यंत ७०० क्रेट (प्रति २२ किलो) विक्री झाली. सुमारे १७०० रुपयांपासून २६००, ३२५० व नंतर ६०० रुपये प्रति क्रेट दर मिळाले. त्यातून काही लाखांचे समाधानकारक उत्पन्न मिळाले. अजून सुमारे २५० क्रेट उत्पादन व उत्पन्न अपेक्षित आहे.

आले व्यवस्थापन- ठळक बीबी

-पुढील दर दहा दिवसांचे नियोजन फळ्यावर लिहिले जाते. मागील दहा दिवसांत झालेल्या कामांवरही ‘टीकमार्क’ होते. घरच्या सर्व सदस्यांकडून या कामांची अंमलबजावणी.
-दर चार वर्षांनी पीक फेरपालट.
-खते देण्यावेळी माती लावल्याने खोडवा कंदाला विस्ताराची संधी.
-गिरजा प्रकल्पावरून दोन पाइपलाइन्स. दीड एकरात शेततळे.
-सुरुवातीला गरजेनुसार. तर खोडव्यात २५ मार्चपासून एक दिवसाआड डबल लॅटरलच्या साह्याने ताशी दोन लिटर डिस्चार्ज दराने पाणी.
-मध्य प्रदेशातील २५ मजुरांना कायमस्वरूपी रोजगार.
-स्युडोमोनास, बॅसिलस व ट्रायकोडर्मा यांचा लागवडीनंतर चार महिन्यांपर्यंत ठिबकद्वारे वापर.
(प्रत्येकी १५ ते २० दिवसांनी). त्यामुळे मर रोगाला अटकाव करणे शक्य झाले.
-दरवर्षी एकरी पाच ट्रेलर शेणखताचा वापर.
-खोडव्यापर्यंतचा एकरी खर्च दीड लाखांपर्यंत.
-दीपक यांचा शासनाच्या शेतीनिष्ठ व ‘१ॲग्रोवन’च्या युवा शेतकरी पुरस्काराने सन्मान.

दीपक चव्हाण ९४२१३०५५५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT