Agrowan Excellence Award
Agrowan Excellence Award Agrown
ॲग्रो विशेष

Agrowan Excellence Award : शेतीपूरक व्यवसायातून समृद्ध व्हा

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः ‘‘शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला ‘शेतीच्या बाहेर पडा’ असा सल्ला दिला जातो आहे. मात्र त्याचा अर्थ कृषी व्यवस्था (Agriculture Economy) सोडून नोकरीसाठी शहराकडे स्थलांतरित होणे, असा होत नाही. तंत्रकौशल्यातून शेतीपूरक व्यवसायाची जोड देत नफा कमवीत समृद्धीचे मार्ग स्वतः तयार करणे यात अपेक्षित आहे. शेतकऱ्यांकडून चालविला जाणारा नर्सरी उद्योग त्याचे आदर्श उदाहरण होय,’’ असे उद्‍गार साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी काढले.
दर्जेदार रोपवाटिका (नर्सरी) उभारून फलोत्पादन व भाजीपाला उत्पादनात राज्याला अग्रेसर ठेवणाऱ्या जिद्दी नर्सरीचालकांना मंगळवारी (ता. १३) पुण्यात एका दिमाखदार सोहळ्यात ‘अॅग्रोवन एक्सलन्स अॅवॉर्ड’ (Agrowan Excellence Award) देण्यात आले. त्या वेळी श्री. गायकवाड बोलत होते. व्यासपीठावर फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण होते.

आपल्या खुमासदार भाषणातून श्री. गायकवाड यांनी शेतकरी पुत्रांच्या बदलत्या व्यवसायाभिमुख कतृत्वशैलीचे कौतुक केले. ‘‘इतक्या दिमाखदार पद्धतीने नर्सरीचालकांचा सन्मान यापूर्वी झाला नसेल. दुष्काळात, कष्टात शेतकऱ्यांच्या कितीतरी पिढ्या गेल्या. आता दिवस आपले आहेत. शेतकऱ्यांना आता शेती कशी करावी हे सांगण्याची गरज नाही. आपल्याला आधुनिक तंत्र, प्रभावी व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीची माहिती मिळवत पूरक व्यवसाय उभारावे लागतील. त्यासाठी अॅग्रोवन भक्कमपणे तुमच्या सोबत आहे. शेतकरी आता नर्सरी व्यवसायातून समृद्धीच्या वाटेवर चालू लागला आहे. आता नर्सरीवाल्याला मुलगी देण्यास कोणी हरकत घेणार नाही (हशा),’’ असे ते म्हणाले.

नर्सरीचालक क्रांतीचे शिल्पकार
फलोत्पादन संचालक डॉ. मोते म्हणाले, की हवामान बदल, कीड-रोगांचा सामना, विक्रीमधील हालअपेष्टा अशा सर्व समस्यांना सामोरे जात कष्टाने गुणवत्तापूर्ण कलमे व रोपांची निर्मिती रोपवाटिकाचालक करीत आहेत. त्यांच्यामुळेच राज्यात फलोत्पादन व भाजीपाला क्षेत्राचा विस्तार झाला. पारंपरिक शेतीत फलोत्पादनामुळे क्रांती घडली व शेतकरी कुटुंबातील नर्सरीचालकच या क्रांतीचे शिल्पकार आहेत. अॅग्रोवनकडून कष्टकरी व जिद्दी नर्सरीचालकांचा होत असलेला हा गौरव कृषी क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे.

राज्यातील रोपवाटिका क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे डॉ. मोते म्हणाले. ‘‘शेतकऱ्यांना दर्जेदार लागवड साहित्य उपलब्ध होण्यासाठी कायद्यात बदल करण्याची प्रक्रियादेखील सुरू आहे. राज्यात चार भागांमध्ये नर्सरी हब तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. रोपवाटिका उभारणीला प्रोत्साहन मिळण्यासाठी सरकारी योजनेतील मापदंडात बदल करण्याची शिफारस राज्याने केंद्राकडे केली आहे. कृषिविषयक धोरणात्मक बाबी आखताना राज्यातील रोपवाटिका चालकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील,’’ अशी ग्वाही डॉ. मोते यांनी दिली.

शेती उन्नतीसाठी ‘अॅग्रोवन’चा वसा
‘‘सकाळ माध्यम समूहा’चा ‘अॅग्रोवन’ गेल्या १७ वर्षांपासून शेती आणि ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी वसा म्हणून काम करतो आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणारी विविधांगी माहिती पुरवितानाच सरपंच महापरिषद, एफपीसी महापरिषद, कृषी प्रदर्शन, मेळावे आणि कृषी उद्योजकांचा सन्मान करणारे उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत,’’ असे ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक श्री. चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले. या वेळी त्यांनी नर्सरी उद्योगाच्या वाटचालीचा आढावा घेत नर्सरीचालकांच्या समस्याही मांडल्या.

शेतकऱ्याची किमया
‘‘कष्टकरी शेतकऱ्यांच्या जिद्दीमुळे पुढील काळात शेतीत फार मोठे बदल होणार. यंदा राज्यातील साखर कारखान्यांनी एक लाख कोटी उलाढाल केली आहे. यातून ४२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात गेले आहेत. ही किमया कारखान्यांची नव्हे, तर केवळ शेतकऱ्यांची जिद्द आणि कष्टातून घडली आहे,’’ असे गौरवपूर्ण उद्‍गार साखर आयुक्तांनी काढले.

‘अॅग्रोवन एक्सलन्स ॲवॉर्ड’चे मानकरी
राजेंद्र ठोंबरे, ठोंबरे फार्म अॅण्ड नर्सरी (खामगाव, जि. सोलापूर), ऋषिकेश तुपे, हिंदुस्थान हायटेक (पिंपरी, जि. सातारा), शार्दूल गोलंदे, भाग्यलक्ष्मी कन्सल्टन्सी कंपनी (औरंगाबाद), दिगंबर खांडरे, स्नेहल किसान नर्सरी (हिंगणघाट, जि. नागपूर), आदित्य गणेश गुळमे, बायोटेक पार्क करकंब (करकंब, जि. सोलापूर), महेश रसाळ, कृषिमित्र अॅग्रो इम्पेक्स प्रा.लि. (महाबळेश्‍वर, जि. सातारा), डॉ. दत्तात्रय सावंत, लॉर्डस नर्सरी (शेंद्रा, जि. औरंगाबाद), कैलास माळी व पांडुरंग माळी, जे. के. रोपवाटिका (कुरपळ, जि. सांगली), रवींद्र प्रभुदेसाई, पीतांबरी (मुंबई), अशोक उंडे, उंडे नर्सरी (बाभूळगाव, जि. नगर), राजेंद्र नन्नवरे, राजेंद्र नर्सरी (अरणगाव, जि. नगर), संतोष कुरकुटे, व्हिजन अॅग्रिटेक (माळकूप, जि. नगर), बी. ए. वरणकर, ग्रीनगोल्ड रोपवाटिका (सावनेर, नागपूर), भूषण निकम, साई यश नर्सरी (रायपूर, जि. नाशिक), विकांत काले, संकेत नर्सरी, (वाकडी खंडोबाची, जि. नगर), संदीप माळी व उमेश सोनार, देवेंद्र नर्सरी, (मोरफळ, जि. जळगाव), सोमनाथ अंबेकर, सत्यम् शिवम् नर्सरी (कोळपा, जि. लातूर), राजेश गावडे, गावडे नर्सरी (जुन्नर, जि. पुणे).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT