Organic Jaggery : सेंद्रिय गूळ, हळदीचा तयार केला ब्रॅण्ड

गोवे (ता.जि. सातारा) येथील सचिन विठ्ठल गोरे यांनी गेल्या दहा वर्षांपासून सेंद्रिय घटकांचा वापर करत जमिनीचा कस वाढवत नेला. नैसर्गिक शेती पद्धतीने उत्पादित सेंद्रिय हळद, गुळाचा ज्ञानेश्‍वरी हा ब्रॅण्ड करत त्यांनी शहरात स्वतंत्र ग्राहक तयार केला. शेतीला पूरक उद्योग म्हणून खिलार गाईचे संगोपन करत त्यापासून दूध, तूप विक्रीचे त्यांनी नियोजन केले आहे.
Organic Jaggery
Organic JaggeryAgrowon

सातारा तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावर गोवे हे गाव आहे. गावशिवारात सर्वाधिक ऊस आणि हळद लागवड आहे. या गावातील सचिन विठ्ठल गोरे हे प्रयोगशील शेतकरी. त्यांची तीन एकर बागायती शेती आहे. बारावी शिक्षण सुरू असतानाच त्यांनी शेती नियोजनात लक्ष देण्यास सुरुवात केली. या काळात ते इतर शेतकऱ्यांच्या प्रमाणे पिकांना प्रामुख्याने रासायनिक खतांचा वापर करत होते. या दरम्यान २०१२ मध्ये कृषी विभागातर्फे गावामध्ये शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कृषी सहायक अजय कांबळे यांनी सेंद्रिय शेती (Organic Farming) व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. रासायनिक खतांच्या (Fertilizer) अतिवापरामुळे जमीन सुपीकता आणि मानवी शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन गोरे यांनी रासायनिक खतांचा वापर बंद करून सेंद्रिय निविष्ठांच्या वापरावर भर देण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी तांत्रिक माहिती गोळा केली, प्रशिक्षणदेखील घेतले. प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटी देऊन तंत्रज्ञान समजून घेतले.

Organic Jaggery
Farmers Planning शेतकरी नियोजन: हळद

जमीन सुपीकतेवर भर

सचिन गोरे यांनी रासायनिक शेती त्यानंतर सेंद्रिय शेती आणि आता नैसर्गिक शेती पद्धतीवर भर देत पीक व्यवस्थापनास सुरुवात केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून जमीन सुपीकतेसाठी त्यांनी जिवामृत, घन जिवामृत, गोकृपा अमृत, वेस्ट डीकंपोझर आणि पाचट आच्छादनावर भर दिला आहे. टप्प्याटप्प्याने त्यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यात यश मिळविले. गोरे हे स्वतः सर्व सेंद्रिय निविष्ठा शेतामध्येच तयार करतात. यासाठी त्यांनी आठ खिलार गाईंचे संगोपन केले आहे. पीक व्यवस्थापनात गोमूत्र, जिवामृत आणि दशपर्णी अर्काचा जास्तीत जास्त वापर केला जातो. बेलफळापासून बिल्व रसायन तयार केले जाते. त्याची पिकावर गरजेनुसार फवारणी करतात. यातून सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.

कुटुंबाची मिळाली साथ...

तीन एकर शेती आणि खिलार गो संगोपनामध्ये सचिन यांना आई, वडील, बंधू संदीप आणि पत्नी स्वाती यांची मोलाची साथ मिळाली आहे. याचबरोबरीने शेती व्यवस्थापनामध्ये पूनम राऊत, तात्या मगर तसेच कृषी सहायक अजय कांबळे, रमेश जाधव यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्याचे सचिन गोरे सांगतात.

Organic Jaggery
औरंगाबाद झाले संभाजीनगर, उस्मानाबाद धाराशिव ! हिंगोलीत हळद संशोधन केंद्र

सेंद्रिय गूळनिर्मिती ः

सचिन गोरे हे सेंद्रिय पद्धतीने ऊस व्यवस्थापन करतात. दरवर्षी एक एकरावर को-८६०३२ या जातीची लागवड असते. उसाला जिवामृत, घन जिवामृत, गोकृपा अमृत, पाचट आच्छादनाचा वापर करतात.

- जमीन सुपीकतेमुळे त्यांना एकरी ४० ते ४५ टन उत्पादन मिळते. हा सगळा ऊस गूळ निर्मितीसाठी वापरतात.

- कोणतीही रसायने न वापरता सेंद्रिय गूळ निर्मिती. भाडेतत्त्वावर गुऱ्हाळघरामध्ये स्वतः उपस्थित राहून गूळनिर्मितीवर देखरेख.

- गूळनिर्मिती करताना वेलची, तूप, सुंठ पावडरचा वापर. प्रति एकरातील उसापासून साडेचार टन गूळ उत्पादन.

- गुळाची १२० रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री. विक्रीसाठी एक किलो ते पाच किलोची ढेप. ग्राहकांच्या मागणीनुसार ५ ग्रॅम ते ३० ग्रॅम क्यूब निर्मिती.

- सेंद्रिय काकवीची १५० रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री.

- ऊस लागवड, गूळनिमिर्ती, वाहतूक, पॅकिंग, विक्रीपर्यंत एकूण सुमारे एक लाख ६० हजार रुपयांपर्यंत खर्च. गूळ,काकवी विक्रीतून

खर्च वजा जाता ४० टक्के नफा.

नैसर्गिक हळदीचे उत्पादन ः

गोरे हे २०१३ पासून दरवर्षी २० ते ३० गुंठे क्षेत्रावर हळदीच्या सेलम जातीचे नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थापन ठेवतात. हळद काढणीनंतर योग्य पद्धतीने शिजवून सुकवली जाते. त्यानंतर पॉलिश करून साठवून ठेवली जाते. मागणीनुसार हळद पावडर करून विक्री होते. हळदीमध्ये कुरक्युमीनचे प्रमाण ४.८७ टक्के आहे. विक्रीसाठी हळदीचे २५० ग्रॅम, अर्धा किलो, एक किलो पॅकिंग केले जाते. हळदीची ४०० रुपये प्रति किलो दराने विक्री होते. विविध शहरांत दरवर्षी सहा क्विंटल हळद पावडर विक्री होते.

खिलार गाईंचे संगोपन

सचिन गोरे यांनी यांनी नैसर्गिक शेतीची कास धरल्यापासून खिलार गाईंच्या संगोपन सुरवात केली. त्यांनी सुरवातीस एक खिलार गाय घेतली. सध्या त्यांच्या गोठ्यात आठ गाई आहेत. गाईंना पुरेसा हिरवा, सुक्का चारा तसेच मूरघासदेखील दिले जाते. या गाईंपासून दिवसाला १२ ते १५ लिटर दूध उत्पादन मिळते. यातील निम्मे दूध तूप निर्मितीसाठी वापरले जाते. उर्वरित दुधाची सातारा शहरात १०० रुपये लिटर या दराने विक्री केली जाते. तुपाचे २५० ग्रॅमपासून एक किलोचे पॅकिंग केले आहे. तुपाची ३,२०० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जाते.

शेतीची वैशिष्ट्ये ः

- जमीन सुपीकतेला महत्त्व देत पिकांचे नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थापन. तीन एकरांपैकी एक एकरावर ऊस, ३० गुंठ्यांवर हळद, उर्वरित क्षेत्रावर वर्षभर हंगामनिहाय विविध भाजीपाला पिके, चारा पिकांचे नियोजन. मुख्य पिकात सापळा पिकांची लागवड. उसात पाचट आच्छादन.

- उपलब्ध क्षेत्रानुसार ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला लागवड. काळा गहू, काळी कुसळी, शुगर फ्री गव्हाच्या पारंपरिक जातींचे संवर्धन.

- जिवामृत, दशपर्णी, गोकृपा अमृतम, घन जिवामृत, बेलापासून बिल्व रसायन, दशपर्णी अर्क यांचा जास्तीत जास्त वापर करत भांडवली खर्चात बचत.

- गोमूत्र, शेणाची उपलब्धता तसेच पूरक उद्योगासाठी खिलार गाईंचे संगोपन.

- ‘ज्ञानेश्‍वरी ब्रॅण्ड’ने सेंद्रिय गूळ, काकवी, हळद, खिलार गाईच्या तुपाची विक्री.

- सातारा, कराड, पुणे, मुंबई शहरांत मित्र मंडळी, तसेच नातेवाइकांच्या साथीने थेट ग्राहकांपर्यंत शेतीमाल विक्रीचे नियोजन.

संपर्क ः सचिन गोरे, ९७६३२३९५५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com