Pune News : कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम सध्या सर्व कृषी योजनांचा बारकाईने अभ्यास करीत असून, कामकाजाला गती देणारी एक वेगळी प्रणाली ते विकसित करीत आहेत. कोणती योजना राबविण्यात कोणता विभाग पिछाडीवर किंवा आघाडीवर असल्याचे ही प्रणाली सांगणार आहे. या ‘गेडाम पॅटर्न’विषयी आता क्षेत्रिय पातळीवर देखील उत्सुकता पसरली आहे.
‘आयएएस’ झाल्यापासूनच डॉ. गेडाम हे सेवेतील प्रभावी कामकाजाने राज्यभर परिचित आहेत. ‘एमबीबीएस’असलेले डॉ. गेडाम २००२ मधील महाराष्ट्र तुकडीतून भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्यांनी जळगावचे महापालिका आयुक्त म्हणून घरकुल योजनेतील गैरव्यवहाराचा पाठपुरावा केलाच; पण स्वतः पोलिसांकडे तक्रार करीत अनेक राजकीय पुढाऱ्यांना तुरुंगात पाठविले होते.
लातूर, सोलापूर, धाराशिव व नाशिक भागांत विविध पदांवर त्यांनी केलेली सेवा चर्चेत होती. आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केंद्रात देखील त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली. त्यामुळे कृषी आयुक्त म्हणून डॉ. गेडाम नव्याने नेमके काय करणार, याविषयी कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
आयुक्तलायच्या सूत्रांनी सांगितले, की डॉ. गेडाम प्रत्येक योजनेचा बारकाईने अभ्यास करीत आहेत. केंद्र व राज्याकडून अनेक शेतकरी कल्याण योजना राबवल्या जातात. तसेच आपत्कालीन स्थितीत उद्भवणारे विषय सतत हाताळावे लागतात. परिणामी, इतर खात्यांपेक्षा कृषी खात्याचे काम अधिक क्लिष्ट व संवेदनशील असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले.
मुळात कोणती योजना कोणत्या टप्प्यात आहे, हेदेखील स्पष्ट करणारी प्रणाली सध्या नाही. त्यामुळे आयुक्तालयापासून ते तालुका पातळीपर्यंत प्रत्येक योजनेच्या कामकाजाला गती देणारी किंवा आढावा घेणारी प्रणाली तयार करायला हवी, असा निष्कर्ष आयुक्तांनी अभ्यासाअंती काढला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने सल्लामसलत करीत त्यांनी एक प्रणाली विकसित झाली आहे.
काही अधिकारी या प्रणालीचा उल्लेख आतापासूनच ‘गेडाम पॅटर्न’ असा करू लागले आहेत. आयुक्तांनी तयार केलेल्या या प्रणालीचे संचालकांनी स्वागत केले आहे. “सध्या निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे ही प्रणाली अंतिम टप्प्यात आहे. परंतु लवकरच प्रत्यक्ष प्रणाली सर्वत्र लागू केली जाईल. दर आठवड्याला आयुक्त स्वतः आढावा घेतील. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना जलद सेवा मिळतील.
कारण, आपण पिछाडीवर राहू नये याची प्रत्येक विभाग काळजी घेईल. त्यामुळे संचालकांपासून ते तालुका कृषी अधिकाऱ्यापर्यंत कोणीही दिशाहीन काम करणार नाही. एखाद्या योजनेत एकदम संथपणा किंवा वेग दिसत असल्यास ही प्रणाली चटकन् कल (ट्रेन्ड) सांगेल. योजना राबविताना काही गैरप्रकार चालू असल्यास लक्षात येईल,” अशी माहिती एका कृषी संचालकाने दिली.
शेतकरी कल्याणार्थ कृषी खात्यात अनेक योजना आहेत. एप्रिल ते मार्च अशा प्रशासकीय वर्षात प्रत्येक योजनेत लाभार्थी निवड ते अनुदान वितरणापर्यंत अनेक टप्पे असतात. सध्या या टप्प्यांवर लक्ष ठेवणारी प्रणाली अस्तित्वात नाही. आमची नावीन्यपूर्ण प्रणाली सर्व टप्प्यांवर लक्ष ठेवेल. कामकाजात गती, गुणवत्ता आणि संनियंत्रण आणेल. यातून उद्दिष्टाभिमुख कामे होतील. त्यामुळे केलेल्या कामाचे समाधान अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभेल.डॉ. प्रवीण गेडाम, कृषी आयुक्त
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.