Agriculture Department : लाखभर वेतन मिळतानाही शेतकरी सेवेत कुचराई नको

Agriculture Schemes : राज्यातील शेतकरी अनेक समस्यांच्या वाटचालीतून शेतीला पुढे नेत आहेत. शासनाने त्यांच्यासाठी चांगल्या योजनादेखील आणल्या आहेत.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Pune News : ‘‘राज्यातील शेतकरी अनेक समस्यांच्या वाटचालीतून शेतीला पुढे नेत आहेत. शासनाने त्यांच्यासाठी चांगल्या योजनादेखील आणल्या आहेत. परंतु योजना, सेवा शेतकऱ्यांपर्यंत न्याव्या लागतील. त्याची खरी जबाबदारी आपलीच आहे.

त्यासाठी लाखभर वेतन अधिकाऱ्यांना मिळते. त्यामुळे कामात कुचराई न करता शेतकऱ्यांना सेवा द्या. कामे करताना चुका, तक्रारी होतील. मात्र त्यामुळे घाबरून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका,’’ अशी रोखठोक भूमिका कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी मांडली आहे.

कृषी आयुक्तालयाच्या संगणक प्रकल्पाचे प्रमुख उपसंचालक यशवंत केंजळे गुरुवारी (ता. २८) निवृत्त झाले. श्री. केंजळे यांना निरोप देण्यासाठी आयोजित केलेला निरोप समारंभ सोहळा उपस्थित अधिकाऱ्यांसाठी दिशादायक ठरला. या वेळी अधिकाऱ्यांनी आपली मनमोकळी मते मांडली व शेतकऱ्यांसाठी अधिक जलद सेवा देण्याचा संकल्पदेखील सोडला.

Agriculture Department
Agriculture Department : रिक्त पदांमुळे बाळापूरमध्ये कृषी विभागाचा कारभार बिकट

या वेळी श्री. केंजळे यांचा श्री. झेंडे यांनी तर सौ. स्वाती यशवंत केंजळे यांचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अश्विनी भोपळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कृषी सहसंचालक पांडुरंग शेळके, सुनील बोरकर, विनयकुमार आवटे, उपसंचालक कांतिलाल पवार, शिवकुमार सदाफुले, प्रवीण शिंदे यांनी आपली मते मांडली.

श्री. झेंडे म्हणाले, ‘‘कृषी हवामानशास्त्रातील सुवर्णपदक विजेते असलेले श्री. केंजळे ३३ वर्षे सेवेत होते. प्रामाणिक, शेतकऱ्यांप्रती श्रद्धा आणि तंत्रकौशल्यात पारंगत असलेला हा अधिकारी आपल्या खात्याचे भूषण ठरला. शेखर गायकवाड यांच्यासारख्या सनदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक नवी पिढी तयार झाली. त्यातील आपण सारे आहोत.

पहाटे चार वाजेपासून ते रात्री एक वाजेपर्यंत अभ्यास करीत अफाट ताणतणावातून आपण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत कृषी खात्यात आलो आहोत. त्यामुळे खात्यातील कोणत्याही कामाचा ताणतणाव घेण्याचे कारणच नाही. उलट शेतकऱ्यांना सेवा देण्याचे माध्यम आपल्या हाती आले आहे. कामे कराल तर चुका होतील. पण प्रामाणिक हेतू असल्यास न घाबरता आपण सेवा देण्यास तत्पर असायलाच हवे.’’

‘‘राज्यातील शेतकरी विवंचनेत आहेत. तो दुष्काळाला तोंड देतो आहे. आपण साऱ्यांनी वेळेत व जलद कामे केली तर त्याला अनुदानाचे दोन पैसे मिळू शकतील. अनुदान मिळाले तर त्याचे कर्ज हलके होते. त्यामुळे त्याच्या कामाला अडवू नका. प्रस्ताव बोगस असल्यास सपशेल नाकारा. मात्र, उगाच त्रुटी काढू नका. चांगल्या कामाला अकारण सशासारखे घाबरून पळत राहिल्यास शेतकऱ्यांना कोणीही वाली राहणार नाही.

Agriculture Department
Agriculture Department : बदल्यांच्या कथित घोटाळ्याची लोकायुक्त घेणार सुनावणी

शासनाच्या इतर कोणत्याही खात्यापेक्षा कृषी खाते शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करते आहे. त्यामुळे सेवा हे एक अग्निदिव्य समजावे. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडाल तर निवृत्तीच्या शेवटी समाधान मिळेल. शेतकऱ्यांना घरचे सोयाबीन बियाणे वापरा ही एकच मोहीम आपण राबवली. त्यामुळे तीन वर्षांत शेतकऱ्यांचे तीन हजार कोटी रुपये आपण वाचवले. हीच आपल्या खात्याची ताकद आहे,’’ असे उद्‍गार श्री. झेंडे यांनी काढताच कर्मचाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

भौतिक साधनांपेक्षा सेवेत सुख

कृषी सहसंचालक श्री. आवटे यांनी परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘आपण सरकारी नोकर म्हणून जनतेला काय सेवा देतो याचा सतत विचार करायला हवा. भौतिक सुखाच्या मागे लागता लागता सेवेतील सुख आपण गमावतो. त्यातून एक नकारात्मक भाव तयार होतो. आपली ओळख केवळ कामातून तयार होत असते हेदेखील आपण विसरतो. श्री. केंजळे यांच्यासारखे अधिकारी सेवेत सुख मानत काम करीत राहिले. त्यामुळे ते आनंदाने निवृत्त होत आहेत,’’ असे श्री. आवटे या वेळी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com