Garlic Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Garlic Cultivation : उत्तम उत्पादनासाठी लसूण लागवडीचे तंत्र

Garlic Varieties : लसूण हे एक महत्त्वाचे मसाला पीक म्हणून गणले जाते. भारतात मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये प्रामुख्याने लसूण लागवड केली जाते.

Team Agrowon

डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे, डॉ. प्रांजली गेडाम

Garlic production : लसूण हे एक महत्त्वाचे मसाला पीक म्हणून गणले जाते. भारतात मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये प्रामुख्याने लसूण लागवड केली जाते. महाराष्ट्रात सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्रावर लसूण लागवड असते. पुणे, नाशिक, धुळे, अहिल्यानतर, जळगाव, सातारा हे लसूण पिकविणारे प्रमुख जिल्हे आहेत.

राज्यामध्ये लसूण लागवड मोठ्या प्रमाणावर होत असली, तरी लसणाचे सरासरी हेक्टरी उत्पादन फक्त ९ मे. टन इतकेच आहे. राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने चांगला गुणवत्तेचे व अधिक उत्पादन देणाऱ्या दोन जाती विकसित केल्या आहेत.

भीमा ओमकार : ही लसणाची जास्त उत्पादन देणारी चांगल्या प्रतीची जात नालंदा, बिहार या भागांतून गोळा केलेल्या लसणांमधून निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीचे कंद मध्यम आकाराचे, घट्ट आणि पांढऱ्या रंगाचे असतात. एका कंदामध्ये १८ ते २० पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या असून, एकूण विद्राव्य घन पदार्थांचे प्रमाण हे ४१.२ टक्के इतके असते. लागवडीपासून १२० ते १३५ दिवसांत पीक तयार होते. या जातीपासून १४ टन प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन मिळू शकते. ही जात पानांवरील रोगांना प्रतिकारक्षम आहे.

भीमा पर्पल : लसणाची ही जात कांदा व लसूण संचालनालयाने एन्गुल, ओडिशा येथून गोळा करण्यात आलेल्या लसणातून निवड पद्धतीने विकसित केली आहे. हे वाण उत्तम प्रतीचे असून जास्त उत्पादन देणारे आहे. कंद मध्यम आकाराचे, घट्ट आणि पांढऱ्या रंगाचे असतात. एका गड्ड्यामध्ये १६ ते २० जांभळसर पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या असून, एकूण विद्राव्य घन पदार्थांचे प्रमाण ३३.६ टक्के असते. लागवडीपासून १३५ ते १५० दिवसांमध्ये पीक तयार होते. या जातीपासून १७ टन प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन मिळू शकते.

हवामान ः लसूण हे थंडीला प्रतिसाद देणारे पीक आहे. वाढीच्या काळात थंड आणि किंचित दमट हवामान, तर गड्डा परिपक्व होत असताना काढणीच्या काळात कोरडे हवामान हवे असते. लागवडीनंतर सुरुवातीचे दोन महिने पानांची वाढ होते, तेव्हा रात्रीचे तापमान १० ते १५ अंश सेल्सिअस व दिवसाचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान लागते. हवेतील सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्के व सूर्यप्रकाश ११ ते १२ तास सूर्यप्रकाश मिळाल्यास पाकळ्या चांगल्या पोसतात आणि गड्डा आकाराने वाढू लागतो.

म्हणूनच लसणाची लागवड ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच (शक्यतो पहिल्या आठवड्यात) करावी. गड्ड्याची वाढ सुरू होण्यापूर्वी पानांची वाढ होऊन भरपूर संख्या असली पाहिजे, त्यामुळे अधिक उत्पादनाची हमी मिळते. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या काळात रात्रीचे तापमान रोपांच्या वाढीस पोषक ठरते. फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांत रात्री तापमान कमीच राहते, परंतु दिवसाच्या तापमानात वाढ होते. हवेतील आर्द्रता कमी होते आणि गड्डा पोसू लागतो. एप्रिल महिन्यात तापमान आणखी वाढते. या काळात गड्डे काढणीस येतात. उशिरा लागवड झाली तर गड्ड्यांचा आकार छोटा राहतो, वजन कमी भरते आणि उत्पादन देखील कमी येते.

जमीन : या पिकाला जमीन भुसभुशीत आणि कसदार लागते. मध्यम काळ्या जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला केल्यास उत्पादन चांगले मिळते. भारी काळ्या किंवा चोपण जमिनीत गड्ड्याची वाढ चांगली होत नाही. पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनी
या पिकासाठी टाळाव्यात.

लागवड : उन्हाळ्यात खोल नांगरट करून नंतर २ ते ३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. हरळी, लव्हाळ्याच्या गाठी किंवा पूर्वीच्या पिकाची धसकटे वेचून घ्यावी. हेक्टरी १० ते १५ टन शेणखत शेवटच्या कुळवणीद्वारे जमिनीत मिसळून द्यावे. सामान्यतः लागवड सपाट वाफ्यात केली जाते. त्यासाठी २ × ४ किंवा ३ × ४ मीटर अंतराचे वाफे करावेत. जमीन एकदम सपाट असेल तर १.५ ते २ मीटर रुंदीचे आणि १० ते १२ मीटर लांबीचे सारे तयार केले तरी चालतात.

या पिकासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन वापरणार असल्यास १२० सें.मी. रुंद आणि ४० ते ६० मीटर लांबी, १५ सें.मी. उंची असे गादीवाफे तयार करावेत. हे वाफे ट्रॅक्टरला जोडता येणाऱ्या सरी यंत्राच्या मदतीने तयार करता येतात. एका गादीवाफ्यावर दोन ठिबकच्या लॅटरल्स वापराव्यात. लसणाच्या पाकळ्या टोकण करून लावाव्या लागतात. निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात १५ × १० सें.मी. अंतरावर आणि २ सें.मी. खोलीवर लावाव्यात. रुंदीशी समांतर वाफ्यात दर १५ सें.मी. अंतरावर खुरप्याने रेघा पाडून त्यात १० सें.मी. अंतरावर पाकळ्या उभ्या ठेवाव्यात आणि नंतर मातीने झाकून घ्याव्यात.

बीजप्रक्रिया ः
लागवडीपूर्वी पाकळ्या कार्बेन्डाझिम आणि कार्बोसल्फानच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवून मगच लागवड करावी. त्यासाठी कार्बोसल्फान २० मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी मिसळून द्रावण तयार करावे.

आंतर मशागत व तणनाशकांचा वापर :
लसूण लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांत उगवण होते. वाफ्यात वरून व्यवस्थित न कुजलेले शेणखत घातलेले असल्यास त्यातील तणांचे बी उगवते. लागवडीनंतर पहिल्याच आठवड्यात वाफे गवताने भरलेले दिसतात. खुरपणी त्वरित न केल्यास पिकाचे बरेच नुकसान होते. गवताचे रोप बारीक असल्यामुळे खुरपणी लवकर उरकत नाही आणि मजुरीचा खर्च वाढतो. त्यामुळे शेतकरी तणनाशकाच्या वापराकडे वळत आहेत.

लसणामध्ये तणाचे बी रुजून येण्यापूर्वी मारावयाचे तणनाशक वापरावे लागते. त्यासाठी पाकळ्यांची लागवड झाल्यानंतर कोरड्या वाफ्यात, पाटात आणि वरंब्यावर तणनाशक उदा. ऑक्सिफ्लुरोफेन १५ मि.लि. किंवा पेंडीमिथेलिन २५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारावे. या फवारणीनंतर लगेच पाणी द्यावे किंवा लागवड करून पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तणनाशक मारले तरी चालते. तणनाशक मारल्यानंतर त्याचा संपर्क पाण्याशी १ ते २ तासांत आला पाहिजे. लागवडीसोबत अशा प्रकारे तणनाशकाचा वापर केल्यामुळे जवळजवळ ३० ते ४० दिवस गवत उगवत नाही. त्यानंतर एक हलकी खुरपणी करणे आवश्यक असते. लव्हाळा आणि हरळीकरिता ग्लायफोसेटचा वापर करू नये. या तणांच्या बंदोबस्तासाठी पूर्वमशागत उदा. खोल नांगरट आणि त्यानंतर हरळीच्या काशा किंवा लव्हाळ्यांच्या गाठी वेचून घेणे हाच उत्तम पर्याय आहे.

अन्नद्रव्य व्यवस्थापन ः लसूण पिकाला १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे लागते. लागवडीपूर्वी ५० टक्के नत्र आणि संपूर्ण पालाश व स्फुरद जमिनीत मिसळून द्यावी. नत्राची राहिलेली मात्रा दोन हप्त्यांत विभागून द्यावी. पहिली मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी, तर दुसरी मात्रा ४५ ते ५० दिवसांनी द्यावी. सुपर फॉस्फेट किंवा अमोनिअम सल्फेट या खतांचा वापर केल्यास आवश्यक तेवढ्या गंधकाची मात्रा पिकास मिळू शकते. अन्यथा, २५ किलो गंधक वेगळे देणे आवश्यक आहे.

पाणी नियोजन : या पिकास कमी पण नियमित पाणी आवश्यक आहे. पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे. उगवण झाल्यानंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. साधारणपणे १२ ते १५ पाण्याच्या पाळ्या लागतात.

संपर्क ः ०२१३५ - २२२०२६
(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT