Biodiversity and Development of Satara : निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल सावरायचा असेल तर जैवविविधता जपावीच लागेल. वृक्षारोपण आणि संवर्धन त्यासाठी महत्त्वाचे आहे. हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यात असलेल्या गमेवाडी या शेवटच्या गावाने. अवघी दीड हजारच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावाची गमेवाडी व पाठरवाडी अशी ग्रुप ग्रामपंचायत’ आहे.
‘स्वच्छतेतून समृद्धीचा ध्यास... हाच आमचा ग्रामविकास’ हे ब्रीद घेऊन गमेवाडीची वाटचाल सुरू आहे. गावाला तिन्ही बाजूंनी डोंगर परिसर आहे. पाठरवाडीवर प्रसिद्ध तळी पठार, धबधबे, कोयना नदीचा विहंगम नजारा दाखवणारा जणू ‘सी पॉइंट’, डोंगर माथ्यावरून दिसणारी सूर्योदय व सूर्यास्ताची रेखीव दृश्ये, वृक्षवल्ली व वनौषधी झाडे, पाझर व नैसर्गिक वनतलाव अशी वैभवसंपन्न देणगी गावाला लाभली आहे.
देवस्थानांसाठी प्रसिद्ध गाव
सातारा, सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाठरवाडीतील भैरवनाथ मंदिर, वटेश्वर मंदिर, मंदिराची विहीर या ब्रिटिशकालीन वास्तू गावात पाहण्यास मिळतात. प्रसिद्ध गोरक्षनाथ मंदिर व भव्य गोरक्ष चिंचेचे झाड येथे असून, देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे.
कुलदैवत निनाईदेवी, ग्रामदैवत हनुमान, बेगडेतील भैरोबा, अश्वथामा, मथुरदास, नागोबा, सटवाई, म्हसोबा, नाईकबा आदी देवदेवतांच्या पौराणिक मंदिरांनी गावातील धार्मिक परंपरा जपल्या आहेत. पर्यटकांचे मन रमणारे गाव म्हणजे गमेवाडी अशी गावची ओळख निर्माण झाली आहे.
बिहार पॅटर्नद्वारे वृक्ष लागवड
अलीकडील काळात जैवविविधतेचा ऱ्हास होत आहेत. परिणामी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ यांसारख्या घटनांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. गमेवाडीतील ग्रामस्थ त्याबाबत वेळीच जागरूक झाले. शासनाचा निधी मिळाला तर ठीक अन्यथा ग्रामपंचायत, लोकवर्गणी व लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले.
ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या सहकार्यातून तत्कालीन गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, डॉ. आबासाहेब पवार, शशिकांत शिंदे, मीना साळुंखे यांचे सहकार्य लाभले. त्यातून बिहार पॅटर्नद्वारे वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले. त्यानुसार तब्बल साडेसहा हजार झाडे लावून ती जगविण्यात आली आहेत. रोजगार हमी योजनेतून ही लागवड झाल्याने संगोपनासाठी प्रतिव्यक्ती दररोज दोनशे रुपये मेहनताना मिळाला आहे. त्याअंतर्गत सध्या १५ ते २० तरुण झाडांना सिंचन व देखभालीचे काम करीत आहेत.
...अशी जपलीय जैवविविधता
वन विभागामार्फत गावाजवळील क्षेत्रात सुमारे सव्वा १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. कृषी विभागामार्फत दोन हजार ६६० फळझाडे लावण्यात आली. त्यात देशी वड, उंबर, पिंपळ, कदंब, आपटा, चिंच, चाफा, सिसव, कवठ, कडुनिंब, कांचन, सप्तपर्णी, करंज, जांभूळ, आवळा, सिल्व्हर ओक, आंबा, सीताफळ, सीता-अशोक, बहावा, पिंपरण, वाळवा, रामफळ, काजू, बदाम, नारळ, फणस, पेरू, खैर, गुलमोहर, रेन ट्री, पळस, सागवान अशी विविधता
आहे. त्यातील ९५ टक्क्यांहून अधिक झाडे जगवून गावाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याद्वारे गमेवाडी हरित गाव बनले आहे. त्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, विनय गौडा, सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, तत्कालीन वन अधिकारी भूपेंद्रसिंह हाडा यांनी गावाचा गौरव केला आहे.
वृक्षतोडीस बंदी, वणवा नियंत्रण समिती
ठराव करून गावात वृक्षतोडीवर बंदी घातली आहे. काही वेळा गावातील डोंगराळ, वनभागात वणवे लागतात. त्यामुळे वनसंपदेला हानी पोहोचते. त्यावर उपाय म्हणून गावात वणवा नियंत्रण समिती स्थापन केली आहे. त्यामुळे जैवविविधतेचे चांगल्या प्रकारे संरक्षण होत आहे.
जलसंधारणामुळे वाढली पाणीपातळी
गावात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविल्याने उन्हाळ्यात शेतीच्या पाण्यासाठीची टंचाई दूर झाली आहे. शासन व लोकसहभागातून पाझर तलावाची पुनर्बांधणी, नव्याने तीन सिमेंट बंधारे, चार माती बंधारे, गॅबियन बंधारे आदी कामे झाली आहेत. नैसर्गिक तलावांतील गाळ काढून सहा शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीपातळी दोन फुटांनी वाढली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न मिटला आहे.
शासनाच्या योजनांची अंमलबजावणी
सन २०१५-१६ पासून गावाने स्वच्छता, लोकसहभाग, श्रमदान, जलसंवर्धन, वृक्ष लागवड, रोजगार निर्मिती, शेतीची सुपीकता वाढ आदींच्या माध्यमातून समृद्धीकडे वाटचाल केली आहे. शंभर टक्के ग्रामस्थांकडे आधार कार्ड, बँक खाते, नरेगा जॉब कार्ड, शौचालय, घरगुती गॅस, वीज अशा सुविधा आहेत. शंभर टक्के बंदिस्त गटार व नळजोडण्या पूर्ण असून, पाणी गुणांकनाला चंदेरी कार्ड आहे.
सुमारे ५० लाखांवर जलसंधारणाची कामे लोकसहभाग व श्रमदानातून पूर्ण झाली. आरोग्य सुविधांमुळे रुग्ण प्रमाण १० टक्क्यांच्या खाली आहे. बहुतांशी रस्ते लोकवर्गणीतून झाले आहेत. गावात स्वच्छतेला मोठे महत्त्व आहे. सर्व पाणंद रस्ते खुले असून, रोजगार हमी योजनेतून त्यांचे मुरमीकरण व खडीकरण करण्यात आले आहे. त्यातून ग्रामस्थांना रोजगार मिळाला आहे.
लोकसहभाग व वृक्षमित्र संतोष जाधव यांच्या पुढाकारातून गावात वृक्ष चळवळ उभी राहिली आहे.म्हणूनच गावाला राज्य शासनाच्या प्रथम क्रमांकाच्या वनश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. गाव स्मार्ट ग्राम पुरस्काराचे धनीही झाले आहे.उषा जयवंत जाधव, ९५९४५३०४९० सरपंच, गमेवाडी
साडेसहा हजार झाडे लावून गावाने ती जगवण्याचे कामही केले आहे. बंधारे बांधण्यासह जुने बंधारे दुरुस्त केले आहेत. भूगर्भातील पाणीपातळी वाढली असून, पाणीटंचाई दूर झाली आहे.- शिवाजी तातोबा जाधव, ९५६१४१९४४० उपसरपंच, गमेवाडी
गावची समृद्धी ही त्या गावातील नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून असते, पैशांवर नाही. हे जाणून आम्ही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा निर्धार केला. त्यास पंचायत समिती, वन विभाग, कृषी विभागाने सहकार्य केले. त्या माध्यमातून १९ हजार ३१० विविध प्रकारची झाडे लावून ती जगवली आहेत. गमेवाडी हे हरित गाव झाले आहे.संतोष जाधव, ९९३०३१११२१ वृक्षमित्र, गमेवाडी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.