Fruit Waxing Method Agrowon
ॲग्रो विशेष

Post Harvest Technology : फळे-भाज्यांना वॅक्सिंग करण्याच्या विविध पद्धती

Fruit Waxing Method : फळे आणि भाज्यांच्या दीर्घकाळ साठवणीसाठी वॅक्सिंग केले जाते. या लेखामध्ये वॅक्सिंग करण्याच्या विविध पद्धतींची माहिती घेऊ. या प्रत्येक पद्धतीच्या स्वत:च्या मर्यादा आणि फायदे आहेत. उत्पादनाच्या प्रकारानुसार योग्य त्या पद्धतीचा वापर करण्याची आवश्यकता असते.

Team Agrowon

डॉ. विक्रम कड डॉ. गणेश शेळके डॉ. सुदामा काकडे

निर्यातीसाठी प्रामुख्याने फळे आणि भाज्या दीर्घकाळ टिकणे गरजेचे असते. त्यासाठी त्यावर मेणाचा थर देण्याची पद्धती (वॅक्सिंग) वापरली जाते. त्याच्या हाताने लावणे, मेणामध्ये बुडविणे, मेणाची फवारणी करणे, ब्रश करणे यासारख्या अनेक पद्धती आहेत. या पद्धतींची निवड उत्पादनाचा प्रकार, आकार आणि वॅक्सिंग सामग्रीच्या स्वरूपानुसार केली जाते. या प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे फायदे आणि मर्यादा असतात. ते लक्षात घेऊन योग्य त्या पद्धतीचा अवलंब केल्यास फायदा होतो.

हाताने मेण लावणे

मेण द्रवरूप करून फळांच्या पृष्ठभागावर हाताने किंवा मऊ कापडाच्या एकसमान थरामध्ये लावले जाते. ही एक साधी आणि सोपी पद्धत असून, प्रामुख्याने घरगुती किंवा कमी संख्येमध्ये उत्पादने असल्यास उपयुक्त ठरते. मात्र यासाठी मनुष्यबळ अधिक लागू शकते. त्याच प्रमाणे या पद्धतीत मेणाच्या थराची जाडी नियंत्रित करणे कठीण होते.

पद्धत

 फळे आणि भाज्या स्वच्छ थंड किंवा कोमट पाण्याने धुऊन घ्याव्यात. त्यांच्या पृष्ठभागावरील धूळ, माती आणि रासायनिक अवशेष निघून जातील.

 उत्पादने सुकवण्यासाठी कोरड्या आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यावीत. अधिक प्रमाणात उत्पादनासाठी हवेच्या झोत सोडून सुकविण्याची प्रक्रिया करता येते. नैसर्गिक मेण हे सौम्य तापमानावर गरम करून मऊ केले जाते. त्याचा फळावर हाताने थर देऊन पसरून घ्यावा.

अ) हाताने लावण्याची पद्धत : थोडेसे मेण हातावर घेऊन हलक्या हाताने फळाच्या किंवा भाज्यांच्या पृष्ठभागावर गोलाकार चोळत जावे.संपूर्ण पृष्ठभागावर थर व्यवस्थित पसरला असल्याची खात्री करावी.

ब) मऊ कापडाने लावण्याची पद्धत : द्रवरूप केलेले मेणामध्ये मऊ कापड बुडवून घ्यावे. ते कापड फळाच्या पृष्ठभागावर हळुवारपणे फिरवत जावे. सर्व भागांवर समान थर येईल अशा प्रकारे चोळावे. सर्व बाजूने एक सारखी चमक आल्यानंतर हवेशीर ठिकाणी काही काळासाठी ठेवावे.बुडविणे

जेव्हा मोठ्या प्रमाणात उत्पादनावर वॅक्सिंग करायचे असते, त्यावेळी वितळलेल्या मेणामध्ये अत्यंत अल्पकाळासाठी उत्पादने बुडविण्याची पद्धती राबवली जाते. यात मेणाच्या थराची जाडी नियंत्रित करणे तुलनेने सोपे आहे.मात्र मोठ्या प्रमाणात मेणांचा वापर होत असल्याने मेण वाया जाण्याचे प्रमाण जास्त राहू शकते. बाथमध्ये मेण काही प्रमाणात शिल्लक राहून जाते. या पद्धतीत सामान्यतः पॅराफिन वॅक्सचा वापर केला जातो.

पद्धत

स्वच्छ थंड किंवा कोमट पाण्याने फळे आणि भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्‍यात. त्यानंतर हवेच्या झोताद्वारे त्यांच्या पृष्ठभागावरील पाणी उडवले जाते. किंवा कोरड्या आणि स्वच्छ कापडाने पुसून घेतली जातात. नैसर्गिक वॅक्स गरम करून किंवा सौम्य तापमानावर ठेवून द्रव स्वरूपात आणावे. काही वेळा संपूर्ण मेणाऐवजी मेणासोबत काही प्रमाणात पाणी आणि अन्य सुरक्षित रसायने मिसळून ‘इमल्शन’ तयार केले जाते.

अशा द्रवामध्ये काही सेकंदासाठी फळे, भाज्या बुडवून त्वरित बाहेर काढल्या जातात. त्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर एकसंध थर तयार होतो. वॅक्स समसमान पसरले आहे का, याची तपासणी करून मेणाची अतिरिक्त जाडी कमी केली जाते. त्यासाठी गरम हवेच्या झोताचा वापर केला जातो. त्यानंतर फळे / भाज्या कोरड्या व हवेशीर ठिकाणी ठेवल्या जातात.

ब्रशच्या साह्याने मेण लावण्याची प्रक्रिया (ब्रशिंग)

वरील प्रमाणे फळे भाज्या स्वच्छ धुऊन कोरड्या केल्यानंतर मेण लावण्यासाठी ब्रशचा वापर केला जातो. त्यासाठी मेण गरम करून ते योग्य (५०-७० अंश सेल्सिअस ) तापमानाला आणावे. इमल्सिफाइड वॅक्स वापरत असल्यास, पाणी व अन्य घटक व्यवस्थित प्रमाणात मिसळल्याची व इमल्शन योग्य प्रकारे झालेले असल्याची खात्री करावी. त्यात स्वच्छ आणि मऊ ब्रश हलक्या हाताने बुडवून तो उत्पादनाच्या एकसंधपणे फिरवावा. त्यामुळे एकसमान जाडीचा पातळ थर लावला जात असल्याची खात्री करावी. त्यानंतर उत्पादन पूर्ण सुकण्यासाठी हवेशीर ठिकाणी ठेवावे.

एक्स्ट्रूशन पद्धत

ही एक औद्योगिक प्रक्रिया असून, त्यात उत्पादनावर मेणाचा थर अचूक व नियंत्रित पद्धतीने लावता येतो. या प्रक्रियेत गरम वॅक्स एका विशिष्ट यंत्राच्या (एक्स्ट्रूडर) साह्याने बाहेर फवारले जाते. ही पद्धत प्रामुख्याने मेणासह सूक्ष्मजीवविरोधी व अन्य सक्रिय घटकांचा थर बाहेरून देण्यासाठी वापरली जाते.

पद्धत

वरीलप्रमाणे फळे आणि भाज्या स्वच्छ व कोरड्या करून घेतल्या जातात. प्रक्रियेसाठी वापरावयाचे मेण ५० ते ७० अंश सेल्सिअस तापमानावर गरम करून द्रव स्वरूपात आणले जाते. त्यात काही वेळा अन्नसुरक्षित इमल्सिफायर आणि संरक्षक घटक मिसळले जातात. हे गरम मेण एक्स्ट्रूजन मशिनमध्ये भरले जाते. त्याद्वारे मेणाचा पातळ आणि समान असा थर फळांच्या पृष्ठभागावर फवारला जातो किंवा कोटिंग केले जाते. ही प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी फळे फिरवली जातात. त्यानंतर गरम हवेच्या साह्याने किंवा नैसर्गिकरीत्या वॅक्स कोरडे आणि सेट होऊ दिले जाते.

फायदे

 मेण एकसंध आणि नियंत्रित प्रमाणात फळांवर लावले जाते.

 वेगवान व कार्यक्षम पद्धत.

रोलर ब्रशिंग

रोलर ब्रशिंग ही औद्योगिक स्तरावर मोठ्या प्रमाणात फळे व भाज्यांच्या संरक्षणासाठी उपयुक्त आधुनिक पद्धत आहे. त्यासाठी रोलर ब्रश मशिन या खास यंत्राचा वापर केला जातो. फळे व भाज्या एका कन्व्हेअर बेल्टवर टाकली जातात. यात उत्पादने एका किंवा अधिक रोलर्सच्या मालिकेतून जातात. त्यावेळी त्याच्या पृष्ठभागावर फिरणाऱ्या ब्रशच्या मदतीने मेण लावले जाते. ही वेगवान आणि कार्यक्षम पद्धत आहे. यात मेणाच्या थराची जाडी आणि एकसमानता नियंत्रित करणे सोपे होते. काही यंत्रामध्ये ऑटोमॅटिक वॅक्स स्प्रेअर (Wax Sprayer) दिलेला असतो. त्याद्वारे स्वच्छ केलेल्या फिरत्या उत्पादनावर मेण किंवा मेणाचे इमल्शन अलगद फवारले जाते. त्यावरून पुन्हा रोलरचे ब्रश फिरले जातात. त्यामुळे त्यावरील अतिरिक्त मेणाचा थर कमी होतो. हा थर सुकविण्यासाठी हवेच्या झोताचा वापर केला जातो. त्यानंतर पॉलिशिंग ब्रशच्या मदतीने फळे अधिक चमकदार केली जातात.

रोलर ब्रशिंग पद्धतीचे फायदे

 एकसंध वॅक्स कोटिंग : पृष्ठभागावर समसमान वॅक्स थर लावला जातो.

 वेगवान आणि कार्यक्षम प्रक्रिया : मोठ्या प्रमाणावर फळे व भाज्यांवर वॅक्स लावण्यासाठी ही पद्धत अधिक उपयुक्त आहे.

 फळांची चमक वाढते : ब्रशिंगमुळे फळे व भाज्या अधिक आकर्षक दिसतात.

 हाताने वॅक्स लावण्याच्या तुलनेत कमी परिश्रम व वेळ लागतो.

फवारणी करणे

उत्पादनाच्या स्वच्छतेची सर्व प्रक्रिया वरीलप्रमाणेच असते. मात्र फवारणीसाठी मेण द्रावण तयार करण्याची पद्धती वेगळी असते. त्यासाठी मेण गरम पाण्यात मिसळून इमल्शन (Emulsion) तयार करतात. त्यासाठी त्यात काही वेळा नैसर्गिक रेझिन (Resin) किंवा खाद्य-द्रव्ये मिसळली जातात. त्यामध्ये एकजिनसीपणा आणण्यासाठी द्रावण गाळून घेतले जाते. अशा द्रावणाची फवारणी करण्यासाठी उच्च दाबावर कार्य करणाऱ्या नोझल वापरले जातात.

त्याद्वारे केली जाणारी फवारणी अत्यंत सूक्ष्म थेंबामध्ये (Fine Mist) होते. ही फवारणी सुरू असताना खालून उत्पादने एकाच वेळी फिरत व सरकत पुढे जातात. त्यासाठी खास रोलर कन्व्हेअर बेल्टचा वापर केला जातो. त्यामुळे फळांवर अत्यंत पातळ असा मेणाचा थर तयार होतो. त्यानंतर ती उत्पादनांवर त्याच्या प्रकारानुसार थंड किंवा गरम हवेचे झोत सोडून उत्पादनावरील मेणाचा थर सुकवला जातो.

फवारणीद्वारे वॅक्सिंगचे फायदे

 वॅक्सचा बारीक व समसमान थर तयार होतो.

 वॅक्सचे प्रमाण कमी लागते.

 ही पर्यावरणपूरक व खर्च वाचवणारी पद्धत आहे.

 यासाठी अर्ध-स्वयंचलित व पूर्ण-स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत.

- डॉ. विक्रम कड, ०७५८८०२४६९७

कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT