Post-Harvest Technology : शेतीमाल स्वच्छतेसाठी इमर्शन वॉशर, यूव्ही वॉशर

Post-Harvest fruit Hygiene : काढणीपश्‍चात प्रक्रियेमध्ये फळे आणि भाज्या प्राथमिक स्वच्छता ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य त्या पद्धतीचा वापर करणे गरजेचे असते.
Post-Harvest Technology
Post-Harvest Technology Agrowon
Published on
Updated on

डॉ. विक्रम कड डॉ. गणेश शेळके डॉ. सुदामा काकडे

काढणीपश्‍चात प्रक्रियेमध्ये फळे आणि भाज्या प्राथमिक स्वच्छता ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य त्या पद्धतीचा वापर करणे गरजेचे असते. ही स्वच्छता केवळ वैयक्तिक आरोग्यासाठीच नाही, तर सार्वजनिक आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठीसुद्धा महत्त्वाची आहे. या भागामध्ये कन्व्हेअर बेल्ट वॉशर, इमर्शन वॉशर मशिन, यूव्ही वॉशर मशिन या यंत्रांची माहिती घेऊ.

कन्व्हेअर बेल्ट वॉशर मशिन

मोठ्या अन्न प्रक्रिया उद्योगात फळे, भाज्या व शेतीमालाच्या स्वच्छतेसाठी वापरले जाणारे हे यंत्र आहे. सतत फिरत असलेल्या कन्व्हेअर बेल्टवर आधारीत अन्य विविध धुण्याच्या प्रक्रियांचा वापर यात केलेला असतो. (उदा. हाय-प्रेशर वॉटर स्प्रे, ब्रशिंग, एअर बबल वॉशिंग इ.) कन्व्हेअर बेल्टवर ठेवलेले उत्पादन वॉशिंग चेंबरमधून जात असताना स्प्रे नोझल्सद्वारे त्यावर उच्च दाबाने पाणी आणि स्वच्छता द्रावणांची फवारणी केली जाते.

कार्यप्रणाली

कन्व्हेअर बेल्ट या यांत्रिक वाहक प्रणालीसोबत जेट स्प्रे तंत्रज्ञानावर आधारित कार्यप्रणाली असते. या यंत्रामध्ये कन्व्हेअर बेल्टवर येणारी फळे सतत फिरत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातात. या दरम्यान यंत्रामधील उच्च-दाबाच्या पाण्याचे जेट्स, घासण्यासाठी लावलेले ब्रशेस आणि सुकविण्यासाठी हवा फवारणी यंत्रणा बसविलेल्या असतात. त्या कार्य करत राहिल्यामुळे शेतीमाल स्वच्छ होतो.

यंत्राचे प्रमुख भाग

 कन्व्हेअर बेल्ट - स्टेनलेस स्टील किंवा फूड-ग्रेड प्लॅस्टिकपासून बनवलेले जाळीदार किंवा सॉलिड बेल्ट असतो. तो फिरता राहण्यासाठी त्याला मोटारद्वारे ऊर्जा पुरवलेली असते.

 हाय-प्रेशर स्प्रे नोझल्स : उच्च-दाबाच्या पाण्याच्या जेट्सद्वारे फळांवरील अशुद्धता स्वच्छ केली जाते.

 ब्रशिंग सिस्टिम - काही मशिनमध्ये अतिरिक्त ब्रशिंग यंत्रणा शेतीमालाची अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छता करते.

 वॉटर टँक आणि फिल्टर यंत्रणा : वापरलेले पाणी पुन्हा गाळून स्वच्छ करून पुन्हा वापरता येते.

 निचरा आणि सुकवणी यंत्रणा ः शेवटच्या टप्प्यात अतिरिक्त पाणी काढले जाते. त्यानंतर, फळे कोरडी करण्यासाठी एअर ब्लोअर किंवा नैसर्गिक पद्धतीचा वापर केला जातो.

 कंट्रोल पॅनेल : संपूर्ण यंत्रणेसाठी वेग, पाण्याचा दाब आणि तापमान नियंत्रित करणारे यंत्र.

धुण्याची प्रक्रिया

 लोडिंग : फळे किंवा भाज्या मशिनच्या कन्व्हेअर बेल्टवर ठेवली जातात.

 प्री-रिन्सिंग : फवारणी प्रणालीद्वारे फळांवरील माती व धूळ इ. साफ केली जाते.

 ब्रशिंग आणि डीप वॉश : गरज असल्यास ब्रशिंग किंवा जोरदार पाणी फवारणी करून अतिरिक्त अशुद्धता काढल्या जातात.

 फायनल रिन्सिंग : शुद्ध पाण्याने अंतिम स्वच्छता केली जाते.

 निचरा आणि सुकवणी : शेवटच्या टप्प्यात अतिरिक्त पाणी काढले जाते. उरलेले पाणी आणि ओलसरपणा कमी करण्यासाठी हवा किंवा गरम हवेच्या प्रवाहाचा वापर होतो.

 अनलोडिंग : स्वच्छ केलेली फळे आणि भाज्या बाहेर पडतात. पुढील प्रक्रिया (पॅकिंग किंवा ग्रेडिंग) सुरू होते.

Post-Harvest Technology
Post Harvest Technology : शेतीमाल स्वच्छतेसाठी ड्रम वॉशर, स्प्रे वॉशर

मुख्य वैशिष्ट्ये

 स्वयंचलित आणि वेगवान स्वच्छतेसाठी अत्यंत उपयुक्त यांत्रिक प्रणाली. मनुष्यबळ कमी लागते.

 स्प्रे आणि ब्रश सिस्टिमसोबतच क्लिनिंग एजंट वापरणे शक्य होते.

 कन्व्हेअर बेल्ट वेग गरजेनुसार कमी अधिक करता येतो.

 स्टेनलेस स्टीलपासून भाग बनविलेले असल्यामुळे गंजरोधक संरचना.

 सलग चालणारी प्रक्रिया असल्याने वेगाने स्वच्छता होते.

 यात फिल्टर आणि पुनर्वापर यंत्रणा असल्याने पाण्याचा अपव्यय कमी होतो.

 हायजिनिक प्रक्रिया: हाय-प्रेशर वॉशिंग आणि

हवा वाळवणीमुळे बुरशी आणि जिवाणूंचा नाश

होतो.

 सुलभ देखभाल : स्वच्छता आणि दुरुस्ती करणे सोपे असते.

 स्वच्छता आणि अन्न सुरक्षा : अन्नप्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक असलेली स्वच्छता पातळी राखली जाते.

 उपयोग ः कन्व्हेअर बेल्ट वॉशर मशिन प्रामुख्याने पुढील फळे आणि भाज्यांच्या स्वच्छतेसाठी वापरली जाते.

 सफरचंद, द्राक्षे, संत्री, केळी, आंबा इत्यादी कोवळ्या फळांसाठी बबल वॉशिंग तंत्र वापरले जाते.

 गाजर, बटाटे, बीट यांसारख्या मुळभाज्यांसाठी हाय-प्रेशर वॉशिंग आणि ब्रशिंग तंत्र वापरले जाते.

 कोबी, फ्लॉवर, पालक यांसारख्या पानभाज्यांसाठी सौम्य पाण्याचा वापर करून स्वच्छ केले जाते.

इमर्शन वॉशर मशिन

फळे आणि भाज्यांना पूर्णपणे पाण्यात बुडवून स्वच्छता केली जाते. या प्रक्रियेमुळे उत्पादनावरील धूळ, माती, रासायनिक अवशेष, कीटकनाशकांचे अवशेष आणि अन्य अशुद्धता प्रभावीपणे काढल्या जातात. कोणत्याही प्रकारे दाबाचा वापर केला जात नसल्याने सौम्य आणि प्रभावी स्वच्छतेची आवश्यकता असलेल्‍या कोवळ्या व नाजूक उत्पादनांसाठी उपयुक्त. उदा. संत्री, सफरचंद, द्राक्षे आणि नाजूक फळे इ.

कार्यप्रणाली

इमर्शन वॉशर मशिन हे बुडविण्याच्या (Immersion) आणि हलक्या कंपनांच्या (Agitation) तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात मोठी टाकी असून, त्यात भरलेल्या पाण्यामध्ये फळे किंवा भाज्या सोडल्या जातात. या पाण्यात हवा किंवा वायूचे बुडबुडे निर्माण केले जातात. या प्रक्रियांमुळे पदार्थ घुसळले जातात. घुसळण्याच्या प्रक्रियेसाठी वायूचे बुडबुडे (एअर बबल), जेट स्प्रे किंवा कंपन यंत्रणा (Agitator Mechanism) यांचा वापर केला जातो. परिणामी पदार्थावरील धूळ, माती, रसायने, जंतू आणि कीटकनाशकांचे अवशेष दूर होतात.

Post-Harvest Technology
Post Harvest Technology : शेतीमाल स्वच्छतेसाठी रोटरी ब्रश वॉशर, अल्ट्रासोनिक वॉशर

मशिनचा तपशील

 पाण्याची टाकी : फळे किंवा भाज्या बुडवण्यासाठी वापरली जाते.

 बबल जनरेटर : पाण्यात हवेचे बुडबुडे निर्माण करून धुण्याची प्रक्रिया सुलभ करते.

 पंप आणि जेट स्प्रे : अशुद्धता आणि अवशेष हटवण्यासाठी मदत करते.

 गाळण आणि पाणी पुनर्वापर प्रणाली : वापरलेले पाणी गाळून पुन्हा वापरण्याची सुविधा देते.

 शेतीमाल वाहून नेण्याची प्रणाली : काही मशिनमध्ये पदार्थ वाहून नेण्यासाठी कन्व्हेअर बेल्ट वापरलेला असतो.

 निचरा आणि सुकवणी यंत्रणा : स्वच्छतेनंतर उरलेले पाणी काढण्यासाठी आणि अन्नपदार्थ वाळविण्यासाठी वापरले जाते.

 कंट्रोल पॅनेल : पाण्याचा दाब, तापमान, आणि वेळ यांच्या साह्याने धुण्याची प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी उपयोग.

धुण्याची प्रक्रिया

 लोडिंग : फळे किंवा भाज्या वॉशिंग टँकमध्ये सोडली जातात.

 पाण्यात बुडवणे : त्या टाकीतील पाण्यात शेतीमाल बुडवला जातो.

 एअर बबल आणि जेट क्लिनिंग : हवा खेचून ती पाण्यात सोडल्याने लहान मोठे बुडबुडे तयार होतात. किंवा काही यंत्रामध्ये बबल जनरेटरद्वारे पाण्यात लहान बुडबुडे तयार केले जातात. त्यांचा वापर प्रामुख्याने नाजूक फळांच्या स्वच्छतेसाठी केला जातो. काही मशिनमध्ये अतिरिक्त जेट स्प्रेही वापरण्याची सोय असते. मात्र शेतीमालाच्या प्रकारानुसार त्याचा वापर केला जातो.

 ब्रशिंग आणि हाय-प्रेशर वॉशिंग : काही उत्पादनांसाठी सौम्य ब्रशिंग किंवा हाय-प्रेशर पाण्याचा वापर केला जातो.

 अंतिम स्वच्छता (रिन्सिंग) : शुद्ध पाण्याने फळे आणि भाज्यांची शेवटची स्वच्छता केली जाते.

 निचरा आणि सुकवणी यंत्रणा : मशिनमधून अतिरिक्त पाणी काढून घेतले जाते. गरजेनुसार फळे सुकविण्यासाठी हवा किंवा गरम वारे सोडले जातात.

 अनलोडिंग : स्वच्छ फळे किंवा भाज्या मशिनमधून बाहेर काढली जातात.

मुख्य वैशिष्ट्ये

 पदार्थ पूर्णपणे बुडविण्यासाठी खोल टाक्यांचा वापर केलेला असतात.

 पाणी पुनर्वापर प्रणाली : वापरले पाणी गाळून, शुद्ध करून पुन्हा वापरण्याची क्षमता असते.

 हलकी कंपन प्रणाली : पाण्यात सौम्य कंपन तयार केल्यामुळे उत्पादनावरील घाण आणि कीटकनाशकांचे अवशेष सहज निघून जातात.

 विशेष ब्रशिंग आणि एअर बबल्स तंत्रज्ञान : काही या प्रकारच्या यंत्रामध्ये अतिरिक्त ब्रशिंग आणि हवेचे बुडबुडे सोडण्याची यंत्रणा असते. चांगली स्वच्छता शक्य होते.

 वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांसाठी सानुकूलित करता येणारी रचना.

 नाजूक फळांसाठी उत्तम : जास्त दाबाशिवाय सौम्य स्वच्छता होते. उदा. स्ट्रॉबेरी, द्राक्षे यांसारख्या नाजूक फळांना धक्का बसत नाही.

 सौम्य आणि प्रभावी स्वच्छता

 गंजरोधक स्टेनलेस स्टीलची संरचना.

 सुलभ कार्यपद्धती, कमी देखभाल खर्च.

...यासाठी होतो उपयोग

 कोवळी व नाजूक फळे : द्राक्षे, स्ट्रॉबेरी, चेरी, टोमॅटो इ.

 मोठी फळे आणि भाज्या : सफरचंद, संत्री आणि मोसंबी, कोबी आणि पालेभाज्या, बटाटे आणि

गाजर.

यूव्ही वॉशर मशिन

अतिनील किरणांच्या (अल्ट्राव्हायोलेट) वापराने फळे आणि भाज्यांची स्वच्छता केली जाते. या प्रक्रियेमुळे शेतीमालावरील रोगकारक सूक्ष्मजीव उदा. जिवाणू, विषाणू आणि बुरशी नष्ट होतात. अतिनील किरणामध्ये सूक्ष्मजीवांच्या पेशी, डीएनए (DNA) आणि आरएनए (RNA) नष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे शेतीमालाद्वारे पसरणाऱ्या विविध रोगांना अटकाव करण्याचा हा अत्यंत पर्यावरणपूरक आणि आरोग्यासाठी सुरक्षित पर्याय आहे. पूर्वी याच कार्यासाठी रसायनांचा वापर केला जात असे. मात्र त्यामुळे नैसर्गिक गुणधर्म बदलले जाण्याचा व रासायनिक घटक शरीरात जाण्याचा धोका असतो. त्यामुळे स्वच्छतेच्या प्रक्रियेमध्ये रसायनांचा वापर सातत्याने कमी केला जात आहे.

कार्यप्रणाली

यूव्ही वॉशर मशिन हे अतिनील किरणांचे निर्जंतुकीकरण तत्त्व (UV Sterilization Principle) यावर आधारित आहे. पदार्थावर अल्ट्राव्हायोलेट-सी (UV-C) किरणे सोडली जातात. ही किरणे साधारणतः २०० ते २८० नॅनोमीटर (nm) तरंगलांबीची असतात. या तरंगलांबीची किरणे आदळल्यानंतर जिवाणूंच्या डीएनए आणि आरएनएचे विघटन करतात. त्यामुळे तो सूक्ष्मजीव निष्क्रिय होतो. त्यांचा प्रसार रोखला जातो. अन्नपदार्थांचा साठवण कालावधी वाढतो.

यूव्ही वॉशर मशिनचे महत्त्वाचे भाग

 कन्व्हेअर बेल्ट : उत्पादन वाहून नेण्यासाठी जाळीदार किंवा सॉलिड बेल्ट वापरला जातो.

 यूव्ही-सी लाइट चेंबर : फळे किंवा भाज्यांवर अतिनील किरणे टाकण्यासाठी बंद चेंबर असतो. बाहेरील किरणोत्सर्ग टाळण्यासाठी मशिन बंदिस्त ठेवले जाते.

 यूव्ही-सी लॅम्प्स : अल्ट्राव्हायोलेट किरणे उत्सर्जित करणारे दिवे.

 परावर्तन करणारे पृष्ठभाग (रिफ्लेक्टिव्ह सरफेस) : यूव्ही किरणे योग्यप्रकारे परावर्तित करून कार्यक्षमता वाढवली जाते.

 कंट्रोल पॅनेल : मशिनचे वेळ, तापमान आणि प्रकाशमान नियंत्रित करणारे यंत्र. मशिन चालू - बंद करणे आणि यूव्ही प्रकाशाचे नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाते.

 फिल्टर सिस्टम : काही मॉडेल्समध्ये अतिरिक्त धूळ किंवा घाण गाळण्यासाठी हवा गाळणी यंत्रणा असते.

 सुरक्षा प्रणाली : यूव्ही किरणांचा थेट संपर्क टाळण्यासाठी सेन्सर्स आणि लॉक सिस्टिम असते.

मुख्य वैशिष्ट्ये

 रसायनविरहित प्रक्रिया : कोणत्याही रसायनांशिवाय स्वच्छता होते.

 किरणांचा वापर सूक्ष्मजंतू आणि विषाणू नष्ट करण्यासाठी.

 जलद आणि प्रभावी : कमी वेळात स्वच्छता प्रक्रिया पूर्ण होते.

 सुरक्षित : योग्य प्रकारे वापरल्यास मानवी आरोग्यासाठी सुरक्षित.

 पर्यावरणपूरक : पाणी किंवा रसायनांचा वापर होत नाही.

 वेगवान प्रक्रिया : अल्प वेळेत स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण होते.

 प्रभावी : जिवाणू, विषाणू आणि बुरशी नष्ट होतात.

 अन्नाची गुणवत्ता टिकून राहते : चव, रंग आणि पोषणमूल्य कायम राहते.

 कमी देखभाल खर्च : नियमित देखभाल सोपी आणि कमी खर्चिक असते.

 नाजूक फळांसाठी योग्य : द्राक्षे, स्ट्रॉबेरी यांसारख्या नाजूक फळांना कोणतीही इजा होत नाही.

...यासाठी होतो उपयोग

सफरचंद, द्राक्षे, आंबा, संत्री, टॉमेटो, स्ट्रॉबेरी, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, ड्राय फ्रूट्स

- डॉ. विक्रम कड, ०७५८८०२४६९७

कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com