Grass Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Grass Conservation : गवत संवर्धनातून पूर नियंत्रणाकडे...

Team Agrowon

Ecosystem Management : २००८ च्या दरम्यान पर्यावरण तज्ज्ञ माधवराव गाडगीळ हे महाराष्ट्रातील दुर्मीळ परिसंस्थांचे पुनर्जीवन व संवर्धनाविषयी काम करत होते. महाराष्ट्र जनुक कोष या उपक्रमात सागर, वने, शेती, गोडे पाणी, गवताळ प्रदेश अशा सर्व परिसंस्था संवर्धित करण्यासाठीची सुरुवातीची काही पावले उचलली होती.

अर्थातच, हे काम मोठ्या प्रमाणात होण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता असते. कोणत्याही कामांमध्ये लोकांनी उत्स्फूर्ततेने भाग घ्यावा, यासाठी लोकशिक्षण हा महत्त्वाचा टप्पा असतो. गवताची व कुरणांची परिसंस्था व त्याचे एकूणच अन्नसाखळीतील महत्त्व पटविणे, हे तितकेसे सोपे काम नव्हते. कारण कुरणाच्या संवर्धनाचा व्यावहारिक आणि आर्थिक फायदा लोकांना पटला पाहिजे. हे सर्व शिवधनुष्यासारखे आव्हान उगम संस्थेने कसे पेलले, याची माहिती आपण मागील लेखात पाहिली.

गवताचे पर्यावरणीय महत्त्व

जगातील संपूर्ण भूभागांपैकी २५ टक्के भागावर गवताचे राज्य आहे. फक्त मानवाच्याच नव्हे, तर सर्व प्राणिमात्रांच्या उत्क्रांतीमध्ये आणि विकासामध्ये गवताचा अनमोल वाटा आहे. गवते माणसाच्या पृथ्वीतलावरील वास्तव्याच्या साडेसात कोटी वर्षे आधीपासून अस्तित्वात आहे.

गवताच्या भारतात बाराशेपेक्षा अधिक प्रजाती असून, महाराष्ट्रात ८१५ प्रजाती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या आहेत. त्यात शंभराहून अधिक गवते ही पौष्टिक चारा देणारी आहेत. काही प्रजाती औषधी आहेत.

केवळ गवत खाणारे प्राणीच नव्हे, तर जंगलातील उंदारापासून सिंहापर्यंतच्या सर्व अन्नसाखळीच्या संतुलनात गवत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक पक्षी तर त्यांच्या अन्नस्रोत, आश्रयस्थान आणि प्रजननासाठी गवत व गवताळ प्रदेशावरच अवलंबून आहेत.

माणसाच्या आहारातील भात, गहू, ज्वारी, नाचणी व अन्य अनेक अन्नधान्ये ही प्रामुख्याने गवतवर्गीय आहेत. म्हणजे एका अर्थी माणसांच्या अन्नांची ८० टक्के गरज गवताद्वारे भागवली जाते.

गवते रोखतात पुरामुळे होणारे नुकसान

एकेकाळी कयाधू नदीच्या काठावर गवताळ कुरणे होती. तिथे अलीकडे शेती होऊ लागली. गवते आणि कुरणे नाहीशी झाली. त्यामुळे नदीच्या वाढत्या पाण्यामध्ये काठ ढासळून माती वाहून जाण्याचे प्रकार वाढले होते.

दरवर्षी काठावरील पिके आणि सुपीक माती वाहून गेल्यामुळे शेती बरड होऊ लागली. ही माती पुढे विविध बंधाऱ्यामध्ये अडकून त्याची पाणी साठवणक्षमता कमी होत होती. दर पावसाळ्यात नदीची रुंदी वाढत पात्र अधिक उथळ होत होते. हे सारे गवत नसल्यामुळे होत आहे, हे सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचे काम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले.

सामान्यतः गवताची मुळे जमिनीत पाऊण ते एक फूट खोलीपर्यंत पसरलेली असतात. काही जातींच्या गवताची सात, आठ फूट खोलीपर्यंतही जातात. ती केवळ खोलवरच जातात असे नव्हे, तर आडवी वाढून जमिनीखाली भक्कम पण लवचिक, विस्तीर्ण जाळे तयार करतात. हे पसरलेले जाळे माती धरून ठेवते.

गवत वाळल्यानंतर ही मुळे वाळून तितक्या खोलीपर्यंतच्या पोकळ्या तयार होतात. या पोकळ्यांमधून हवा खेळती राहून अन्य मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. याच पोकळ्यांमधून पावसाचे पाणी खोलवर मुरत जाते.

गवतामुळे सरळ सूर्यप्रकाश जमिनीवर पडत नाही. परिणामी, जमिनीचे तापमान कमी राहते. अनेक वेळा हवेच्या तापमानापेक्षा कमी राहते. त्यांच्या आडोशाला ओलावाही टिकतो. अशा ओलावायुक्त जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढते.

गवतामुळे गांडुळे व तत्सम माती उकरणारे प्राणी वाढतात. त्यांच्यामुळे जमीन भुसभुशीत राहते. जमिनीवरील गवताच्या आच्छादनामुळे पावसाच्या वेगवान थेंबाच्या आघाताने होणारी आणि वेगवान वाऱ्यामुळे होणारी मातीची धूप कमी होते.

नदी, नाल्याच्या किंवा ओढ्याच्या काळावर असलेली हीच गवते वाढलेल्या किंवा पुराच्या पाण्यामुळे काठ व त्यावरील माती खरवडली जाण्यापासून रोखण्याचे काम करतात.सोबतच पाण्यातून वाहून येणारी माती काही प्रमाणात तरी अडवण्याचे काम प्रवाह आणि काठावरील गवते करतात. उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत सर्व काठाचा विचार केल्यास हे अडविलेल्या गाळमातीचे प्रमाण प्रचंड मोठे असते.

‘उगम’ संस्थेविषयी थोडक्यात...

निःस्पृह सेवाव्रती जयाजी पाईकराव यांनी स्थापन केलेली ‘उगम ग्रामीण विकास संस्था’ ही हिंगोली जिल्ह्यात गेल्या २८ वर्षांपासून शाश्‍वत ग्रामीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेचे कार्यालय कळमनुरी येथे असून संस्था प्रामुख्याने नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, पतपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, दर्जेदार व पर्यावरण शिक्षण व क्षमता बांधणी या विषयावर काम करते.

ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबासाठी उपजीविका निर्मितीतून शाश्‍वत विकास करून आर्थिक व सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे, हे संस्थेचे मुख्य धोरण आहे. हिंगोली जिल्ह्याबरोबरच वाशीम जिल्ह्यातील ८ गावामध्ये उगम संस्था कार्यरत आहे.

यामध्ये पाणलोट क्षेत्र विकासासाठी सिमेंट नाला बांध बांधणी, शोषखड्डे बरोबर सौर दिवे, दशपर्णी अर्क, शिवांश खत, शाळा दुरुस्ती, हॅंडवॉश स्टेशन, जलशुद्धीकरण यंत्र, महिला बचत गट बांधणी, उपजीविका निर्मिती, आरोग्य शिबीर, पशू आरोग्य शिबिर अशी अनेक कामे केली जातात.

गवतामुळे होईल नदी जिवंत

७०० ते ९०० मिलिमीटर सरासरी पाऊस असतानाही हिंगोली जिल्ह्यातील पाणी परिस्थिती आजही फारशी चांगली नाही. गवत संवर्धनाचा प्रकल्प राबवण्यापूर्वी कयाधू नदीकाठीही काही वेगळी परिस्थिती नव्हती.

नदीला पूर येऊन सर्व पाणी वाहून जायचे. जाताना काठावरच्या शेतातील माती मोठ्या प्रमाणात घेऊन जायचे. भूजलाची पातळी ही ४०० ते ६०० फुटांपर्यंत खोल गेली होती. उगम संस्था आणि लोकांनी केलेल्या कामातून विशेषतः लावलेल्या गवताळ कुरणांमुळे नदीचे काठ वाचले आहेत.

पर्यायाने पुरात वाहून जाणारी शेती वाचली आहे. पडणारा पाऊस गवतावर पसरतो, जास्तीत जास्त मुरतो आणि कमीत कमी वाहतो. त्यामुळे भूजल हळूहळू वाढत आहे. विहिरींच्या पाणीपातळीत झालेली लक्षणीय वाढ हे त्याचेच द्योतक आहे.

काही काळापूर्वी केवळ पावसाळ्यात वाहणारी नदी आता पुढे चार महिन्यांपर्यंत वाहताना दिसू लागली आहे. म्हणजे ओढे, नदीतील अनेक झरे जिवंत होऊ लागले आहेत. गेल्या पाच, सहा वर्षांत चारमाही नदी आठमाही झाली आहे.

अशीच नदी काठावरील गवतांची परिसंस्था जपल्यास ती स्थिरावत जाईल. सध्या हे काम केवळ १२ गावांच्या परिसरातील काठावर झाले आहे. अशीच कामे कधायूच्या उगमापासून संगमापर्यंत झाल्यास योग्य व्यवस्थापनातून कयाधू नदी संपूर्ण बारमाही होऊन नितळपणे वाहताना दिसेल, यात जयाजीरावांना तर अजिबात शंका नाही. त्यांना स्वतःला आपल्या पाणलोट क्षेत्र विकास, गवत कुरण विकास अशा कृती कार्यक्रमावर प्रचंड विश्‍वास आहे. ते म्हणतात, ‘‘कयाधू नदी जोवर बारमाही जिवंत होत नाही, तोवर मी काही मरणार नाही.’’

सतीश खाडे, ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

Crop Insurance : शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा

Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT