River Ecosystem : समजून घेऊ नदीची परिसंस्था

Importance of River Ecosystem : आपल्या डोळ्यासमोर वाहणारी नदी जीवनदायिनी म्हणून माहिती असते. पण केवळ माणूसच नव्हे तर संपूर्ण परिसंस्था तिच्यावर अवलंबून असते.
River Ecosystem
River EcosystemAgrowon
Published on
Updated on

Study of River Ecosystem : आपल्या डोळ्यासमोर वाहणारी नदी जीवनदायिनी म्हणून माहिती असते. पण केवळ माणूसच नव्हे तर संपूर्ण परिसंस्था तिच्यावर अवलंबून असते. नदीच्या विविध टप्प्यांत, प्रवाह आणि काठ या ठिकाणी वेगवेगळ्या परिसंस्था नांदत असतात. या भागामध्ये पाणलोट क्षेत्रासह नदीचे पात्र, काठ या परिसंस्थांविषयी जाणून घेऊ.

नदी उगमापासून संगमापर्यंत किंवा समुद्राला मिळेपर्यंत ती वेगवेगळी रूपे घेते. तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे परिसंस्थेमध्येही ती अत्यंत मोलाची ठरते. सामान्यतः नदीच्या उगमाचे पाणलोट, पुढे नदीचे पाणलोट (नदीचे खोरे), तिचे सपाटीवर वाहणे, पुढे एखाद्या मोठ्या नदीला किंवा समुद्राला जाऊन मिळणं हे नदीच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे.

या सर्वच टप्प्यांमध्ये अनेक उपटप्पेही असतात. उगम, धबधबे, पाणलोट, काठ, तळ, डोह, डबकी, वळणं, प्रपात ते खाडी मुख अशा नदीच्या प्रत्येक रूपात वेगवेगळी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण अशी परिसंस्था तयार होत असते.

जिथून जिथून नदीला पाणी येऊन मिळते त्या प्रदेशास नदीचे पाणलोट क्षेत्र होय. उगमाच्याही पलीकडे सुरू झालेले हे क्षेत्र संगमापर्यंत व खाडीपर्यंत पसरलेले असते. बहुतांश सर्व नद्यांचा उगम हा डोंगराळ प्रदेशात असतो.

तिथे भरपूर झाडी, जंगल असून असंख्य अरुंद जलधारांचा हा प्रदेश असतो. डोंगराचा हा सर्व भाग झाडांमुळे एखाद्या स्पंजासारखा काम करतो. पडणारा पाऊस जमिनीत अन् डोंगरात मोठ्या प्रमाणात शोषला जातो. पुढे ते झिरपून खडकाखडकांतून झऱ्यांच्या रूपात बाहेर पडतो. हेच झरे त्या नदीला बारमाही किंवा दीर्घकाळ वाहती करतात.

पाणलोटाचे प्रतिबिंब नदीत पडते. म्हणजेच पाणलोटात घडणाऱ्या निसर्गाच्या दृष्टीने चांगल्या वाईट गोष्टींचे पडसाद नदीत दिसतात. या क्षेत्रातील जैवविविधतेचा खूप मोठा प्रभाव नदीच्या प्रवाहातील जैवविविधतेच्या भौतिक व जैव घटकांवर पडतो. उदा. पाणलोट क्षेत्रात जंगल अधिक असेल, तर नदीत गाळ व माती कमी येतो. या क्षेत्रात रासायनिक खते व कीटकनाशकांची अधिक वापर असेल, तर ती जमिनीतून झिरपून ओढ्यात अन् ओढ्यातून नदीत येतात.

(Marathi agriculture news)

नदीचे काठ :
नदीचा प्रवाह वाहतो, त्याला दोन किनारे आपोआप तयार होतात. हे किनारे पावसाळ्यात दुथडी भरून वाहताना, पुराच्या वेळी वाढलेले असतात, त्याला पूर म्हणतात. तर उन्हाळ्यापर्यंत प्रवाहाची रुंदी कमी होत आकसत जाते.

गेल्या पंचवीस वर्षांतील सर्वांत मोठ्या पुराची सीमा जिथपर्यंत असेल, त्या रेषेला ‘नील रेषा’ (Blue line) म्हणतात. तर शंभर वर्षातून एकदा आलेल्या सर्वांत मोठ्या पुराची सीमा ‘लाल रेषा’ (रेड लाइन) म्हणतात.

दोन्ही बाजूंच्या लाल रेषेदरम्यानच्या सर्व भागाला नदीचा प्रदेश (रिव्हर कॉरिडॉर) म्हणतात. म्हणजेच सध्या असलेल्या काठांना तर या पूर्ण कॉरिडॉरला नदीच समजले जाते. नदी वाहताना लहान मोठी वळणे घेत ती वाहते. वळणाच्या आतील भागात जमिनीवरून नदीने वाहून आणलेला गाळ पसरवते. वळणाच्या बाह्य बाजूने जमीन कोरली जाते.

River Ecosystem
Agriculture Ecosystem : शेती ही मानवनिर्मित परिसर संस्था

नदीचा आकार व रूप तयार होण्यात लाखो वर्षांच्या अशा घडामोडींचा कारणीभूत असतात. प्रवाहामुळे होणारी धूप, माती, गाळ व त्यात मिसळलेला जैवभार वाहून नेणे. स्थिर परिस्थितीत हा गाळ व जैवभार काठालगत पसरवणे.

यातूनच नदीच्या पात्राचा आकार ठरतो. नदीचे हे कॉरिडॉर अतिक्रमणापासून मुक्त ठेवायला हवेत. नदी किंवा कोणत्याही नैसर्गिक प्रवाहाचे सरळीकरण करणे हे घातक ठरू शकते. ही वळणे ही अनेक जलचरांची आश्रयस्थाने असून, त्यांची एक खास परिसंस्था असते.

बऱ्याच नद्यांच्या काठी असलेल्या दाट झाडीला ‘रायपेरियन झोन’ असे म्हणतात. यात त्या त्या भागातली ठरावीक, मोठ्या व भक्कम खोडांची झाडे असतात. त्यांच्या मुळांची दाट जाळी किनाऱ्यावरील मातीत असते. तसेच वरील फांद्यांमुळे दाट सावलीही असते. मुळांमुळे काठांची झीज होत नाही. मुळांमध्ये पाणी शोषण्याची क्षमता असून, ते एकमेकांना आधार देतात, येणारा गाळ वाढवतात.

पूरस्थितीत त्याचा मोठा फायदा होतो. नदीकाठच्या जमिनीत जिरलेली जादा खते व कीटकनाशकेही नदीत येण्यापासून रोखली जातात. जमिनीखालून नदीला येऊन मिळणारे पाणी नैसर्गिकरीत्या गाळले जाते. झाडांच्या पाण्यावर पडलेल्या सावलीमुळे तिथे जैवविविधता अधिक फुलते, फोफावते. झाडांची पाने पाण्यात पडून ते कुजून जलचरांना अन्न आणि वनस्पतींना खतही मिळते. या सर्वांमुळेच पक्ष्यांच्या प्रजाती व संख्या दोन्हीही खूप वाढतात.

(Agriculture Information In Marathi)

River Ecosystem
Agriculture Ecosystem : जगाचा गोल शेतकरी आणि स्त्रीयांच्या हातांवर

नदीपात्राची विविधता ः
नदीपात्र म्हणजे प्रत्यक्ष पाण्याचा प्रवाह. त्यात काय काय असते, ते पाहू. उगमाजवळ बहुधा मोठाले खडक असतात. या मोठमोठे दगड आणि त्याभोवती तयार झालेले खाचखळगे हे एक स्वतंत्र आश्रयस्थान (Habitat) असते. तिथे वाढणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती, कीटक आणि जलचरांच्या प्रजाती असतात. त्यांची स्वतंत्र परिसंस्था (Ecosystem) असते.

डोंगरातून पाणी खाली झेप घेते, अशा ठिकाणी लहानमोठे धबधबे असतात. इथेही विशिष्ट अशी उभी परिसंस्था (व्हर्टिकल वेटलँड इकोसिस्टीम) तयार होते. येथे इतरत्र न आढळणारी विशिष्ट झुडपे, वेली, कीटक आणि पक्षी सापडतात. पुढे नदी थोडी सपाटीला आल्यानंतर पात्रातील दगडांचा आकार हळूहळू छोटा होत जातो. सपाटीवर तर गोटेच दिसतात.

या दगडांवर पाणी आदळल्यामुळे पाणी फेसाळ दिसते (याला ‘riffles’ म्हणतात.), त्याचे हवेत तुषार उडतात. पाण्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिसळला जातो. पाणी अधिकाधिक शुद्ध व ताजे होत जाते. या परिस्थितीशी जुळणारी परिसंस्था व जैवविविधता तयार झालेली असते.

पात्रात काही ठिकाणी खोल व उथळ लहान मोठ्या खड्डेवजा जागा तयार होतात. त्याला ‘पूल्स’ म्हणतात. मोठ्या जागांना ‘डोह’ तर छोट्यांना ‘डबके’ म्हणतात. इथेही स्वतंत्र आश्रयस्थान आणि वेगळ्याच विशिष्ट प्रजाती असतात.

काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे खडकात माठाएवढे किंवा त्याही पेक्षा मोठे खळगे तयार होतात. याला रांजणखळगे (Pot Holes) असे म्हणतात. यातील एकेक आश्रयस्थान तयार होण्यासाठी हजारो लाखो वर्षे लागलेली असतात.

इतक्या दीर्घकाळात प्रत्येकाभोवती वेगवेगळी परिसंस्था तयार झालेली असते. उगमाजवळ मिळणारे मासे व जलचर वेगळे, डबक्यातले वेगळे, डोहातले वेगळे, फेसाळ पाण्यातील वेगळे... या वनस्पतींपासून कीटकांपर्यंत आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या सजीवांचेही वैविध्य दिसते. त्यामुळेच ती परिसंस्था समृद्ध असते.

(Farming News in Marathi)

पुढे एकदम सपाटीवरून नदीच्या तिच्या तळाशी वाळूचे थरच्या थर असतात. ही वाळू नदीतळाची सच्छिद्रता कायम ठेवते. त्यामुळे जमिनीत पाणी झिरपण्याची प्रक्रिया वेगाने होते. वाळू नसल्यास वाहून येणाऱ्या गाळामुळे नदीतळातील पाणी मुरणे कमी होत होत पूर्ण बंद होते. म्हणून नदीतील वाळू ही भूजल वाढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. याच वाळूत मासे व इतर जलचर अंडी घालतात.

नदीने वाहून आणलेल्या वाळूत अडकून, साठलेल्या बायोमासवर बरेच छोटे जीव पोसले जातात. सपाटीला नदीची खोली ही जास्त असते, म्हणून नदीच्या खोलीच्या तळ, मध्य भाग आणि पृष्ठभाग अशा तीनही थरामध्ये मासे व जलचरांच्या वेगवेगळ्या प्रजाती नांदतात.

नदी शेवटी समुद्राला जाऊन मिळते. तिथे एक तर त्रिभुज प्रदेश तयार करते किंवा खाडीतून समुद्राला आलिंगन देते. ही खाडीही जैवविविधतेने समृद्ध आणि स्वतंत्र परिसंस्था असते. तिला ‘कांदळवन’ म्हणतात. त्याविषयी पुढील लेखात...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com