Grass Conservation : गवत संवर्धनातून वाचली शेते

Grass Benefits : सामान्यतः जलसंधारण म्हटले की धरणे, पाणलोट विकास, विविध प्रकारचे बंधारे, तळी किंवा विहीर पुनर्भरण, ओढे, नाले, नद्या आणि जास्तीत जास्त धरणे अशा काही ठरावीक बाबीच आपल्या डोळ्यासमोर येतात. पण आपल्या अवतीभवती सर्वत्र दिसणाऱ्या गवताला आपण विसरून जातो
Grass Conservation
Grass ConservationAgrowon
Published on
Updated on

सतीश खाडे

Grass Farming : आपण शेतकरी मंडळींसाठी तर शेतात उगवणारी गवते म्हणजे तण. तण म्हटले की पिकांचा शत्रू मानून चालणारी जगरहाटी. पण असा एक भाग आहे, की जिथे शेतकरी त्यांच्या परिसरातील नदीकाठच नव्हे, तर शेत आणि परिसरामध्ये चक्क गवत वाढवतात. हो, इथे काहीजन पीक म्हणून गवताची लागवड करतात, असे सांगितले तर तुम्हाला आश्‍चर्याचा दुसरा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

गवतामुळे समृद्धी येते, याची माहिती प्राथमिक शाळेतील मुलांना दिली गेली. त्यांनी ती आपल्या आई-वडिलांना गवतांच्या अर्थकारणासह समजून दिली. या पालकांनीही मुलांना ‘तुला रे काय कळतंय?’ असे म्हणण्याऐवजी चक्क ते कृतीत आणले. हे सारी नवलाई घडवली ती कळमनुरी (जि. हिंगोली) येथे कार्यरत उगम संस्थेने. अर्थात, मी जितक्या सहजतेने सांगतोय, तितक्या सहजासहजी घडलेले नाही. त्यामागे उगमच्या कार्यकर्त्यांचा भरपूर अभ्यास, प्रशिक्षणे, कल्पकतेसोबतच गावकऱ्यांचाही वेळ आणि श्रमांची गुंतवणूक कारणी लागलेली आहे.

कयाधू ही पैनगंगेची उपनदी. उगमापासून संगमापर्यंत तिची लांबी ९९ कि.मी. त्यापैकी बारा गावांचा नदीचा १७ किलोमीटरचा काठ कुरण परिसंस्था संवर्धन व विकासासाठी उगम संस्थेने निवडला. नदीकाठच्या बऱ्याच ठिकाणी शेती होती. पर्यायाने गवत नाहीसे झाले होते. नदीला येणाऱ्या पुरामध्ये काठाची मातीच नव्हे, तर शेताचा काही भागही पाण्यासोबत वाहून जात होता. त्यामुळे दर पावसाळ्यात नदीची रुंदी वाढत चालली होती.

हा गाळ पुढे नदीमध्ये बांधलेल्या बंधाऱ्यात साठत होता. गाळ साठत साठत पाण्याची साठवणक्षमता कमी होत होती आणि तिथे पात्र अधिक उथळ होत होते. दरवर्षी पाण्यासोबत खरवडून जाणाऱ्या सुपीक मातीमुळे जमिनीही नापिकीकडे चालल्या होत्या. हा प्रश्‍न गंभीर आणि सरळ पोटाशीच जोडलेला होता. हे सर्व शेतकऱ्यांनाही समजत होते. पण त्यामागील कारण त्यांच्या लक्षात येत नव्हते.

गावातील म्हातारेकोतारे सांगायचे की पंचवीस-तीस वर्षांपूर्वीपर्यंत नदीकाठी भरपूर गवत होते. चक्क मोठमोठी कुरणे होती. पूर्वी परभणी जिल्ह्याचा भाग असलेला हा पूर्व पट्टा गवताचे आगर होता. १९७२ च्या दुष्काळात व नंतरही काही दुष्काळात पूर्ण मराठवाड्याला गवत हिंगोलीने पुरवले होते. याच मुळे पूर्वी हिंगोलीमध्ये पशुधन व दूध व्यवसाय बऱ्यापैकी होता. याच हिंगोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे वळू पैदास केंद्रही आहे.

Grass Conservation
Carrot Grass : स्थलांतर करायला लावणारे गाजर गवत

कयाधूच्या काठी तेव्हा...

कयाधू नदीच्या काठावरील गावामध्ये नेमके याच्या उलट घडत होते. गवतांची कुरणे कमी होत होती. त्यामागील कारणांचा विचार केला तर... पिढी दर पिढी जमिनीचे होत गेलेले तुकडेकरण हे मुख्य कारण ठरते. आजवर पडीक असलेली प्रत्येक शेती आणि तिचा कोपरा न कोपरा पिकाखाली आणण्याकडे लोकांचा कल झाला. त्यात मुख्यत्वे सोयाबीन, कपाशी व मूग अशी पिके घेतली जाऊ लागली. अधिक उत्पादनाच्या आशेने रासायनिक खते, कीडनाशके आणि तणनाशकांचा वापर वाढला.

ट्रॅक्टरच्या साह्याने खोलवर नांगरणी करून गवते संपवली गेली. ही कुरणे नष्ट झाली तसे पशुधनही कमी होत गेले. गवत नाही, म्हणून पशुधन नाही आणि पुढे जनावरे नाहीत, मग गवताची गरजच काय, हे दुष्टचक्र सुरू झाले. एखाद्या ठिकाणी शिलकी राहिलेल्या गायरानावर गावातल्या सगळ्याच जनावरांची चराई झाल्याने गवताचे खूप नुकसान होत गेले. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर लोकांना गवतांचे महत्त्व पटविणे, त्यांना लागवडीसाठी तयार करणे म्हणजे दिव्यच होते.

पण उगमच्या कार्यकर्त्यांनी चिकाटीने केलेल्या प्रयत्नांना यश येत गेले. त्यासाठी उगमच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर स्थानिकांकडून प्राथमिक माहिती गोळा केली गेली. गावकऱ्यांच्या सातत्याने भेटी घेत, त्यांना विश्‍वासात घेतल्या. गवताच्या एकेक स्थानिक जाती, त्यांची नावे समोर येत गेली. पवना, मारवेल, जोंधळी गवता यासारख्या ३५ नव्या गवताच्या जाती समजल्या. पुढे गेल्यावर स्थानिक शहाणिव जागी झाली. त्यातून एकेक मोलाची माहिती पुढे आली. त्यातून कळत नकळत जैवविविधतेची माहिती जमा होत गेली.

उदा. मारवेल काळ्या जमिनीत फोफावते. ती इतर कोणत्याही झाडाला व गवताला उगवू देत नाही. म्हणजे शास्त्रीय भाषेत - डॉमिनंट स्पेसिज. पण मारवेल गवत थोडे जरी खाल्ले तरी जनावरांची भूक भागते. त्यांचे दूध वाढते. दुधाची स्निग्धता ही वाढते.

जोंधळी गवत जनावरांना खायला खूप आवडते. सुकलेले जोंधळी गवतही जनावरांना स्वादिष्ट वाटते. ते हलक्‍या जमिनीत खूप वाढते. ३) पवना गवत खाणाऱ्या गाई-म्हशींचे दूध वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यात स्निग्धता ही भरपूर असल्याने शरीर कमावणाऱ्या पैलवानांची पहिली पसंती पवना दूध व त्याच्या तुपास असते. या भागात तर ‘पवन्याचा पैलवान’ असा शब्दच रूढ आहे.

माणसांना वळणे अवघड...

आता पुढचा टप्पा होता लोकांना गवत संवर्धनात उत्स्फूर्तपणे खेचण्याचा! मुक्या जनावरांना वळणे सोपे, पण माणसांना वळणे अवघड असे म्हटले जाते. लोकांशी बोलायला सुरुवात केली तर लोक चक्क कार्यकर्त्यांना हसायला लागले. ‘‘गवत काय राखायचे, राव!’’ काहींना यामागे काळेबेरं वाटलं, काहीच्या मनात संशय उमटला. लोक प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष हाकलून द्यायचे किंवा स्वतःच निघून जायचे. बारा गावांच्या नदी काठावरून पायपिटी करूनही संवाद काही होईना. तोपर्यंत जीपीएस व इतर सॅटेलाइट इमेजेसने नदी व कुरण पट्ट्यांची मोजमापे व लोकेशन्स मिळून पहिला रिपोर्ट तयार झाला होता.

गवतांबद्दल बोलायला जावे, तर लोक ऐकायलाही तयार नव्हते. आता काय करायचे? उगम संस्थेने वेगळाच उपाय केला. त्यांनी या भागातील शाळाशाळांमध्ये जाऊन मुलांना माहिती द्यायला सुरुवात केली. मुलांमध्ये गवत संवर्धनाबद्दल प्रथम उत्सुकता, जाणीव आणि जागृती निर्माण करण्यासाठी उपक्रम राबविण्यात आले. पर्यावरण शिक्षणांतर्गत त्यांच्या वयानुसार गटागटाने काही विषय, प्रकल्प दिले गेले. त्यातून रंजकतेने मुलांच्या मनात पर्यावरण आणि त्यासाठी गवतांची आवश्यकता यांचे महत्त्व पटवले.

Grass Conservation
Cotton Pest Management : कापूस पिकात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वेळीच करूया नियंत्रण

या विषयांवर मुले पालकांशी संवाद साधू लागली. हळूहळू संस्थेचे कार्यकर्ते आणि मुले यांची पालकांसह गट चर्चा घेण्यात आली. त्यात विशेषतः गवताच्या पर्यावरणीय महत्त्वासोबतच व्यावहारिक महत्त्व समजावण्यात आले. त्यातही गवतातून मिळणाऱ्या नफ्याची तुलना ही पारंपरिक कापूस, सोयाबीन, मठ या सारख्या पिकांशी करण्यात आली. सोयाबीनच्या उत्पन्न आणि खर्चाविषयी हिशोब करताना नांगरणी, अन्य मशागत, बियाणे, खते, कीडनाशके. तणांची खुरपणी, कापणी, मळणी, वाहतूक खर्च, हमाली, दलाली हा सर्व खर्च शेतकऱ्यांकडून वदवून घेतला.

इतका खर्च केल्यानंतर त्यातून येणारा निव्वळ नफा नोंदवण्यात आला. तो एकरी २० ते ३० हजारादरम्यान आला. आता गवतासाठीच्या रकान्यामध्ये केवल खिसाई (काटेरी झुडूप, झाडझाडोरा काढून टाकणे.) जैविक किंवा काटेरी कुंपणाची मजुरी, गवताची कापणी इतकाच खर्च आला. तर गवतातून येणारा निव्वळ नफा पोहोचला एकरी २५ हजारांपर्यंत. पुन्हा तुलनेने फारसे कष्ट नाहीत की पीक तोट्यात जाण्याची जोखीम नाही. त्यातून गवताविषयी किमान सकारात्मकता तरी निर्माण झाली.

आता उगम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा १२ गावांमध्ये पदयात्रा सुरू केली. त्यात आर्थिक व व्यावहारिक स्पष्टीकरण अधिक अचूक करण्यास सुरुवात केली. चांगला प्रतिसाद मिळू लागला. यातून ५६५ शेतकरी जोडले गेले. नदीकाठावरील शेती असलेले तर जवळ जवळ सर्वच शेतकरी जोडले गेले. शेतात चक्क गवत लावायला सुरू केले. गवत ही संपत्ती झाल्यामुळे त्याच्या चोरीच्या घटना वाढू लागल्या. त्यावर उपाय म्हणून महिला आणि पुरुष शेतकऱ्यांचे गट बनवले. त्याला नाव दिले ‘पार्टिसिपेटरी गॅरेंटी ग्रुप’. असे ११२ गट झाले. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष असे पारंपरिक अहंकार व मोठेपणा देणारी पदे निर्माण करण्याऐवजी ‘गवत संवर्धक’ व ‘सहसंवर्धक’ अशी पदे निर्माण केली. त्यातून एकमेकांचे हित आणि गवतांचे संवर्धन हा मूळ गाभा असल्याचे कायम स्पष्ट राहिले. गवताची गट शेती हा महाराष्ट्रातील काय, पण भारतातलाही पहिलाच प्रयोग असावा.

पर्यावरणाचे आर्थिक मूल्यमापन (इकॉनोमिकल इव्होल्युशन ऑफ एन्व्हायर्न्मेंट) हा जगातील अर्थशास्त्र व पर्यावरण दोन्ही क्षेत्रातील पंडितांचा चिंतन व चर्चेतील प्राथमिकता असलेला मुद्दा आहे. समृद्ध पर्यावरणातूनच समाजाची आर्थिक समृद्धी साधता येते, याचे हे आणखी एक चांगले उदाहरण.

गवताची शेती रुजल्यावर ‘उगम’ ने गटशेतीच्या पुढील टप्पा म्हणून ‘ग्रास प्रोटेक्शन कमिटी’, ‘जैवविविधता कमिटी’ची प्रत्येक गावात स्थापना केली. यात शेतकऱ्यांबरोबरच गुराख्यांनाही स्थान दिले. कारण त्यांच्याकडे रानोमाळ भटकताना अनुभवातून मिळालेल्या माहितीचा खजिना असतो. ग्रामीण भागातील औषधी वनस्पतींच्या साह्याने उपचार करणाऱ्या स्थानिक वैद्य, वैदूंनाही स्थान दिले. त्याला जोड दिली ती गावातील जाणकार, वयोवृद्ध आणि समजूतदार लोकांची.

आता वर्षाच्या तीनही हंगामांत स्थानिक लोक गवताचे पीक घेत आहेत. चक्क काही शेतामध्ये स्प्रिंकलर लागलेत. कारण गवतासोबतच, गवताचे बी, बियाणे यांचाही व्यापार सुरू झाला आहे. नदीकाठच्याच नव्हे, अन्य शेतातही अनेक जण गवताचे पीक घेऊ लागलेत. गायी, म्हशी, बैल यांची संख्या वेगाने वाढत आहे. दूध संकलनासाठी नवी केंद्रे गावात सुरू झाली आहेत. बारा गावांत उगम संस्थेचे हे काम सुरू असले, तरी आजूबाजूच्या गावांतले शेतकरीही गवत लागवडीकडे व पशुपालनाकडे वळले आहेत. घराघरांमध्ये समृद्धी नांदू लागली आहे. गवताचे गावाच्या जलसंधारणासाठी कसे फायदे झाले, याची माहिती पुढील लेखामध्ये घेऊ.

सतीश खाडे, ९८२३०३०२१८, (लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com