New Delhi News: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन (वय ८४) यांचे शुक्रवारी बंगळूरमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून वृद्धत्वाशी संबंधित तक्रारींचा ते सामना करत होते.
आज सकाळी बंगळूर येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव रमन रिसर्च इन्स्टिट्यूट येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून रविवारी (ता.२७) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. केरळमधील एर्नाकुलम येथे २४ ऑक्टोबर १९४० रोजी सी.एम. कृष्णास्वामी अय्यर आणि विशालाक्षी या दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांनी १९९४ ते २००३ दरम्यान नऊ वर्षे ‘इस्रो’चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. अंतराळ संशोधनातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
‘इस्रो’च्या अध्यक्षपदाबरोबरच कस्तुरीरंगन यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. ते कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचेही कुलगुरू होते. त्याचप्रमाणे ते राज्यसभेचे तसेच नियोजन आयोगाचेही सदस्य होते. बंगळूरमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्सड स्टडीजचे ते २००४ ते २००९ दरम्यान संचालक होते.
डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाचे वृत्त दु:खदायक आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष म्हणून त्यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्ञानाच्या आवडीतून त्यांनी विविध क्षेत्रांत योगदान दिले. पुढील पिढीच्या जडणघडणीला आकार देणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा तयार करण्यातही त्यांनी योगदान दिले. त्यांचे कुटुंब व चाहत्यांच्या दु:खात सहभागी आहे.द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
भारताच्या वैज्ञानिक व शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या कस्तुरीरंगन यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले. दूरदर्शी नेतृत्व आणि देशासाठीच्या निःस्वार्थ योगदानाबद्दल ते सदैव स्मरणात राहतील. त्यांनी इस्रोमध्ये खूप मेहनत घेत भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेले. त्यामुळे, देशाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. त्यांच्या नेतृत्वात महत्त्वाकांक्षी उपग्रह प्रक्षेपण देखील झाले. त्यांनी नाविन्यतेवर लक्ष केंद्रित केले.नरेंद्र मोदी, पंतप्रधान
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.