Mahabeej  Agrowon
ॲग्रो विशेष

Mahabeej : रब्बीसाठी ‘महाबीज’ची तयारी पूर्ण

Team Agrowon

Akola News : यंदा राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होत असून प्रकल्पही वेगाने भरत आहेत. ही परिस्थिती आगामी रब्बी हंगामासाठी पोषक मानली जात आहे. या हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितने (महाबीज) मुबलक प्रमाणात बियाणे पुरवठ्याचे नियोजन केले आहे. राज्यात काही भागांत रब्बी ज्वारीची लागवड गोकुळाष्टमीनंतर सुरू होते. त्यादृष्टीने ज्वारीच्या बियाण्याचा पुरवठासुद्धा यापूर्वीच सुरू करण्यात आला आहे.

रब्बीसाठी महाबीजचे बियाणे नियोजन व पुरवठ्याबाबत ‘ॲग्रोवन’ला माहिती देताना विपणन महाव्यवस्थापक प्रकाश टाटर म्हणाले, की रब्बी ज्वारीची लागवडीला काही ठिकाणी सुरुवात झाली असल्याने महाबीजने बियाण्याचा पुरवठा तातडीने यापूर्वी केला आहे. यंदा रब्बीसाठी १० वर्षांआतील वाणांचे सुमारे २७ हजार क्विंटल, तर १० वर्षांवरील वाणांचे साडेनऊ हजार क्विंटल बियाणे महाबीजकडे आहे.

सुमारे साडेतीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राच्या पेरणीसाठी हे बियाणे पुरेल एवढे आहे. या वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्वारीची ‘फुले सुचित्रा’ ही गावरान जात देत आहोत. शेतकऱ्यांना या ज्वारीचे अधिक उत्पादन मिळू शकते. जनावरांसाठी मुबलक चारा व धांडा रसाळ आहे. ज्वारीची भाकरी मऊ व खायला चवदार लागते, ही वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे ‘फुले सुचित्रा’ हा स्थानिक वाण (उदा. दगडी, चोपडी, शाळू) यांना एक सक्षम पर्याय म्हणून शेतकरी पेरणी करू शकतात. राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य योजनेतून ज्वारीच्या १० वर्षांआतील वाणास प्रतिकिलो ३० रुपये, तर १० वर्षांवरील वाणाच्या बियाण्यास प्रतिकिलो १५ रुपये अनुदानही शेतकऱ्यांना मिळणार आहे.

राज्यात रब्बीत महाबीज सुमारे दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक बियाणे पुरवठा करणार आहे. यात विशेषत्वाने हरभऱ्याच्या ‘जॅकी ९२१८’ या वाणाचे सुमारे एक लाख ५३ हजार क्विंटल बियाणे आहे. मागणी वाढली तर दोन लाख क्विंटलपेक्षाही अधिक बियाणे पुरवठा करण्यासाठी महाबीज नियोजन करीत असल्याचे श्री. टाटर म्हणाले. यंदा गव्हाचे ८० हजार क्विंटल बियाणे पुरवण्याचे नियोजन आहे. यात जीडब्ल्यू ४९६, लोकवन, एमएसीएस ६२२२, फुले समाधान अशा लोकप्रिय व मागणी असलेल्या वाणांचे बियाणे आहे.

करडईला मागणी चांगली

या रब्बी हंगामात लागवडीसाठी करडईची मागणी असल्याचे विपणन महाव्यवस्थापक प्रकाश टाटर म्हणाले. गेल्या काही वर्षांत हे पीक दुर्लक्षित होत चालले होते. पण आता मागणी वाढते आहे. या वर्षी महाबीज १५०० क्विंटल बियाणे पुरवठा करीत असून, त्याद्वारे सुमारे १५ हजार हेक्टरवर पेरणी होऊ शकेल. जवस व मोहरीचेही बियाणे महाबीज पुरवत आहे.

सध्या उपलब्ध असलेले बियाणे

पीक उपलब्ध बियाणे

हरभरा २ लाख क्विंटल

गहू ८० हजार क्विंटल

ज्वारी ३६५०० क्विंटल

करडई १५०० क्विंटल

जवस ३७५ क्विंटल

मोहरी ८० क्विंटल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत सध्याचे हरभरा दर ?

Sugarcane FRP : ऊस उत्पादकांना ‘एफआरपी’बाबत अपेक्षा

Heavy Rain Damage : पुसदमध्ये अतिवृष्टिग्रस्तांना विशेष पॅकेज देण्याची मागणी

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन अनुदानासाठी प्रतीक्षाच

Crop Insurance : पालम तालुक्यातील शेतकरी पीकविमा परताव्यापासून वंचित

SCROLL FOR NEXT