Tur Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Production : आगामी खरिपात तुरीवर करा लक्ष केंद्रित

Kharif Season : खरीप अजून चार-पाच महिने पुढे आहे. परंतु या हंगामाचे चिंतन आत्तापासूनच करावे लागणार आहे.

Team Agrowon

Agriculture : सरत्या वर्षाची फलनिष्पत्ती आणि नवीन वर्षाची सुरुवात याचा कृषी क्षेत्राशी ताळमेळ लावायचा असेल तर काही बाबी शेती पिकासाठी सर्व मिळून प्राधान्याने कराव्या लागतील. मराठवाड्याच्या शेतीला बऱ्याच अंशी एकविध पीकपद्धतीने घेरले आहे.

मागील वीस वर्षांपासून बीटी कापूस आणि दशकभरापासून सोयाबीन या दोन पिकांचे मराठवाड्यात खरिपातील वहितीखालील साठ टक्यांपेक्षा जास्त क्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे ही पिके जेव्हा संकटात सापडतात तेव्हा मराठवाड्यातील शेती आणि शेतकरी अडचणीत येतो.

मागील २०२३ या वर्षात असेच झाले आहे. खरीप हंगाम सुरू झाला पण हमखास पाऊसमान राहील, याची खात्री हवामान विभागाकडून मिळत नव्हती. परंतु दिलासादायक हंगाम राहील अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह या क्षेत्रातील सर्वच व्यक्त करत होते. लहरी हवामान आणि या जोडीला एकविध पीक पद्धती यामुळे शेतकरी अडचणीत आले.

वारंवार तिच ती पिके यामुळे या पिकावरील कीड-रोगाच्या समस्या देखील वाढल्या आहेत. साहजिकच उत्पादन खर्च दरवर्षी वाढत आहे. त्या तुलनेत उत्पादन दिसून येत नाही. याचा ही विचार या क्षेत्रातील मंडळीने करणे गरजेचे वाटते.

मराठवाड्याच्या शेतीचा मागोवा घेतला तर तीन वर्ष २०२९-२०, २०२० -२१ व २०२१-२२ काही भागांत अतिवृष्टीची राहिली शिवाय सोयाबीन व मका पीक काढणीत मोठा पाऊस अनेक तालुक्यात झाला. त्यामुळे या दोन्ही पिकांचे खूप नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

मका व सोयाबीनला शेतात कोंब फुटले. त्यामुळे या शेतीमालाचा दर्जा घसरला. या शेतीमालास भाव मिळाला नाही. शिवाय बीटी कापसाचे देखील अतिवृष्टीने अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. मागचे वर्ष २०२३ तर फारच लहरी गेले. या शिवाय मागील तीन-चार वर्षे पाऊस असूनही फार चांगले गेले, असा दावा कोणी करू शकत नाही.

हा सर्व अनुभव पाहता पुढील खरीप २०२४ साठी नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात वेगळे चिंतन करावे वाटते. कोरडवाहू भारी जमिनीत सलग सोयाबीन व कापूस पिकात आंतरपीक म्हणून तूर पिकाच्या काही ओळी घेता येऊ शकतात. क्षेत्रीय भेटीत असे लक्षात येते की सोयाबीन, कापूस ही पिके बहुतांश शेतकऱ्यांनी सलग घेतल्याचे दिसते.

त्यामुळे या पिकांत आंतरपीक म्हणून तूर नक्कीच उपयुक्त ठरेल. तुरीमुळे इतर शेती पिकांची जोखीम नक्कीच कमी होण्यास हातभार लागेल. जेव्हा कापूस आणि सोयाबीन ही दोन पिके हाती लागत नाहीत त्यावर्षी शेतकऱ्यांचे सर्व अवसान निघून जाते. खरीप अजून चार-पाच महिने पुढे आहे. परंतु या हंगामाचे चिंतन आत्तापासूनच करावे लागणार आहे.

आपण घेत असलेल्या पीक पद्धतीत काय बदल होऊ शकतो, किती प्रमाणात पीक फेरपालट करू शकतो, किती प्रमाणात आंतरपिके घेता येतील, कोणत्या मुख्य पिकात कोणते आंतरपीक फायदेशीर राहील, यासाठीचे सखोल मार्गदर्शन देखील शेतकऱ्यांना झाले पाहिजे. आज मराठवाड्यात सोयाबीन प्रथम क्रमांकावर असलेले पीक आहे.

या पिकावर कीड-रोगांचा विळखा वाढला आहे. सातत्याने एकच पीक घेतल्याने ते पीक सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, याची काळजीही घ्यावी लागेल. याची दुसरी बाजू म्हणजे या पिकांचा व्यवस्थापनाचा खर्च वाढत आहे. परंतु अपेक्षित उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाही. म्हणून आपण घेत असलेल्या सलग सोयाबीन, कापूस या पिकांत तुरीची लागवड आंतरपीक म्हणून करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात नुकतेच राज्यस्तरीय मृदा आरोग्य चिंतन पार पडले. यावेळी राज्यातील मृदा आरोग्य विषयाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. या शास्त्रज्ञांकडून राज्यातील मातीचे घटते आरोग्य यावर मोठी चिंता व्यक्त केली गेली. आपले लोकशाही राष्ट्र आहे. शेतकरी आपल्या पिकाची निवड स्वतः करू शकतात, हा त्यांचा अधिकार आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही.

परंतु आपण वारंवार एकच पीक घेत असल्यामुळे आपल्या शेतीचा पोत घसरत चालला आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आणि म्हणून वरील सर्व चिंतनातून एक निष्कर्ष नक्कीच काढता येतो की आपण प्रयत्न पूर्वक तूर पिकाची लागवड आंतरपीक म्हणून अथवा सलग पीक म्हणून करणे गरजेचे झाले आहे. सुदैवाने तूर पिकाचे संशोधन करणारे कृषी संशोधन केंद्र बदनापूरने मराठवाड्याच्या नव्हे तर संपूर्ण राज्याच्या शेतीसाठी उपयुक्त ठरणारी वाण निर्मिती करण्यात येथील संशोधकांना यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी खरिपातील पीक नियोजनात तूर पिकाचा आवश्य समावेश असावा.

- डॉ. सूर्यकांत पवार आणि रामेश्वर ठोंबरे,

विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, छत्रपती संभाजी नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT