Orange Farming Management :
शेतकरी नियोजन
पीक : संत्रा
नाव : मंगेश देशमुख
गाव : सुरळी, ता. चांदूरबाजार, अमरावती
एकूण शेती : दहा एकर शेती
संत्रा बाग : सहा एकर (७५० झाडे)
देशमुख कुटुंबीयाची दहा एकर शेती असून, पूर्वी मंगेश यांचे वडील वामनराव शेती पाहत. मात्र मंगेश यांनी २००७ पासून शेती व्यवस्थापनाला सुरुवात केली. २००५ मध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीर मिळाली होती. २००७ मध्ये कृषिपंपाकरिता वीजपुरवठा देखील मिळाला. पाण्याची सोय झाल्याने पूर्वीची कपाशी, तूर, सोयाबीन यासारखी कोरडवाहू पिके कमी करत फळबागेकडे मोर्चा वळवला.
सुरुवातीला १८ बाय १८ फूट अंतरावर ५०० कलमांची लागवड केली. मात्र सुरळी गावातील काही शेती ही पाण्याचा निचरा न होणारी आहे. परिणामी, फळगळ या समस्येचा सामना करावा लागत होता. त्या वेळी कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ (कै.) डॉ. बी. डी. शेळके यांची मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे बागेची स्थिती उत्तम राहण्यास मदत झाली. चांगले उत्पन्न मिळू लागल्यामुळे लागवड क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला. त्या प्रमाणे २०१४ मध्ये पुन्हा २५० संत्रा रोपांची लागवड केली.
...असे आहे व्यवस्थापन
जानेवारी महिन्यात खत दिल्यानंतर पाणी दिले जाते. आंबिया बहरातील फुलधारणा फेब्रुवारीत होते. काही शेतकरी जानेवारी महिन्यातच बोर्डो पेस्ट लावत असले, तरी मंगेशराव मार्च महिन्यात चुना आणि मोरचूद याचे मिश्रण (बोर्डो पेस्ट) खोडाला लावून घेतात. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी करण्यासोबतच कीड-रोगावर नियंत्रणाला मदत होते. मॉन्सूनच्या पहिल्या एक दोन पावसांत हे बुंध्याला लावलेले मिश्रण खाली उतरते. ते मुळांमध्ये ड्रेचिंगप्रमाणे काम करते. त्यासोबतच पुढे ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, एनपीके बूस्टर, गूळ अधिक बेसन याचे मिश्रणाची प्रति झाड दोन लिटर याप्रमाणे आळवणी केली जाते. झाडांवरील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखला जातो.
सिंचन व्यवस्थापन
सिंचनासाठी बागेत दोन झाडांपासून चार फूट जागा सोडून ट्रॅक्टरच्या साह्याने तीन चर (दांड) पाडले आहेत. यातील प्रत्येक दांडात पाणी सोडले जाते. वर्षभरात चार वेळा प्रति झाड दीड किलो या प्रमाणे टप्प्याटप्प्याने खत मात्रा दिली जाते.
गेल्या दहा दिवसांतील कामे
आंबिया बहरातील फळांची तोडणी झाली आहे.
बागेतील तण नियंत्रणासाठी तणनाशकाची फवारणी केली आहे.
०ः५२ः३४, कॉपर ऑक्सिक्लोराइड, क्लोरपायरिफॉस याची फवारणी घेतली आहे.
झाडावरील वाळलेल्या फांद्या काढणीचे काम सुरू आहे.
पुढील नियोजन
सल काढणीनंतर बोर्डोची फवारणी करण्याचे नियोजन आहे.
सध्या बाग ताणावर सोडली आहे.
जानेवारी पाच ते १० तारखेच्या कालावधीत ताण तोडला जाईल.
एकरी तीन बॅग याप्रमाणे सुपर फॉस्फेट खत देण्याचे नियोजन आहे.
१०ः२६ः२६ खत अर्धा किलो आणि निंबोळी एक किलो मिश्रण प्रती झाड या प्रमाणे देण्याचे नियोजन आहे.
एक वर्षाआड शेणखत देतो. गेल्या वर्षी शेणखत दिले आहे. या वर्षी शेणखत देणार नाही.
मंगेश देशमुख, ९९२३५६०७०४
(शब्दांकन : विनोद इंगोले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.