Modern Mango Farming Techniques:
शेतकरी नियोजन । पीक : केसर आंबा
शेतकरी : ओंकारनाथ आनंदराव शिंदे
गाव : सनपुरी, ता. जि. परभणी
एकूण क्षेत्र : ३५ एकर
केसर आंबा क्षेत्र : २ एकर
परभणी जिल्ह्यातील सनपुरी (ता. परभणी) येथील कृषिभूषण ओंकारनाथ आनंदराव शिंदे यांनी २ एकर क्षेत्रावर केसर आंब्याची लागवड केली आहे. काटेकोर व्यवस्थापनातून मागील तीन वर्षांपासून ते दर्जेदार केसर आंबा उत्पादन घेत आहेत. उत्पादित केसर आंब्याच्या विक्रीसाठी त्यांनी स्वतःची व्यवस्था तयार केली आहे.
सनपुरी येथील शिंदे कुटुंबाची ३५ एकर मध्यम ते भारी प्रकारची जमीन आहे. खरिपात सोयाबीन, तूर, कापूस, हळद त्यानंतर रब्बी हरभरा, गहू, ज्वारी ही पीक पद्धती त्यांनी अवलंबिली आहे. ओंकारनाथ शिंदे मागील दहा वर्षांपासून शेती करत आहेत. बदलत्या हवामान स्थितीत शेती पिकातील उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी त्यांनी फळबाग लागवडीवर भर दिला. एकूण ७ एकरांमध्ये केसर आंबा, पेरू, सीताफळ अशी फळबाग लागवड त्यांनी केली आहे.
विशिष्ट चव, दर्जेदार उत्पादन, बाजारपेठेतील मागणी या बाबी विचारात घेऊन २०१९ केसर आंब्याची लागवड करण्याचे ठरविले. जून-जुलै महिन्यात शेतामध्ये ड्रील मशिनद्वारे लागवडीसाठी खड्डे खोदून त्यात शेणखत व ट्रायकोडर्मा टाकून कलमांची लागवड केली. दोन झाडांत ८ फूट व दोन ओळींमध्ये १५ फूट अंतर राखत लागवड केली. लागवड केल्यानंतर पहिली दोन वर्षे आंबा बागेत मुगाचे आंतरपीक घेतले होते. या वर्षी करडईचे आंतरपीक घेण्यात आले होते, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
बाग स्वच्छता, छाटणीवर भर
हंगाम संपल्यानंतर बागेची स्वच्छता, छाटणी, आंतरमशागत आदी बाबींवर लक्षकेंद्रित केले जाते. संपूर्ण बागेतील फळ तोडणी पूर्ण झाल्यानंतर जून महिन्यात कलमांची छाटणी केली जाते. कलमाच्या खालील बाजूने जमिनीच्या दिशेने आलेल्या फांद्या, रोगग्रस्त फांद्यांची छाटणी केली जाते. छाटणी केलेल्या रोगग्रस्त फांद्या बागेबाहेर नेऊन त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. छाटणी केल्यामुळे झाड डेरेदार होते. छाटणी पूर्ण झाल्यानंतर चांगले कुजलेले शेणखत प्रतिझाड १० किलो प्रमाणे दिले जाते. छाटणीनंतर आंतरमशागतीच्या कामांवर भर दिला जातो. ठरावीक अंतराने पॉवर टिलरच्या साह्याने आंतरमशागत केली जाते. बागेत पॅक्लोब्युट्राझोलचा वापर एकदाच केला होता. त्यानंतर आजपर्यंत वापर करण्यात आलेला नाही.
सिंचन, खत व्यवस्थापन
बागेतील केसर कलमास मोहर लागेपर्यंत पाणी दिले जात नाही. फळधारणा सुरू झाल्यानंतर ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते. फळांचा आकार वाढेल तशी पाण्याची गरज वाढते. त्यानुसार सिंचनाचे नियोजन केले जाते. सध्या तापमानात चांगलीच वाढ होत. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन कलमाची पाण्याची गरज वाढते. त्यामुळे या काळात दररोज ६ ते ७ तास ठिबक संचाने पाणी दिले जाते. एप्रिल ते मे महिन्यात प्रवाही पद्धतीने सिंचन करण्यावर भर दिला जातो. शिवाय ठिबकद्वारे विद्राव्य खते, जिवामृत, ट्रायकोडर्मा, बायोमिक्स इत्यादी अन्नद्रव्ये व बुरशीनाशके दिली जातात.
मोहराची काळजी
कलमांना मोहर येण्यास सुरुवात झाल्यानंतर दर आठ दिवसांनी बायोमिक्सची फवारणी केली जाते. मोहरावर तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. तुडतुडे किडीच्या प्रादुर्भावामुळे मोहराचे नुकसान होते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी जैविक कीडनाशकांची फवारणी केली जाते.
डिंक्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फांद्या वाळून जातात. त्यासाठी नियमितपणे निरिक्षण करून वेळीच व्यवस्थापन करण्यावर भर दिला जातो. मोहर ते फलधारणा होईपर्यंतच्या कालावधीत कलमांचे नियमितपणे निरीक्षण केले जाते. आवश्यकतेनुसार ३ ते ४ फवारण्या घेतल्या जातात. जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव, आर्थिक नुकसान पातळी या बाबी विचारात घेऊन रासायनिक फवारणीचा निर्णय घेणे सोयीचे होते, असे श्री. शिंदे सांगतात.
काढणी नियोजन
मागील तीन वर्षांपासून बागेतून केसर आंबा उत्पादन सुरू झाले आहे. दरवर्षी एप्रिलच्या मध्यात किंवा अखेरीस आंबा तोडणी सुरुवात होते. परिपक्व आंब्याची तोडणी केली जाते. या वर्षी मोहर उशिरा लागल्यामुळे हंगाम लांबण्याची शक्यता आहे. आंबा काढणीनंतर घरीच पिकविले जातात
थेट ग्राहकांना विक्री
आंबा विक्रीसाठी शिंदे यांनी स्वतःची विक्री व्यवस्था तयार केली आहे. व्यापाऱ्यांमार्फत विक्री केली जात नाही.बागेतून थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार केले आहे. दरवर्षी हमखास केसर आंबा खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर आंबा काढणीवेळी माहिती दिली जाते. त्यानुसार ग्राहकांकडून मागणी नोंदविली जाते. थेट विक्री करण्यामुळे चांगले दर मिळतात. यावर्षी हवामान बदल आणि वाऱ्यामुळे फळगळ जास्त झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
मागील कामकाज
बागेत आंतरमशागत करून नंतर ठिबकद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिली. तापमानाचा अंदाज घेऊन सिंचनाचा कालावधी ठरविला. मागील आठवड्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे दोन पाळ्यांतील अंतर वाढविण्यात आले.
आगामी नियोजन
सध्या बागेतील कलमांवर फळधारणा झाली असून कैऱ्या लागल्या आहेत. आगामी काळात फळांचा आकार वाढ आणि दर्जा राखण्यावर भर दिला जाईल.
सातत्याने होणाऱ्या हवामान बदलाचा फळधारणेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यासाठी नियमितपणे बुरशीनाशक तसेच रसशोषक किडींसाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली जाईल.
प्रवाही पद्धतीने सिंचन करण्यासाठी बागेत आंतरमशागत करून दांड काढले जातील. सध्या तापमानात चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन कलमाची पाण्याची गरज वाढते. त्यासाठी दररोज ६ ते ७ तास ठिबक सिंचन करण्यावर भर दिला जाईल. फळधारणेपासून फळांचा आकार वाढेल तसे ठिबक सिंचन आणि प्रवाही पद्धतीने पाणी दिले जाईल.
ठिबकद्वारे विद्राव्य खते, जिवामृत, ट्रायकोडर्मा, बायोमिक्स इ. अन्नद्रव्ये व बुरशीनाशके दिली जातात.
- ओंकारनाथ शिंदे ७५८८०८१२४८
(शब्दांकन : माणिक रासवे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.