Fisheries  Agrowon
ॲग्रो विशेष

Fishing Season: मत्स्यदुष्काळाने मच्छीमार चिंतेत

मासेमारीसाठी केवळ एक महिना शिल्लक असून, त्यानंतर बोटी समुद्रकिनारी विसावणार आहेत.

Team Agrowon

प्रसाद जोशी

Vasai News : मासेमारीसाठी केवळ एक महिना शिल्लक असून, त्यानंतर बोटी समुद्रकिनारी विसावणार आहेत. मात्र सध्या खोल समुद्रात मत्स्य दुष्काळ निर्माण झाला आहे. त्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले असून आवक घटल्याने बाजारात माशांचे भावदेखील वाढले आहेत. त्यामुळे खवय्यांची पंचाईत झाली आहे.

पालघर, सातपाटी, अर्नाळा, नायगाव, पाचूबंदर, डहाणू यांचा पालघर जिल्ह्यातील प्रमुख मासेमारी बंदरांमध्ये समावेश होतो. येथील मच्छीमार जीव मुठीत घेऊन खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात. यावर हजारो कुटुबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो.

यात बर्फ उत्पादकांपासून मच्छीविक्रेते, वाहतूकदार यांना रोजगार मिळतो; पण सध्या माशांची आवक घटल्यामुळे त्यांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नियमानुसार मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मासेमारी करता येते. कारण त्यानंतर माशांचा प्रजनन काळ आणि समुद्रात येणाऱ्या प्रचंड लाटांमुळे मत्स्य विभागाकडून मासेमारीस बंदी घालण्यात येते. याला केवळ तीस दिवस शिल्लक असल्याने बोटी घेऊन मच्छीमार समुद्रात जाऊ लागले आहेत;

परंतु खोल समुद्रात पापलेटसह अन्य मासे दुर्मिळ झाले आहेत. पालघर जिल्ह्यात मिळणारा तांबूस मासा हाही दिसेनासा झाला आहे; तर चविष्ट पापलेटची आवकदेखील कमी झाली आहे. आवक घटल्याने सुरमई, हलवा, पापलेट, घोळ, रावस, बोंबील यासह अन्य माशांचे भाव वाढले.

हवामानात झालेला बदल, वादळसदृश परिस्थिती यांसह अन्य कारणाने मासेमारीवर संकट येत आहेत. त्यातच सप्टेंबर महिन्यात पापलेट कमी मिळाल्याने निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरदेखील परिणाम झाला होता.

हॉटेलचा पुरवठाही बाधित

पालघर जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्टमध्ये पर्यटक समुद्रातील माशांना पसंती देत असतात. त्यामुळे मासेमारीतून उत्पन्न चांगले मिळते; परंतु माशांची आवक घटल्याने याचा परिणाम जाणवू लागला आहे. मागणी असली, तरी त्यामानाने पुरवठा करणे जिकिरीचे झाले आहे.

खोल समुद्रात जाऊन मासेमारी केली जात असली, तरी मात्र मासे कमी प्रमाणात मिळत आहेत. अनेक संकटे काही वर्षांपासून येत आहेत. मासेमारीसाठी एक महिन्याचा कालावधी उरला आहे. त्यामुळे मे महिन्यात तरी मासेमारी चांगली होईल अशी आशा आहे.
विजय थाटू, अध्यक्ष, अर्नाळा फिशरमन
सर्वोदय मच्छीमार सोसायटी मासेमारी करण्यासाठी मच्छीमार समुद्रात जात आहेत. मात्र माशांची आवक कमी झाल्याने पापलेट, सुरमईसह अन्य माशांचा दरावर परिणाम झाला आहे. दर वाढले असून ग्राहकांच्या पसंतीचे मासे बाजारात फार कमी येत आहे.
रेश्मा वसईकर, मच्छीविक्रेती महिला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Saving Strategies: कमतरतेच्या स्थितीत पाणी बचतीच्या उपाययोजना

Groundwater Recharge Technology: कूपनलिका भूजल पुनर्भरण तंत्रज्ञान

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेच्या निकषात होणार बदल, सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शासन निर्णय जारी

Buldhana Water Crisis: बुलडाणा जिल्ह्यातील ३८ गावांची तहान टँकरवर

Farmer Loan Waiver: अकोला-वाशीम जिल्हा बँकेचे ३० हजार ७०९ शेतकरी ठरणार कर्जमाफीस पात्र

SCROLL FOR NEXT