Fish Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Seeds : मत्स्यबीजाची निवड, व्यवस्थापनाचे नियोजन

Team Agrowon

नीलेश्‍वरी वऱ्हेकर, भूषण सानप

Fish Seed Management :

भाग : २

तलावामधील पाण्यामध्ये रासायनिक आणि भौगोलिक परिस्थिती व्यवस्थित असल्यास वनस्पती प्लवंग व प्राणी प्लवंग योग्यरीत्या वाढतात. तलावाच्या आकारमानानुसार मत्स्यबीजाचे संचयन करावे. तलावात मत्स्यबीजाचे संचयन करताना ते पहाटे किंवा सायंकाळनंतर करावे, जेणेकरून मत्स्यबीज हे नवीन हवामानाशी किंवा परिस्थितीमध्ये रुळण्यास तयार होतील. यामुळे मत्स्यबीजाचा मृत्यूदर कमी होईल, जगण्याचा दर वाढेल तसेच मत्स्यबीज परिस्थितीशी जुळवून घेण्यास अनुकूल राहतील.

मत्स्यबीज आणल्यानंतर मत्स्यबीजाच्या पिशव्या तलावात एका ठिकाणी ठेवाव्यात जेणेकरून पिशवीतील पाणी आणि तलावातील पाण्याचे तापमान सारखे होईल. त्यानंतर थोडा वेळाने पिशवीचे तोंड उघडून पिशवी थोडी तिरकी धरावी म्हणजे हळूहळू तलावाचे पाणी पिशवीत शिरेल. यामुळे पिशवीतील पाणी आणि तलावातील पाणी यांचे तापमान सारखे होऊन मत्स्यबीज हे तलावातील पाण्याशी एकरूप होऊन मरतूक टळेल.

संचयनानंतर तलावातील व्यवस्थापन

तलावामध्ये १ ते १.५ मीटर पाणीपातळी ठेवणे आवश्यक आहे. रासायनिक तत्त्वानुसार पाण्यात विरघळलेला प्राणवायू हा ३ ते ८ पीपीएम योग्य आहे. तसेच कार्बनडाय ऑक्साइड हा १५ ते २० पीपीएमपेक्षा जास्त असणे हा माशांसाठी घातक आहे.

पाण्याचा सामू हा ७.५ ते ८.५ दरम्यान असावा. पाण्यातील सामू ७.५ ते ८.५ हा उत्पादकतेच्या दृष्टीने फायदेशीर आहे. पाण्यातील एकूण क्षारता १००-१२५ पीपीएम उत्पादकतेच्या हेतूने फायदेशीर आहे. ०.२ ते ०.४ पीपीएम फॉस्फेट हे वनस्पती प्लवंग तयार होण्याच्या दृष्टीने चांगले आहे. ०.६-०.१ पीपीएम नायट्रेट हा माशांच्या चांगल्या वाढीसाठी उत्तम समजला जातो.

जैविक खतांचा वापर

तलावात चुन्याचा वापर केल्यानंतर १५ दिवसांनी शेणखत किंवा खतांचा वापर हा तलावातील माशांसाठी अन्न तयार करण्यासाठी केला जातो. खत हे सेंद्रिय किंवा रासायनिक प्रकारचे असतात.

संचयन तलावात शेणखत हे २ ते ३ टन आणि कोंबडीचे खत पाच टन प्रति हेक्टर या प्रमाणात वापरले जाते. रासायनिक खतांचा वापर त्यांच्या फॉस्फरस आणि नायट्रोजनच्या प्रमाणानुसार मातीत केला जातो. रासायनिक खतांचे मानक प्रमाण हे नत्र, स्फुरद, पालाश (१८:१०:४) या प्रमाणात गोड्या पाण्यातील तलावात वापरले जाते.

गोड्या पाण्यातील मत्स्यपालनातील मूलभूत आणि प्रारंभिक टप्पा म्हणजे मत्स्य तलाव तयार करणे. तलावाची मासळी उत्पादकता वाढविण्यासाठी तलावाची तयारी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर आपण तलावाचा तळ योग्य प्रकारे तयार न करता मत्स्यपालनाची प्रक्रिया सुरू केली तर आपल्याला अडचणी येतात. कमी दर्जाचे उत्पादन मिळेल. तलाव तयार करण्याच्या बाबतीत, माशांची उत्पादकता वाढवण्यासाठी योग्य व्यवस्थापन पद्धती हा प्राथमिक दृष्टिकोन आहे. पर्यावरणपूरक मत्स्यपालन तंत्रासाठी तलाव तयार करण्यासाठी शाश्‍वत उपायांचा नेहमी वापर केला पाहिजे.

तलावातील कीटक नियंत्रण

जलचर कीटक आणि त्यांच्या अळ्या पाण्यातील अन्नासाठी माशांसोबत स्पर्धा करतात. त्यामुळे तलावातील छोटे मासे नष्ट होऊ लागतात. साबण आणि तेल यांचे दुधासारखे मिश्रण करावे (स्वस्त वनस्पती तेल ५६ किलो/हेक्टर सोबत १/३ या प्रमाणात कुठलाही स्वस्त साबण) हा खूप सोपा आणि पाण्यातील हवेतून श्‍वास घेणारे कीटकांना मारण्यास उत्तम उपाय आहे.

कार्यक्षम पाणी प्रवेश आणि पाणी बाहेर जाण्याची प्रणाली

तलावाची कार्यपद्धती यशस्वी होण्यासाठी कार्यक्षम पाणी प्रवेश आणि पाणी बाहेर जाण्याची प्रणाली असणे आवश्यक आहे. हे सर्व पाइपचा आकार आणि पाणी ये-जा करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते.

पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात हवा असेल तर पाणी प्रवेश हा पाण्याचा निचरा करणाऱ्या पद्धतीपेक्षा उच्च स्तरावर असणे आवश्यक आहे.

पाणी प्रवेश व पाणी बाहेर (निचरा) पाइपलाइन योग्यरीत्या बसवलेली असल्यास मुसळधार पाऊस असताना किंवा कमी पाऊस असताना पाण्याचा समतोल राखला जातो. हे पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

पाण्याची गुणवत्ता

तलावाची गतिमानता ही पाण्याच्या गुणवत्तेमुळे प्रभावित होऊ शकते. पाण्यातील घटक जसे की, सामू (७.५-८.५), क्षारता (१००-१२५ पीपीएम) आणि पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन (३-८ पीपीएम) हे माशांच्या आरोग्यावर परिणाम करतात, तलावाच्या उत्पादकतेवर परिणाम करतात.

पाण्यातील काही घटकांमध्ये हे दररोज, साप्ताहिक किंवा मासिक बदल होत असतात. पाण्याचा सामू, पाण्यात विरघळलेला प्राणवायूमध्ये प्रत्येक दिवशी बदल दिसतो.

क्षारतेमध्ये आठवडा ते महिन्यापर्यंत बदल दिसून येतात. हे सर्व पाण्यातील सामू व तलावाच्या तळाशी असलेल्या मातीतील सामूवर अवलंबून असते.

खाद्य व्यवस्थापन

मत्स्यबीज संचयन केल्यानंतर एक ते दोन दिवसांनंतर पाण्यातील वनस्पती प्लवंग हे मत्स्यबीजाद्वारे खाल्ले जाते. मत्स्यबीजाची वाढ, जगण्याचा दर हा तलावातील खाद्य, खाद्याची गुणवत्ता व खाद्याचे प्रमाण यावर ठरते.

माशांची आरोग्यदायी वाढ ही खाद्यावर अवलंबून असते. जर माशांना पाण्यातील नैसर्गिक खाद्याबरोबरच कृत्रिम खाद्य दिले तर माशांची वाढ झपाट्याने होते. माशांना खाद्य देण्याची वेळ व प्रमाण ठरवून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्यातील खाद्य वाया जात नाही, खाद्य प्रमाणात दिले जाते. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता कायम राहते.

जास्त खाद्य टाकले तर उरलेले खाद्य हे तळ्यात सडते, पाणी खराब होते. पाण्याला दुर्गंधी यायला सुरुवात होते. उरलेले खाद्य पाण्यातील इतर जीव, जलचर खातात, त्यांची वाढ जास्त प्रमाणात होते.

सुरुवातीला कृत्रिम खाद्य द्यावे, त्यानंतर त्याचे प्रमाण कमी करावे. कृत्रिम खाद्य देणे हे मासे काढणीच्या आधीच्या दिवसापासून बंद करावे. शक्यतोवर माशांची काढणी पहाटे करावी.

नीलेश्‍वरी वऱ्हेकर, ९७६६२९६६५७

(सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मत्स्य व्यवसाय विभाग, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT