Fish Pond : मत्स्य तलावाचे नियोजन

Fish Farming : माशांच्या विशिष्ट जीवनावस्थेच्या विकासासाठी विशिष्ट प्रकारचे तलाव आवश्यक आहेत. यामध्ये नर्सरी, संगोपन, साठवणूक, उपचार आणि ब्रूडस्टॉक तलावांची आवश्यकता असते.
Fish Pond
Fish PondAgrowon
Published on
Updated on

नीलेश्‍वरी वऱ्हेकर, भूषण सानप

Fish Lake Management : माशांच्या विशिष्ट जीवनावस्थेच्या विकासासाठी विशिष्ट प्रकारचे तलाव आवश्यक आहेत. यामध्ये नर्सरी, संगोपन, साठवणूक, उपचार आणि ब्रूडस्टॉक तलावांची आवश्यकता असते. गोलाकार कोपऱ्यांपेक्षा आयताकृती आकाराच्या तलावाला प्राधान्य द्यावे. तलावाची लांबी आणि रुंदी ३:१ या प्रमाणात असावी. रुंदी ३० ते ५० मीटरपेक्षा जास्त नसावी.

भाग : १

मत्स्य तलावाचे बांधकाम जर व्यवस्थितरीत्या केले नसेल, तर माशांचे व्यवस्थापन करणे खूप अवघड जाते. तलावातून पाणी झिरपत असेल किंवा तलावाचा पाणी साठवणुकीचा आकार व्यवस्थित नसेल तर आवश्यक पाणीपातळी राहत नाही. उथळ भागात पाण्यातील वनस्पती जलद गतीने वाढतात.

व्यवस्थापनाची तत्त्वे

योग्यरीत्या तलावाचे बांधकाम आणि पाण्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

अनावश्यक व जास्त प्रमाणात असलेल्या माशांच्या प्रजाती तलावातून पूर्णत: काढून टाकाव्यात. अन्यथा, ज्या प्रजातीचे संवर्धन करावयाचे आहे त्या प्रजातींना अनावश्यक प्रजाती प्रतिस्पर्धी होतात. पाण्यातील खाद्य, आवश्यक घटक, राहण्याच्या जागेमध्ये प्रतिस्पर्धी तयार होतात. त्यामुळे माशांची वाढ व उत्पादनामध्ये समस्या निर्माण होतात.

पाण्याची गुणवत्ता चांगल्या प्रतीची ठेवण्यासाठी चुना आणि खतांचा वापर केला जातो.

मत्स्य प्रजातींची निवड आणि संचयन ही बाजारपेठेतील मागणी, मत्स्यबीजाची उपलब्धता यावरून करावी. संबंधित वातावरणाला अनुकूल प्रजाती निवडाव्यात. जेणेकरून माशांचा जगण्याचा दर जास्त मिळेल. उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

Fish Pond
Fish Conservation : वालागो अटूट माशांचे संवर्धन

मासा बाजारपेठेत विकण्याजोगा झाल्यावर काढणी करावी. ज्या आकाराच्या, वजनाच्या माशाला बाजारपेठेत जास्त मागणी व जास्तीत जास्त दर मिळेल अशा आकाराचे मासे काढावे, जेणेकरून बाजारभाव जास्त मिळेल.

काढलेल्या माशांचा वेळोवेळी तपशील ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे माशांच्या वजनात होणारी वाढ किंवा घट लक्षात येते. त्यामुळे पाण्यात किंवा तलावात होणाऱ्या बदलाची माहिती होते.

तलावातील स्थिरतेची तपासणी करावी. तलावात होणारे बदल लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून झालेल्या बदलामुळे होणारे नुकसान टाळता येईल, वेळेत सुधारणा करता येईल.

तलावातील तणांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. तलावात तण वाढल्यास पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो. तसेच मत्स्यबीजास लागणारे अन्न, ऑक्सिजन आणि जागेसाठी स्पर्धा तयार होते.

तलावाचे प्रकार

माशांच्या विशिष्ट जीवनावस्थेच्या विकासासाठी विशिष्ट प्रकारचे तलाव आवश्यक आहेत. यामध्ये नर्सरी, संगोपन, साठवणूक, उपचार आणि ब्रूडस्टॉक तलावांची आवश्यकता असते. गोलाकार कोपऱ्यांपेक्षा आयताकृती तलावाला प्राधान्य द्यावे. तलावाची लांबी आणि रुंदी ३:१ या प्रमाणात असावी. रुंदी ३० ते ५० मीटरपेक्षा जास्त नसावी. एकूण शेत क्षेत्राच्या ५ टक्के नर्सरी, संगोपन तलाव २० टक्के, साठवणूक तलाव ७० टक्के आणि जैव तलाव किंवा उपचार तलावाचे क्षेत्र ५ टक्के असावे.

नर्सरी तलाव : नर्सरी तलावाचा आकार सुमारे ०.०१ ते ०.०५ हेक्टर असावा. खोली १ ते १.५ मीटर असावी. अंडी (३ दिवस जुनी) नर्सरी तलावात साठवली जातात, २ ते ३ सेंमी लांबी मिळविण्यासाठी जास्तीत जास्त ३० दिवस सांभाळली जातात.

संगोपन तलाव : या तलावात मत्स्यबीज संगोपन (२० ते २५ मिमी आकार) होते. संगोपन कालावधी २ ते ३ महिने आहे. तलावाचा आकार ०.०५ ते ०.१ हेक्टरपर्यंत बदलतो. १.५ ते २ मीटर पाण्याची खोली असावी.

साठवणूक तलाव ः साठवणूक तलावामध्ये मत्स्य बोटुकली (१० ते १५ सेंमी) विक्री योग्य आकारात सांभाळतात. सरासरी प्रति हेक्टरी ५००० मत्स्यबोटुकली संचयन करावी. त्यामुळे माशांची वाढ झपाट्याने होऊन उत्पादनात वाढ होते. साठवणुकीचा कालावधी ८ ते १० महिन्यांपर्यंत असतो. मत्स्य बोटुकली साठवणूक घनता मत्स्य उत्पादनानुसार बदलते. साठवणूक तलावाचा वापर ब्रूडस्टॉक तलाव आणि प्रजनन तलाव म्हणून आवश्यकतेनुसार केला जातो.

या तलावाचे क्षेत्रफळ १ ते २ हेक्टरपर्यंत असते, याची पाण्याची खोली २.५ ते ३ मीटर असते. उत्पादनक्षम क्षेत्रामध्ये नर्सरी तलाव आणि त्यानंतर संगोपन तलाव बांधण्यासाठी जास्त क्षेत्र वापरावे. साठवणूक तलाव बांधण्यासाठी शेतातील सर्वांत कमी क्षेत्रफळ वापरावे, ज्यामुळे बांधकामाचा खर्च कमी होण्यास मदत होते, व्यवस्थापनात सुलभता येते.

Fish Pond
Fish Farming : कटला, रोहू, मृगळ माशांचे संगोपन

पूर्वतयारी तलाव सुकवणे

तलावात मत्स्यबीज संचयन करावयाच्या आधी तलाव सुकवणे ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.

तलावात मत्स्यबीज संचयनाआधी किमान १५ दिवसांपूर्वी तलाव सुकवला पाहिजे. जेणेकरून तलावाला ५ ते १० सेंमी भेगा पडतात. भेगा पडून त्यातून अनावश्यक वायू बाहेर पडतो. अनावश्यक वनस्पती, तलावाच्या तळात राहणारे कीटक, प्राणी यांचा नायनाट होतो.

तलावाच्या तळामध्ये नांगरणीकरून माती खाली वर करून घेतल्याने तलावातील वायू, वनस्पती, प्राणी पृष्ठभागावर येऊन त्यांची मरतूक होते. हानिकारक वायू निघून जाण्यास सुद्धा मदत होते.

तलावात चुन्याची फवारणी करावी.जेणेकरून मातीचा सामू बरोबर राहील.

तलाव नवीन तयार केलेला असेल सुकविणे ही बाब आवश्यक नाही. तलावात प्रचंड प्रमाणात अनावश्यक वाढणाऱ्या वनस्पती असतात. त्या तलावातील पोषक तत्त्वे शोषून घेतात आणि तलावाची उत्पादकता कमी करतात. त्यामुळे तलावात माशांना फिरायला अडथळे निर्माण करतात. तलावात जाळे मारताना, माशांची काढणी करताना अडथळा निर्माण होतो. म्हणूनच तलावातील तण आणि वनस्पती काढून टाकाव्यात.

लहान तलावात जिथे उथळ भाग आहे, तेथे हाताने तण काढणे शक्य होऊ शकते. मोठ्या आणि खोल तलावात हे अशक्य आहे. अशावेळी मोठ्या तलावात यांत्रिक पद्धतीने रासायनिक आणि जैविक पद्धतीने तलावातील तण काढावे.

तलावाच्या तळावर चुना किंवा कॅल्शिअम हायड्रॉक्साइड दोन आठवड्यांसाठी पसरावे. हे तलावाच्या सुकवण्याच्या टप्प्यात वारंवार करावे. यामुळे तलावातील मातीची आम्लता कमी होण्यास मदत होते. जैव रासायनिक प्रक्रिया होऊन अनावश्यक जीवजंतू नष्ट होतात.

चुना हा सुकलेल्या तलावात तसेच बांधाच्या भिंतीवर टाकता येतो. चुन्याचे पाण्यात मिश्रण तयार करून तलावात द्रावणाची फवारणी केली जाते. तलावाच्या वाहत्या पाण्यात चुना टाकता येतो.

तलावाचे बांध

तलावाचा बांध उंच नसेल तर पावसाळ्यात पुरामुळे तलावातील मासे पाण्यासोबत वाहून जातात. तलाव हे नदी किंवा प्रवाहाच्या जवळ असेल तर बांध नेहमी उंच असावेत.

बांध हे तलावाच्या पाणीपातळीपेक्षा २ ते ३ फूट उंच असावेत. जेव्हा तलावाचे खोदकाम करतात तेव्हा बांध तयार करावेत. बांध उंच करण्यासाठी वाळू भरलेली पोती वापरावीत.

मत्स्यबीज संचयनापूर्वी तलावात वाढविण्यात येणारे प्लवंग

भारतीय प्रमुख कार्प (कटला, रोहू व मृगळ) यांचे संचयन करीत असताना तलावाच्या पाण्यात प्राणी प्लवंग आणि वनस्पती प्लवंग तयार होणे आवश्यक आहे. हे प्लवंग माशांचे खाद्य आहे. जास्त प्रमाणात जैविक घटक महत्त्वाचे आहेत. प्लवंगामुळे माशांची वाढ झपाट्याने होते. तसेच पूरक खाद्य कमी प्रमाणात द्यावे लागते. यामुळे येणारा खर्च कमी होतो, उत्पादन चांगले मिळते.

पद्धतशीरपणे खतांचा वापर केल्यास पाण्यात अन्नाची साखळी व्यवस्थित सुरू राहते. तलावातील माशांना मुबलक प्रमाणात अन्न उपलब्ध होते.

तलावामध्ये खतांचा वापर करण्याआधी चुन्याचा वापर करावा. चुन्याचा वापर तलावात करणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे पाण्याचा सामू आणि क्षारता वाढते. खतांचा वापर न करता सुद्धा चुन्याच्या वापरामुळे पाण्यातील पोषणतत्त्वे वाढतात. त्यामुळे वनस्पती प्लवंगाचा झुपका वाढण्यास मदत होते.

तलावात मत्स्यबीज संचयन करण्याच्या ४ ते ५ दिवस आधी खतांचा वापर करावा. चुन्याची निवळी व शेणखत यांचा वापर करून पाण्यात प्राणी प्लवंग, वनस्पती प्लवंग तयार करून घ्यावेत.

जर मत्स्यबीज संचयन करण्यास उशीर झाल्यास बरेचदा प्राणी प्लवंगाची वाढ आवश्यकतेपेक्षा जास्त होते. आपण संचयन करणाऱ्या मत्स्यबीजांचा आकार कमी असतो. त्याच वेळी प्राणी प्लवंगाचा आकार मत्स्यबीजाच्या तोंडापेक्षा मोठा झालेला असतो, यामुळे संचयन करण्यात आलेले मत्स्यबीज हे प्राणी प्लवंग खाऊ शकत नाही. त्यामुळे माशांची हवी तशी वाढ होत नाही. त्यामुळे उत्पादनातही घट दिसून येते.

नीलेश्‍वरी वऱ्हेकर, ९७६६२९६६५७

(सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मत्स्य व्यवसाय विभाग, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com