Fish Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Farming: मासे : शाश्‍वत उपजीविकेचे साधन

Aquaculture Revolution: दरवर्षी १० जुलै हा दिवस राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने मत्स्य शेती क्षेत्रातील शेतकऱ्यांचे योगदान अधोरेखित करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो.

Team Agrowon

डॉ. भूषण सानप

National Fishermen's Day: भारत हा सागरी किनारपट्टी व अंतर्गत जलस्रोतांनी समृद्ध असा देश आहे. या नैसर्गिक संपत्तीच्या मदतीने मासेमारी क्षेत्राने देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सद्यःस्थितीत मासेमारी क्षेत्र पारंपरिक पद्धतींपासून पुढे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि व्यवस्थापन यांच्या माध्यमातून विस्तारत आहे. मासेमारी उद्योग हा केवळ मासे पकडण्यापुरता मर्यादित नसून त्यासोबतच अनेक पूरक उद्योग आणि सेवा क्षेत्रे देखील जोडली गेली आहेत.

मासे प्रक्रिया, कोल्ड स्टोअरेज, वाहतूक, मासेमारीसाठी लागणारे जाळे, होड्या, मत्स्य खाद्य, औषधे, प्रजनक, मत्स्यबीज, शोभिवंत मासे, त्यांचे साहित्य या सर्व क्षेत्रांच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळतो. याशिवाय मनोरंजन, छंद आवड म्हणून संगोपन आणि जलपर्यटन क्षेत्रातही मोठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या माध्यमातून अनेकांना शाश्वत उपजीविकेचे साधन निर्माण झाले आहे. त्यामुळे मासे हे मानवी विकास आणि देशाच्या आर्थिक समृद्धीचे एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे.

आरोग्यदायी गुणधर्म

माशांपासून मत्स्य तेल फिश ऑइल) तसेच फिश लिव्हर ऑइल काढले जाते. यामध्ये जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘ड’ मुबलक प्रमाणात असून विविध औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे त्याचे बाजारातील मूल्य देखील अधिक असते.

माशांपासून मिळणाऱ्या जिलेटिन पासून औषधांचे कवच, अर्थात कॅप्सूल तयार केले जातात. त्यामुळे औषध निर्मिती व्यवसायात चांगली मागणी असते.

डासांपासून मलेरिया, हिवताप, पिलिया यासारखे अत्यंत घातक आजार उद्‌भवतात. या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी त्यांच्या अळ्या नष्ट करणे आवश्यक असते. त्यासाठी सांडपाणी, पाणवठे आणि पाणी साठवण टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडले जातात. गप्पी मासे डासांच्या अळ्या खातात. त्यामुळे आजाराचे नियंत्रण होते.

शस्त्रक्रिया करताना टाके घातले जातात. या टाक्यांसाठी वापरले जाणारे विरघळणारे धागे (Surgical sutures) हे माश्यांपासून तयार केले जातात.

काही माशांचा रातांधळेपणा, अशक्तपणा, ब्राँकायटिस, दमा, क्षयरोग इत्यादींसारख्या आजारांवरील उपचारासाठी आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो.

शोभिवंत मत्स संगोपन

मासे त्यांच्या वैविध्यपूर्ण रंगरूप आणि हालचालींमुळे आकर्षक वाटतात. त्यामुळे अनेकांना मत्स्यालयात शोभिवंत माशांचे संगोपन करण्याचा छंद असतो. रंगीबेरंगी, आकर्षक असे विविध प्रजातींचे शोभिवंत मासे छोट्या मत्स्यालयात घरगुती स्तरावर संगोपन करता येते. त्यामुळे या माशांना चांगली बाजारपेठ तयार झाली आहे. याशिवाय विविध ठिकाणी जलाशय, तलाव, पाणथळ भागात मत्स्यालय उभारून मत्स्यपर्यटन करण्याची मोठी संधी आहे.

वैद्यकीय अभ्यासातील महत्त्व

‘झेब्राफिश’ या माशांचे मानवी तसेच सर्वच सस्तन प्राण्यांसोबत आनुवंशिक गुण समरूप असल्याचे अभ्यासत दिसून आले आहे. विविध मानवी आजारांची कारणे उलगडण्यासाठी, नवनवीन औषधांचे होणारे परिणाम प्रयोगाअंती तपासणीसाठी, विषारी घटक अभ्यासण्यासाठी, आनुवंशिकी, भ्रूणविज्ञान, प्राणी वर्तणूक या क्षेत्रात या माशांचा प्रायोगिक प्राणी म्हणून उपयोग होतो. गोड्या किंवा सागरी पाण्यात हे मासे अधिवास करू शकतात.

विविध उत्पादनांची निर्मिती

मत्स्य ग्वानिन

माशांच्या खवल्यांपासून ‘ग्वानिन’ काढले जाते. हे चमकदार असल्यामुळे विविध सौंदर्यप्रसाधनांमध्ये त्याचा उपयोग केला जातो. उदा. नेलपॉलिश, लिपस्टिक, मस्कारा, शाम्पू तसेच इतर त्वचा आणि केसांची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये मत्स्य ग्वानिन वापरले जाते. याशिवाय विविध रंगाच्या निर्मिती, रंगरंगोटीच्या साहित्याच्या निर्मितीमध्ये वापर केला जातो.

फिश लेदर

माशांच्या चामडीमधील कोलेजन फायबर इतर चामड्यांपेक्षा अधिक टिकाऊ असते. याची ताणले जाण्याची क्षमता जास्त असल्याने क्लिष्ट अशा विणण्याच्या कामांसाठी ते उपयुक्त ठरते. याशिवाय याचा वापर प्लॅस्टिक कव्हर, गाड्यांचे सीट कव्हर, पाकीट, बेल्ट, हातमोडे, चप्पल, पर्स, जॅकेट इत्यादी लेदर वस्तू तयार करताना वापर केला जातो. त्यामुळे माशांच्या चामड्याला खूप महत्त्व आहे.

कृत्रिम मोती

माशांच्या खवल्यांपासून रंगद्रव्ये तयार केले जाते. ते मोती सार (Pearl Essence) म्हणून ओळखले जाते, याचा उपयोग कृत्रिम मोती उत्पादनासाठी केला जातो.

दैनंदिन आवश्यक वस्तू

बायोप्लास्टिक्स : मत्स्य खवल्यांपासून तयार होणाऱ्या बायोप्लास्टिक्सचा वापर कपडे आणि प्लास्टिक तसेच पॅकेजिंग फोम मटेरिअल तयार करण्यासाठी केला जातो. खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये बायोप्लास्टिक्सचा वापर वाढत आहे.

टूथपेस्ट निर्मिती : पूर्वी टूथपेस्ट निर्मितीमध्ये प्राण्यांच्या हाडांची भुकटी वापरली जात असे. अलीकडच्या काळात मत्स्य खवल्यांपासून कोलेजन आणि हायड्रॉक्सिॲपाटाइट नावाचा घटक वापरून टूथपेस्ट निर्मिती केली जात आहे. दातांच्या मजबुतीसाठी आणि पांढरेपणा टिकवून ठेवण्यासाठी ही टूथपेस्ट अधिक प्रभावी आहे.

मत्स्यगोंद (फीश ग्लू) : माशांची त्वचा, डोके किंवा इतर टाकाऊ अवयवांपासून गोंद (ग्लू) तयार केला जातो. या गोंदाच्या मदतीने कागद, लाकूड, चामडे तसेच काचेच्या वस्तूंना अधिक मजबूतपणे चिकटविता येतात.

माशांच्या शरीरातून मिळणाऱ्या तेलाचा उपयोग रंग, साबण, मेणबत्ती, चामडे आणि स्टील उद्योग इत्यादीमध्ये केला जातो.

शेती आणि पूरक उद्योगामध्ये उपयोग

जैविक खत निर्मिती

मत्स्य संकलन केंद्रात खराब झालेल्या माश्यांचे खतामध्ये रूपांतरित केले जाते. यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असल्याने वनस्पतींच्या वाढीसाठी ते प्रभावी ठरते.

पशू व मत्स्य खाद्य निर्मिती

माश्यांचे विविध अवयव, त्यांचे काटे यावर प्रक्रिया करून त्यापासून फीशमिल (मत्स्यकुटी) तयार केले जाते. याचा उपयोग मत्स्यपालन, कुक्कुटपालन, वराह व जनावरांसाठी तयार केल्या जाणाऱ्या खाद्यामध्ये प्रक्रिया करून वापर केला जातो. यामध्ये प्रथिने, कॅल्शिअम व फॉस्फेटचे प्रमाण चांगले असते.

प्रक्रियायुक्त उत्पादने

मासे नाशवंत असल्याने मासेमारी केल्यानंतर लवकरात लवकर विक्री करणे आवश्यक असते. दूरच्या बाजारपेठेत मासे पाठविताना योग्य पद्धतीने पॅकिंग न केल्यास ते लवकर खराब होतात. त्यामुळे योग्य पॅकिंग करून त्वरित विक्री करणे आवश्यक असते. माश्यांपासून तयार केलेल्या प्रक्रियायुक्त उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. यामध्ये ‘रेडी टू कूक’, ‘रेडी टू कूक’ तसेच गोठवलेले, खारवलेले, सुकवलेले, हवाबंद पॅकिंग केलेल्या पदार्थ तसेच मूल्यवर्धित पदार्थ जसे की माश्यांचे लोणचे, पापड, कुरकुरे, शेव, चकली इत्यादी उत्पादनांना देखील चांगली मागणी आहे.

- डॉ. भूषण सानप ९५०३७४६४९७

(सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, अमरावती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT