Fish Farming
Fish FarmingAgrowon

Fish Farming : कटला, रोहू, मृगळ माशांचे संगोपन

Fish Conservation : भारताबरोबरच परदेशात कार्प माशांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या माशांमध्ये ३० ते ४० टक्के प्रथिने आहेत. कार्प माशांची वेगवान वाढ, उत्तम चव आणि साधी खाद्य पद्धती या बाबींमुळे अनेक राज्यांत कार्प मत्स्यसंवर्धन केले जात आहे.

महेश शेटकार, डॉ. स्वप्नजा मोहिते

Fisheries :

रोहू

शास्त्रीय नाव : लॅबेओ रोहिता

हा मासा गंगा नदीत सापडतो. त्याचबरोबर सरोवरे, मंद-प्रवाह असलेले पाण्याचे प्रवाह आणि नद्या अशा ‍ठिकाणी ते वावरतात आणि दूषित पाण्यातही तग धरून राहतात. पोषक तत्त्वांमुळे जास्त मागणी आहे. मिश्र मासेपालनात रोहू जातीचा समावेश करतात.

शरीर लांब आणि गोलाकार असते. तुलनेत डोके लहान, तीक्ष्ण चेहरा, डोळे मोठे, झालदार जाड ओठ असतात. पोटाच्या बाजूने पाहिले असता त्याचा आकार बहिर्वक्र दिसतो. पाठीचा रंग निळसर किंवा तपकिरी करडा असतत्‌ खवल्यांचा रंग पिवळसर, तांबूस असतो, त्यांच्या कडा गर्द रंगाच्या असतात. परावर करड्या, तांबड्या किंवा काळसर रंगाचे मिसळलेले पट्टे असतात. पृष्ठभागाच्या परात १२ ते १३ काटे असतात. ओठांचा आकार सरळ असल्याने हे मासे पाण्याच्या मध्यभागात आढळून येतात.

जैविक पदार्थ, वनस्पतीचे तुकडे, प्लवंग इत्यादी हे मुख्य अन्न आहे. योक संपल्यानंतर ५-१० मिलिमीटर लांबीची पिले प्राणी प्लवकांवर जगतात. तसेच १०- १५ मिलिमीटर लांबीचे मासे रोटिफेर, प्रोटोझोआन्स, कॅलॅडोसिरॉन्स, इत्यादी भक्षण करतात. कुजलेले पाणवनस्पती हे सुद्धा एक पर्यायी अन्न आहे.

Fish Farming
Tilapiya Fish Farming : तिलापिया माशांचे संवर्धन फायद्याचे

हा मासा वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननासाठी परिपूर्ण होतो. वर्षा ऋतू प्रजननाचा काळ आहे. वर्षातून एकदा पावसाळ्यात जून ते ऑगस्ट महिन्यांत अंडी घालतात. एका हंगामात सुमारे २.२५ लाख प्रति किलोग्रॅम अंडी घालण्याची क्षमता असते. अंडी गोलाकार, पारदर्शक व लाल रंगाची असून जवळपास १.५ मिमी व्यासाची असतात. जवळपास १६ ते १८ तासांनंतर त्यांचे अवयव विकसित होतात.

एका वर्षात ५०० ग्रॅम ते १ किलो ग्रॅम इतका वाढतो. सिफा या केंद्र शासनाच्या मत्स्य संशोधन संस्थेने रोहू जातीपासून एक नवीन जात विकसित केली आहे, त्याला जयंती रोहू असे नाव देण्यात आले आहे.

इतर कार्पच्या तुलनेत या माशाचे मांस खूप चवदार असते. बाजारामध्ये उपलब्धता, आठवड्याचा वार, आकारानुसार त्याची मागणी वाढत जाते.

कटला

शास्त्रीय नाव : कटला कटला

गोड्या पाण्यात सर्वांत वेगाने वाढणारा मासा आहे. महाराष्ट्रात या माशाला काही ठिकाणी तांबरा म्हणतात. हा मासा एका वर्षात १ ते १.५ किलोपर्यंत वाढते.

डोके मोठे व रुंद, शरीराचा मध्य भाग रुंद व फुगीर, तोंड वरच्या बाजूला वळलेले, खालचा ओठ जाड असतो. शरीर मजबूत असून लांबी १.८ मीटर पर्यंत वाढते. पाठीकडचा रंग करडा आणि बाजूंचा रुपेरी असतो. अंगावरचे खवले मोठे असतात. उदरावरील खवले पांढुरके असतात. पर गडद काळ्या रंगाचे असतात.

पाण्याच्या वरच्या थरातील अन्न खातो. सूक्ष्म प्लवंग हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. कार्पच्या इतर जातींबरोबर खाद्याकरिता स्पर्धा करीत नाही. खाद्य खाण्याचे प्रमाण हे वयानुसार बदलत असते. १० मिमी आकाराचा कटला हा एकपेशीय अल्गी, वनस्पती प्लवंग, रोटिफर सेवन करतो आणि १० सेंमी आकारापुढील कटला मासा छोटे किडे, प्राणी प्लवंग, शेवाळ, कुजलेले अन्न खाद्य म्हणून पसंत करतो.

Fish Farming
Dried Fish Rate : कोकणात मागणीमुळे सुक्या मासळीचे दर वधारले

ही प्रजात वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रजननक्षम होते. मादी ही मार्च आणि नर हा एप्रिल पासून प्रजननासाठी परिपूर्ण होण्यास सुरुवात होते. जून पर्यंत पूर्णतः अंडी घालण्यासाठी तयार असतात. पावसाळ्याचा पूर्वार्ध हा प्रजननाचा हंगाम आहे.

हा मासे प्रामुख्याने सपाट प्रदेशातील नद्यांच्या वाहत्या पाण्यात अंडी घालतात. एका हंगामात सुमारे १.२५ लाख प्रति किलोग्रॅम अंडी घालण्याची क्षमता असते. अंडी ही गोलाकार, पारदर्शक व लाल रंगाची असून जवळपास २- २.५ मिमी व्यासाची असतात. जवळपास १६ ते १८ तासांत अंडी फुटून ४ ते ५ मिमी लांबीचे मत्स्य जिरे बाहेर येतात. सहा आठवड्यांत ते प्रौढ होतात.

वेगाने वाढणारी प्रजात आहे. मिश्र मत्स्यपालनात महत्त्वाचे स्थान आहे. छोटे जलाशय, तलावात संवर्धन करण्यायोग्य मासा आहे. एक वर्ष संवर्धनातून १.५ किलोग्रॅमपर्यंत वाढते. खाण्यासाठी चवदार असून बाजारात जास्त मागणी आहे.

मृगळ

शास्त्रीय नाव : सिऱ्हिनस मृगाला

हा मासा पंजाब, पश्‍चिम बंगाल, ओदिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांतील नद्या, उपनद्या, तळी व पाझर तलावांमध्ये आढळतो. हा मासा एका वर्षात ५०० ते ८०० किलो ग्रॅम वजनाचा होतो. मिश्र मस्त्यपालनात याचा समावेश आहे.

इतर कार्पपेक्षा शरीर लांब, डोके लहान, मुख गोलाकार व रुंद असते. रंग रुपेरी असून पाठ काळसर करड्या रंगाची असते. पाठीवर तांबूस झाक असते. पर हे नारिंगी रंगाचे असून त्यावर काळी झाक असते. शरीरावर सायक्लॉइड खवले असतात. मृगळ सुमारे एक मीटरपर्यंत लांब वाढू शकतो.

हा मासा मुख्यत: तलावाच्या खालच्या थरात राहून तेथे उपलब्ध असणाऱ्या पाण वनस्पती, शेवाळ आणि सूक्ष्मजीवांवर जगतो. हा मिश्राहारी आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत या माशांमध्ये खाद्य घेण्याची क्षमता कमी झाल्याचे आढळून आली आहे. वयानुसार खाद्यपद्धतीत फारसा फरक पडत नाही.

वयाच्या पहिल्या वर्षी मासा प्रजननासाठी परिपूर्ण होतो. जुलै ते सप्टेंबर हा प्रजननाचा हंगाम असतो. नराच्या तुलनेत मादी प्रजननासाठी लवकर परिपूर्ण होते. पावसाळ्यात नद्यांच्या वाहत्या पाण्यात अंडी घालतात. अंड्यांचा आकार हा गोलाकार असून, सामान्यतः १.५ मिमी. व्यासाची, पारदर्शी व भुरकट रंगाची असतात. अंड्यातून १८ते २० तासांनी लहान पिले बाहेर पडतात.

तळ्यांमध्ये माशाचे संवर्धन करतात. तळ्यात प्रजननक्षम नर आणि माद्या सोडतात. एका वर्षात त्यांची पूर्ण वाढ होऊन ते ५६ ते ६६ सेंमी लांब आणि ५०० ते ८०० ग्रॅम वजनापर्यंत वाढतात. हा मासा खाण्यासाठी चवदार आहे.

डॉ. स्वप्नजा मोहिते, ९५४५०३०६४२ , (मत्स्य जीवशास्त्र विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com