Nirgudsar News : शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान मिळणार कधी? या आशयाची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील साई प्रसाद दूध प्रकल्पातील ५१३ आणि इंदापूर तालुक्यातील श्रीराम दूध प्रकल्पातील ६९ अशा एकूण ५८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील दूध प्रकल्पांकडून अनुदानाचे प्रस्ताव सादर होत नसल्याने दुधाचे अनुदान रखडले होते. दोन महिने उलटले तरी एकाही शेतकऱ्याला दुधाचे अनुदान मिळाले नव्हते. ११४ खासगी व सहकारी दूध प्रकल्पांपैकी अवघ्या ४ दूध प्रकल्पांनी अनुदानासाठीचे प्रस्ताव सादर केले होते.
त्यात वाढ होऊन तो आकडा १८ वर पोचला आहे, तरी अद्याप ९६ दूध प्रकल्पांनी अनुदानासाठी माहिती शासनाला दिली नाही. राज्य सरकारने दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफला ३० रुपये दर जाहीर केला असून, १ लिटरला ५ रुपये अनुदानाची घोषणा एक जुलै २०२४ पासून देण्याची घोषणा केली,
परंतु दोन महिने उलटून गेले तरी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. अनुदानासाठी ११४ प्रकल्पांपैकी ४ दूध प्रकल्पांचे अनुदानासाठी प्रस्ताव दाखल झाले असल्याची बातमी ५ सप्टेंबर रोजी सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारला जाग आली आणि ज्या दूध प्रकल्पांनी अनुदानाबाबत माहिती देण्यास विलंब केला. त्यांनी देखील माहिती भरण्यास सुरुवात केली आहे.
शिरूर तालुक्यातील साईप्रसाद दूध प्रकल्पातील ५१३ दूध उत्पादक शेतकऱ्यांना ११ लाख ७१ हजार रुपये, तर इंदापुरातील श्रीराम दूध प्रकल्पातील ६९ दूध उत्पादकांना ३ लाख २५ हजार रुपये जमा झाले आहेत.
११४ दूध प्रकल्पांपैकी १८ दूध प्रकल्पांचे अनुदानबाबत प्रस्ताव दाखल झाले असून, उर्वरित शेतकऱ्यांनी दूध प्रकल्पांकडे लवकरात लवकर माहिती द्यावी.सतीश डोईफोडे, जिल्हा दूध विकास अधिकारी, पुणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.