Poultry Health: देशात आता बर्ड फ्लूपासून कोंबड्यांना संरक्षण देण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी अशी लस विकसित करण्यात आली आहे. बर्ड फ्लू हा पक्ष्यांमधील अतिघातक असा विषाणूजन्य रोग आहे. कोंबड्यांमध्ये या रोगाची लागण झाल्यास परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जातात. अनेकदा तर राज्यात, देशात कुठेतरी कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूच्या लागणीची अफवा पसरल्याने भीतीपोटी पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्या नष्ट केल्या आहेत. .महाराष्ट्रात जानेवारी २०२५ पासून ११ जिल्ह्यांतील १५ ठिकाणी बर्ड फ्लू आजाराचा प्रादुर्भाव झाला. या उद्रेकांपैकी तीन उद्रेक वन्यप्राणी पक्ष्यांमध्ये आणि इतर १२ उद्रेक परसातील कुक्कुटपालन, तसेच व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये आढळून आले आहेत. बर्ड फ्लू हा आजार केवळ पक्ष्यांपुरताच मर्यादित नाही, तर दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील टेक्सास राज्यात मानवामध्ये बर्ड फ्लूची लागण झाली होती..आपल्या देशातही २०२४ मध्ये पश्चिम बंगालमधील चार वर्षांच्या मुलाला बर्ड फ्लू झाल्याने देशात एकच खळबळ उडाली होती. नंतर हा मुलगा उपचाराने बरा झाला. जगात २००४-०५ पासून कोंबड्यांमधून एच५एन१ या पोटजातीच्या विषाणूमुळे मानवात इन्फ्लूएंझा रोगाची लागण होत असल्याचे आढळून आले. जवळपास १७ देशांतील ८३२ माणसांना या रोगाची लागण झाली होती, त्यापैकी ५३ टक्के माणसे मृत्युमुखी पडली, असा जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल सांगतो. यावरून बर्ड फ्लू प्रतिबंधात्मक लसीचे महत्त्व आपल्या लक्षात यायला हवे..Winter Poultry Shed: हिवाळ्यात पोल्ट्रीशेडची काळजी कशी घ्यावी; कोणते बदल आवश्यक?.‘एनआयएचएसडी’ने (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसिजेस) विकसित केलेली ही लस (एचपीएव्ही - हायली पॅथोजेनिक एव्हिएन इन्फ्लूएंझा कोंबड्यांना दिल्यास त्यांचे ‘बर्ड फ्लू’पासून (एच५एन१) संरक्षण होईल. पर्यायाने त्या आनुषंगिक सर्व नुकसान टळण्यास हातभार लागेल, असा दावा केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे..Poultry Water Management: पिंजरा पद्धतीच्या पोल्ट्रीमधील जलप्रणाली .मुळात बर्ड फ्लूबाबतच्या लसीला यातील अभ्यासक, जाणकारांचा विरोध होता. बर्ड फ्लूच्या विषाणूचे अनेक प्रकार (व्हेरिएंट) आहेत. जसे की एच चे १८ आणि एन चे ११ उपप्रकार आहेत. ते एकमेकांशी जुळवून घेऊन १९८ उपप्रकार तयार होऊ शकतात. त्यामुळे लसीद्वारे एखाद्या व्हेरिएंटला प्रतिबंध केल्यास तो इतर व्हेरिएंटशी जुळवून घेऊन रोगाचा उद्रेक होऊ शकतो, अशी भीती होती. त्यामुळे सरकार देखील ही जोखीम घ्यायला तयार नव्हते..शिवाय एलपीएव्ही - अर्थात लो पॅथोजेनिक एव्हिएन इन्फ्लूएंझा ही लस एच९एन२ साठी मागील काही वर्षांपासून देशात कोंबड्यांना दिली जात होती. तरी काही भागात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे दिसून आले होते. आता अपेक्षा हीच आहे की ‘एनआयएचएसडी’ने विकसित केलेल्या लसीने कोंबड्यांमधील बर्ड फ्लूला आळा बसेल! शिवाय तत्काळ ही लस देशभरातील कोंबड्यांपर्यंत पोहोचून त्यांना व्यवस्थित टोचली जाईल, ही काळजी पशुसंवर्धन विभागाने घ्यायला हवी..मांसोत्पादनासाठीच्या कोंबड्यांचा कालावधी कमी असल्याने त्यांच्यात बर्ड फ्लू लागणीची शक्यता अंड्यांसाठीच्या कोंबड्यांपेक्षा (लेअर पक्षी) कमी असते. त्यामुळे सर्व लेअर पक्ष्यांपर्यंत तरी ही लस पोहोचवावी लागेल. लसीकरणानंतर यातील तज्ज्ञांनी बर्ड फ्लू विषाणूचा नवीन व्हेरिएंट तर विकसित होत नाही ना, हे पाहायला हवे. कोंबडीपालन अंड्यासाठी असो, की मांसोत्पादनासाठी केवळ लशीवर विसंबून न राहता शेडची स्वच्छता, निर्जंतुकीकरण तसेच जैवसुरक्षेच्या सर्व उपायांवर देखील शेतकरी तसेच व्यावसायिकांनी भर द्यायला हवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.