Agrowon
ॲग्रो विशेष

Seed : उत्सव पारंपरिक बियाण्यांचा

म्हैसूरमध्ये किसान स्वराज संमेलन भरले आहे. जशी पंढरपूरची यात्रा असते, तशी शेतीची जत्रा इथे भरली आहे. वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या कामाचे प्रदर्शन इथे उभारले आहे. त्यांच्याशी बोलताना त्या प्रत्येकाचे काम आणि शेतकरी म्हणून असलेली जबाबदारी याची जाणीव क्षणोक्षणी होत होती. संमेलनाच्या दारावरच विविध प्रकारच्या केळींचे प्रदर्शन लावलेले होते. छोट्या आकाराच्या केरळी केळी, गोड, लाल रंगाच्या मोठ्या केळी, लांब लाब टोकदार केळी ते कच्च्याच वापरल्या जाणाऱ्या हजारी केळी अशा विविध प्रकारच्या केळींचे तिथे संमेलनच भरले होते.

Team Agrowon

कर्नाटक राज्यातील म्हैसूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. मनमाडहून निघालेली गाडी बंगळूरच्या दिशेने पुणे मार्गे जाणार होती. सगळे शेतकरी (Farmer) पहिल्यांदाच इतक्या लांबच्या प्रवासाला निघाले होते. त्यामुळे उत्साह होताच. कष्टकरी, शेतकरी माणसांना त्यांच्या रोजच्या जगण्यातून, कामातून उसंत मिळणे अवघड असले तरी अशक्य नाही.

आपल्या नेहमीच्या कामात आपण रोज त्याच त्याच गोष्टी करत असतो. तिथे नवीन माहिती, ज्ञान आत्मसात करण्याची शक्यता बरेचदा कमीच असते. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी सतत अभ्यास करावा लागतो. वाचन, अनुभव माणसाला ज्ञानी बनवत असतात.

प्रत्यक्ष घेतलेले अनुभव हे ज्ञानसंपादनाबरोबरच आनंदाचीही अनुभूती देणारे असतात. नवीन काही बघण्याची, शिकण्याची जिद्द मनात बाळगूनच शेतकरी निघाले होते. तिसऱ्या दिवशी आम्ही म्हैसूरच्या स्टेशनवर उतरलो. किसान स्वराज संमेलनाचे वेध आम्हाला लागले होते.

जशी पंढरपूरची यात्रा असते, तशी शेतीची जत्रा इथे भरली आहे. वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या कामाचे प्रदर्शन इथे उभारले आहे. त्यांच्याशी बोलताना त्या प्रत्येकाचे काम आणि शेतकरी म्हणून असलेली जबाबदारी याची जाणीव क्षणोक्षणी होत होती. संमेलनाच्या दारावरच विविध प्रकारच्या केळींचे प्रदर्शन लावलेले होते.

छोट्या आकाराच्या केरळी केळी, गोड, लाल रंगाच्या मोठ्या केळी, लांब लाब टोकदार केळी ते कच्च्याच वापरल्या जाणाऱ्या हजारी केळी अशा विविध प्रकारच्या केळींचे तिथे संमेलनच भरले होते. केरळच्या तिरूअनंतपूरमच्या विनोद एस. या शेतकऱ्याचे वडील केळीच्या विविध जातींची लागवड करत असत.

परंतु गेल्या काही वर्षांत त्यांच्या लक्षात आले, की केरळमध्ये असणाऱ्या केळीच्या वेगवेगळ्या जाती नष्ट होत आहेत. म्हणून त्यांनी त्याचे संवर्धन करण्याचे ठरवले. त्यातूनच त्यांनी आपल्या शेतात जवळपास पाचशेच्या आसपास जातींच्या केळीची लागवड केली. ते पूर्णवेळ या कामात गुंतलेले आहेत. त्यातून त्यांना स्वतःपुरते उत्पन्नदेखील मिळत आहे. शिवाय या जातींच्य कंदविक्रीतूनही त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. त्यांच्या कामामुळे त्यांना ‘केळीचा भाऊ’ अशी उपाधी मिळाली आहे.

सय्यद घनी नावाचे मंड्या तालुक्यातील शेतकरी. त्यांच्या पत्नी सईदा फिरदोस भेटल्या. आपल्या पतीच्या कामाबद्दल बोलताना त्यांच्य डोळ्यांत वेगळीच चमक दिसत होती. त्यांच्या शेतात सध्या भाताच्या १३०० पारंपरिक जातींचा सांभाळ केला जात आहे. तसेच गावठी आंब्याच्या १२० प्रजातींचे संवर्धन व सांभाळ ते करत आहेत. हे सर्व करताना त्यांना सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पण ध्येयाने झपाटलेल्या सय्यद घनी यांनी माघार घेतली नाही. त्यांनी आपल्या शेतीला पर्यटनाची जोड देऊन आर्थिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला.

शिवाय चाणाक्ष सईदा फिरदोस यांनी आपल्या कलेचा वापर करून परिसरात उपलब्ध असणारे गवत, भाताचे काड, साळ, झाड व गवताच्या बिया वापरून दागिने बनवायला सुरुवात केली. शेतात निघणाऱ्या लाल अंबाडी व इतर वनस्पतींपासून विविध प्रकारचे ग्रीन टी त्या बनवतात. त्याशिवाय विविध खाद्यपदार्थ बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

अगदीच तरुण असणारे हे जोडपे संवर्धनाबरोबरच स्वतःची उपजीविकादेखील चांगल्या प्रकारे निभावत आहेत. सय्यद घनी व सईदा फिरदोस यांच्या शेताला भेट देण्याचे नियोजन करून आम्ही पुढच्या शेतकऱ्याकडे वळालो. खरं तर इथं असणारा प्रत्येक शेतकरी म्हणजे एकेक विद्यापीठच आहे. आपल्या पारंपरिक बियाण्यांबद्दल असणारी जाणीव-जागरूकता आणि त्यासाठी वेगळ्या वाटेने जाऊन काहीतरी करण्याची तयारी वाखाणण्याजोगी आहे.

इथल्या प्रदर्शनात भात, डाळी, कडधान्य, भरडधान्य, भाज्या अशी खूप विविधता आहे. भात हे भारतात सर्वाधिक घेतले जाणारे पीक. समुद्रकिनारपट्टीपासून ते मध्य भारतातील धान्याचे कोठार समजले जाणारे छत्तीसगड, झारखंड, ओडिशासारखी राज्ये अशी मोठी विविधता इथे पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या भागांत मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. इथे कार्यरत असणारी ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ ही संस्था अनेक पारंपरिक वाण सांभाळण्याचे काम करत आहे.

इथल्या पारंपरिक धानाच्या जातीबद्दल बोलताना त्यांनी विशेष उल्लेख केला तो भाताच्या ‘मोरपंखी’ या जातीचा. या भाताची साळ काळ्या रंगाची, चपट्या आकाराची असते. तिला सफेद किनार असते. जंगलाच्या कडेला शेती असणारे शेतकरी कुंपणासारखी या धानाची लागवड करत. कारण या धानाला मोठे कुसळ असतात.

ते सरळ जंगली जनावरांच्या नाकात शिरतात. त्यामुळे जंगली जनावरांपासून बचाव करण्यासाठी हा धान उपयुक्त ठरतो. हा भात खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असतो. पण त्याचं उत्पादन कमी असते, त्यामुळे शेतकरी आता त्याची फारशी लागवड करत नाहीत, अशी माहिती मिळाली.

कर्नाटक राज्यातच काम करणारी आणखी एक शेतकरी संस्था म्हणजे सहज समृध्द बियाणे कंपनी. विविध देशी वाणांचे उत्पादन व विक्री करण्यात ही कंपनी आघाडीवर आहे. त्यांच्याकडे जांभळ्या, पिवळ्या, केशरी रंगाच्या गाजराच्या जाती, लाल मुळा, विविध प्रकारचे टोमॅटो, मिरच्या, भाज्या अशा अनेक पिकांचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी मांडलेले विविध डाळींचे प्रदर्शन बघण्याजोगे आहे.

लाल चवळी ते काळा हुलगा, काळा हरभरा, काळा वाटाणा, काळा मूग, काळी तूर अशा कितीतरी विविधरंगी डाळी व कडधान्ये बघून मन हरखून गेले. प्रथिनांची कमतरता भरून काढण्याचे काम मुख्यतः डाळी व कडधान्ये करत असतात. शेतकऱ्याच्या शेतात पूर्वी घरच्यापुरते लागणारे इरवड बाजरी, ज्वारीच्या शेतात केले जायचे.

किंवा डोंगराळ भागात भाताची कापणी केली, की उपलब्ध ओलीवर कडधान्ये पेरली जायची. यात मसूर, हुलगे, वाटाणा, हरभरा असे विविध प्रकार असत. त्यासाठी वेगवेगळ्या भागांत तसे पारंपरिक बियाणे उपलब्ध असायचे. घरात ते जपले जायचे. त्यातून कुटुंबाचा वर्षभराचा आहार पौष्टिक बनायचा. परंतु गेल्या काही वर्षांत ही परंपरा कुठेतरी विसरली जात आहे. याची जाणीव काही शेतकऱ्यांना झाली आहे.

शेती व्यवसायाकडे जुगार म्हणून बघितले जाते. भौगोलिक परिस्थिती व हवामानतील बदलाचा फटका कधी बसेल, हे सांगता येत नाही. त्या तुलनेत पारंपरिक बियाणे वापरून केली जाणारी शेती शहाणपणाची शेती ही ‘फिक्स्ड डिपॉजिट’’सारखी होती. भलेही त्याचा व्याजदर म्हणजे उत्पादन कमी असेल, पण उत्पन्नाची शाश्‍वती असे.

पारंपरिक बियाणे हे कोणत्याही परिस्थितीत उत्पन्न देतात, याचा अनुभव आम्हीही घेतला आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला वाटते, की आपल्या मुलांनी शिकावे, शहरात जावे, नोकरी करावी. आपल्या मुलांनीही शेती व्यवसाय पत्करावा, असे वाटणारे शेतकरी फार कमी आहेत. याला कुठेतरी फाटा देत शेतीची वाट निवडणारे सुशिक्षित, तरुण-तरुणी आम्हाला इथे भेटले. त्याबद्दल आवर्जून सांगावे लागेल.

प्राची माहूरकर ही आपल्या नागपूरची. शास्त्र शाखेत पदवी घेतल्यानंतर आवड म्हणून पर्यावरण, परिसंस्था याविषयीचे कोर्सेस तिने केले. गावाकडे पूर्णवेळ शिफ्ट झाल्यानंतर आपल्या शेतातील झाडांची ओळख तिने करून घेतली. सातत्याने तिथली निरीक्षणे घेतली. नागपूरच्या आजूबाजूच्या जंगलात दिसणाऱ्या झाडांचा अभ्यास केला.

जंगलात व तिच्या शेतात दिसणाऱ्या झाडांच्या बिया, शेंगा, झाडांची वेगळ्या आकारांची पाने व झाडांचे काही भाग ती जमवू लागली. त्यातून झाडांचे अनोखे विश्‍व तिला समजू लागले. वेगळ्या दिसणाऱ्या बिया, शेंगा कोणत्या झाडांच्या आहेत, याचा शोध घेताना तिला झाडांची माहिती मिळाली. त्या झाडांचे महत्त्व समजले.

मिळालेल्या बिया रुजतात का, त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते हे प्रत्यक्ष कृतीतून ती शिकत राहिली. आणि कळत-नकळत बिया रुजवण्याचे तंत्र तिला समजले. जवळ जवळ दोनशे झाडांची माहिती तिला झाली, ९० झाडांच्या बिया रुजवण्याचे तंत्र तिने आत्मसात केले.

या झाडांचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून ती आता लोकांना विविध झाडांच्या बिया पुरवते. त्यासोबतच बिया रुजवण्याच्या तंत्राचे प्रशिक्षणही देते. त्यातूनच ती चरितार्थ चालवते. आसाममधून आलेली पार्वती सुबिता ही तरुण मैत्रिण २००३ पासून सेंद्रिय शेती करत आहे. तिचं काम बघायला मिळाले.

आमच्या शेतकऱ्यांचा पहिला दिवस हा असा अनुभव समृद्ध करणारा होता. आपल्या पूर्वजांनी जोपासलेले बियाणे आपण सांभाळत आहोत का, की आपली जबाबदारी विसरून विकासाच्या मागे धावत सुटलो आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्यास त्यांनी सुरुवात केली, हे महत्त्वाचे.

ranvanvala@gmail.com

(लेखिका निसर्ग अभ्यासक

आणि कार्यकर्त्या आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT