Farmer Producer Company : जागतिक बाजारपेठेत ओळख मिळवलेली ‘ओम गायत्री’ कंपनी

उगाव (जि. नाशिक) येथील मधुकर गवळी यांच्या नेतृत्वाखाली ‘ओम गायत्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ ने द्राक्ष, कांदा व अन्य शेतीमाल निर्यात हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून अल्पावधीतच २१ कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीपर्यंत मजल मारली आहे. पाचशेहून अधिक शेतकऱ्यांना कंपनीने सोबत घेतले आहे. जागतिक बाजारपेठेतील संधी अभ्यासून नावीन्यपूर्ण पीकप्रयोगासह आधुनिक तंत्राची जोड देत शेतकऱ्यांचा विकास साधला जात आहे.
Farmer Producer Company
Farmer Producer CompanyAgrowon
Published on
Updated on

नाशिक हा द्राक्ष, (Grape) डाळिंब (Pomegranate) आणि एकूण फलोत्पादन (Horticulture) क्षेत्रात आघाडीवरील जिल्हा आहे. उगाव (ता. निफाड) येथील मधुकर गवळी हे जिल्ह्यातील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित नर्सरीचा (Nursery) मोठा प्रकल्प उभा करून तो यशस्वी केला. त्यापाठोपाठ मार्च २०१६ मध्ये ‘ओम गायत्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ची उभारणी सुरू केली. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या नात्याने मैलाचे दगड पार करीत प्रशंसनीय प्रगती साधली आहे.

नावीन्यपूर्ण पीकप्रयोग व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यावर भर दिला. पाच संचालक, ॲग्रोनॉमी, विपणन (मार्केटिंग), क्षेत्रीय संशोधन व विकास, वित्त-लेखा आदींमधील कुशल मनुष्यबळ कंपनीसोबत जोडले आहे. शेतकऱ्यांसोबत थेट कामकाज करण्यासाठी चार क्षेत्रीय अधिकारी कार्यरत आहेत.

जागतिक बाजारपेठेची ओळखली संधी

कंपनीने मुख्यतः शेतमाल निर्यातीवर भिस्त ठेवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठा शोधून युरोपीय व आखाती देशांमध्ये द्राक्ष, टरबूज, टोमॅटो, कांदा यासह निवडक भाजीपाला पाठवण्यात येत आहे. द्राक्षाची निर्यात प्रमुख असून सफेद वाणांत थॉम्पसन सीडलेस, सोनाका सीडलेस तर रंगीत वाणांत ‘फ्लेम सीडलेस’, ‘जम्बो सीडलेस’ आदींचा समावेश आहे. अवघ्या तीन कंटेनरने सुरू झालेली कांदा निर्यात १०० कंटेनरपेक्षा अधिक संख्येवर पोहोचली आहे.

जागतिक मानांकनाप्रमाणे कार्यपद्धती

जागतिक स्तरावर ओळख मिळवण्यासाठी अन्न सुरक्षितता, गुणवत्तेचे निकष, ग्लोबलगॅप, स्मेटा. रेनफॉरेस्ट अलायन्स, इंडगॅप, बीआरसी, अँगमार्क आदी नोंदणी व प्रमाणीकरण करून घेतले आहे. हाताळणी, प्रतवारी, शीत साखळी व्यवस्था तयार केली असून, स्वच्छताविषयक सर्व निकष पाळले जातात. ‘अपेडा’ मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून रसायनांची कमाल अंश पातळी तपासून काढणी केली जाते.

Farmer Producer Company
Pomegranate Export : नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंब निर्यातीत ‘खोडा’

एकाच छताखाली सर्व सुविधा

संशोधनातून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व निरोगी रोपे पुरविली जातात. निविष्ठा, यांत्रिकीकरण उपलब्धीसाठी सर्व सुविधायुक्त दालन उभारले आहे. नामांकित कंपन्यांची उत्पादने ठेवली आहेत. माती, पाणी, पर्णदेठ परीक्षणाची सुसज्ज प्रयोगशाळा आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक केली आहे. चर्चासत्रे, ‘वेबिनार’, क्षेत्रीय भेटी यांचे आयोजन केले जाते. हवामान आधारित सूचना, नवी उत्पादने याबाबत वेळोवेळी संदेश दिले जातात. गेल्या वर्षी १२ टन कांदा बीजोत्पादन कंपनीने केले. बियाणे उत्पादन, खरेदी- विक्री, साठवण, निर्यात, प्रक्रियेसह गाजर पिकातील मूल्य साखळी विकसित करण्याचेही नियोजन आहे.

उल्लेखनीय सेवा-सुविधा

-उत्पादित मालाचे संकलन. हाताळणी व प्रतवारी करण्यासाठी खडक माळेगाव (ता. निफाड) येथे भाजीपाला संकलन केंद्र उभारले आहे. साडेसातशे मे. टन क्षमतेचे ‘कोल्ड स्टोअरेज उभारणीचे नियोजन सुरू झाले आहे.

-बेंच ग्राफ्टिंग तंत्रज्ञान- विशेष म्हणजे द्राक्षातील अत्याधुनिक ‘बेंच ग्राफ्टिंग’ तंत्रज्ञान युनिटची उभारणी. त्यासाठी लागणारे यांत्रिकीकरण आयात करून द्राक्ष रोपांचे ‘ग्राफ्टिंग’ केले जाते. यामध्ये शास्त्रीय पद्धतीने विशिष्ट वातावरणात वाढ करून रोपे लागवडीयोग्य बनवली जातात. या तंत्राद्वारे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचतो. पहिल्या वर्षी दोन भाजीपाला पिके घेऊन शेतकरी फायदा मिळवू शकतो.

Farmer Producer Company
Horticulture : फळबाग योजनेची घरघर अखेर थांबली

२) द्राक्ष लागवड ते निर्यातीपर्यंत ‘ट्रेसेबिलिटी’ ठेवण्यासाठी ॲप विकसित केले असून, शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती त्यात साठवली जाते. त्यानुसार हंगामी नियोजन, उत्पादन, निर्यात यासाठी अंदाज प्राप्त होतात.

३) कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी बीजारोपण यंत्राचा अवलंब व प्रसार केला आहे. यंत्राद्वारे विशिष्ट व एकसमान अंतरावर बी पेरल्यामुळे सुदृढ रोपनिर्मिती होते. वेळ व बियाणायांची बचत होते.

४) कांदा, टोमॅटो, द्राक्ष, पपई, ढोबळी मिरची आदी पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे तांत्रिक मार्गदर्शन केले जाते.

५) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग घेऊन नवी पीक पद्धती व तंत्रज्ञान अवलंब.

कोरोना काळात प्रभावी कामकाज

कोरोना काळात कंपनीने तंत्रज्ञान विस्तार व मार्गदर्शन उपलब्ध होण्यासाठी ‘वेबिनार’ व ‘मेसेजिंग’ यंत्रणा सुरूच ठेवली. या काळात शेतीमालाची मालवाहतूक ठप्प होती. अशा वेळी प्रशासन व कृषी विभागाच्या संबंधित रीतसर परवानग्या घेऊन बास्केट स्वरूपात भाजीपाला व फळे यांचा महानगरे आणि परराज्यात थेट ग्राहकांपर्यंत तसेच व्यापाऱ्यांनाही पुरवठा केला.

आर्थिक उलाढाल

सुमारे २५ हून अधिक गावांमध्ये ५०० हून अधिक सभासद व एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांसोबत नेटवर्क जोडलेल्या या कंपनीने ४०० हून अधिक कुटुंबांना रोजगारही दिला आहे. विविध उपक्रम व निर्यात याद्वारे वार्षिक उलाढालीचा आलेख उंचावला आहे. सन २०१८-१९ मध्ये १ कोटी ७१ लाख रुपये ही उलाढाल होती. सन २०१९-२० मध्ये १३.५१, २०२०-२१ मध्ये २१. ४० तर मागील वर्षी (२०२१-२२) ती २१ कोटी ९२ लाखांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत कंपनीने मजल मारली आहे.

संपर्क : मधुकर गवळी, ९८५०४९१५६५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com