Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : उसासाठी खत, पाणी व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ.राजेंद्र भिलारे, डॉ.किरणकुमार ओंबासे

Sugarcane Cultivation : उसाच्या लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या ३० ते ३५ टक्के क्षेत्र पूर्वहंगामी उसाखाली आहे. ऊस लागवडीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन योग्य असते. उसाची मुळे ९० ते १०० सेंमी पर्यंत खोल जाऊन खालील थरातील अन्न व पाणी शोषून घेतात. यासाठी पहिली उभी व नंतर दुसरी आडवी खोल नांगरट करावी.

नांगरणीनंतर कुळव चालवून ढेकळे फोडावीत. जमिनीत पुरेशा प्रमाणात शेणखत मिसळावे. जमीन सपाट केल्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार मध्यम काळ्या जमिनीत एक मीटर आणि भारी काळ्या जमिनीत १.२० मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. पाण्याची बचत आणि पिकास जास्त सूर्यप्रकाश व खेळती हवा राहाण्यासाठी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा.

यासाठी मध्यम काळ्या जमिनीत ७५ सेंमी आणि भारी जमिनीत ९० सेंमी अंतरावर सलग सऱ्या काढून दोन सऱ्यांमध्ये लागवड करावी. तिसरी सरी मोकळी ठेवल्याने २.५ बाय ५ फूट किंवा ३ बाय ६ फुटाचा पट्टा तयार होतो. लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार सेंद्रिय खताचा दुसरा हप्ता सरीमध्ये द्यावा.

पूर्वहंगामी ऊस पीक साधारणपणे १४ ते १५ महिने शेतात उभे असते. यासाठी मध्यम पक्वता वर्गातील को ८६०३२ (नीरा), फुले २६५, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १३००७, व लवकर पक्वता गटातील फुले १०००१ आणि फुले ११०८२ या जातींची लागवड करावी.

उत्पादन वाढविण्यासाठी बेणे मळ्यातील बेणे ऊस लागवडीसाठी निवडावा. उसाचे बियाणे दर तीन वर्षांनी बदलावे. सुधारित जातीचे शुद्ध व भेसळविरहित बेणे निवडावे. बेणे रसरशीत असावे, कांड्या लांब आणि जाड असाव्यात आणि डोळे फुगीर असावेत.

बेणे रोग आणि किडीपासून मुक्त असावे. ९ ते ११ महिने वयाचे बेणे असावे.

बेणे ताजे असावे, २४ तासांच्या आत लागवड करावी.

लागवडीपूर्वी करताना रासायनिक बेणेप्रक्रिया व त्यानंतर जिवाणू संवर्धकाची बेणेप्रक्रिया करावी. यासाठी १०० लिटर पाण्यात मेलॅथिऑन (५० टक्के प्रवाही) ३०० मिलि आणि कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम मिसळून बेणे १० मिनिटे बुडवावे. रासायनिक प्रक्रिया केलेले बेणे अर्धा तास सुकल्यानंतर १० किलो अ‍ॅसेटोबॅक्टर आणि १.२५ किलो स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक १०० लिटर पाण्यामध्ये मिसळावे. या द्रावणामध्ये बेणे ३० मिनिटे बुडवावे. जिवाणूंच्या बीज प्रक्रियेमुळे नत्रामध्ये ५० टक्के आणि स्फुरदच्या मात्रेत २५ टक्के बचत होते

लागवड दोन डोळे टिपरी पद्धतीने करावी. दोन डोळ्याचे टिपरे तयार करताना डोळ्यांच्या वरील १/३ भाग ठेवून धारदार कोयत्याने बेणे छाटावे. मध्यम काळ्या जमिनीसाठी (१ मीटर सरी अंतर) हेक्टरी ३०,००० टिपरी आणि भारी जमिनीसाठी (१.२ मीटर सरी अंतर) हेक्टरी २५,००० टिपरी बेणे लागते.

दोन डोळ्यांच्या टिपऱ्यांची लागवड करताना दोन टिपऱ्यामध्ये १५ सेंमी अंतर ठेवून डोळे बाजूस येतील अशा प्रकारे लागवड करावी. हलक्या मध्यम जमिनीत ओली लागवड करावी तर भारी चोपण/ खारवट जमिनीत कोरड्या पद्धतीने लागवड करावी.

आंतरमशागत

ऊस एक महिन्याचा असताना नांग्या भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लागवड करतेवेळीच पाण्याच्या पाटात जादा एक डोळ्याच्या टिपऱ्या लावून या रोपांचा वापर करावा आणि पाणी द्यावे.

लागवडीनंतर २ महिन्यांनी नत्र खताचा दुसरा हप्ता देऊन कृषिराज अवजाराच्या साह्याने हलकी भर लावावी. यामुळे फुटवे फुटण्याचे प्रमाण वाढते.

ऊस चार ते साडेचार महिन्यांचा झाल्यावर बांधणी करावी. यासाठी पिकास बांधणीची खतमात्रा देऊन कृषिराज किंवा तीन पहारीच्या अवजाराच्या साह्याने वरंबे फोडून सायन कुळवाच्या साह्याने दोन ओळींमधील जमीन कुळवून सपाट करावी. त्यानंतर रिजरच्या साह्याने मातीची भर द्यावी.

पाणी व्यवस्थापन

पूर्वहंगामी उसासाठी एकूण ३०० ते ३२५ हेक्टर सेंमी पाण्याची गरज आहे. त्यासाठी पाण्याच्या ३२ ते ३४ पाळ्या द्याव्यात. हंगामानुसार उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, पावसाळ्यात १४ ते १५ दिवसांनी आणि हिवाळ्यात १८ ते २० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

पट्टा पद्धती मध्ये लागवडीनंतर फक्त उसाच्या दोन सऱ्यांनाच पाणी द्यावे. ऊस बांधणी नंतर एका सरीला पाणी देऊन दोन्ही ओळी भिजवता येतात. त्यामुळे पाण्याची ३० ते ३५ टक्के बचत होते. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास ५० टक्क्यांर्यत पाण्याची बचत होते.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

माती परीक्षण करून सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगेनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतात (१०:१ प्रमाणात) मिसळून १ ते २ दिवस मुरवून मातीआड करून घ्यावे.

पूर्वहंगामी उसासाठी खत व्यवस्थापन

खतांचा हप्ता नत्र (युरिया) स्फुरद (सिं.सु.फॉ) पालाश (म्यु.ऑ.पो.)

लागवडीच्यावेळी ३४ (७४) ८५(५३१) ८५ (१४२)

लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी १३६ (२९५) - -

लागवडीनंतर १२ ते १६ आठवड्यांनी ३४ (७४) - -

बांधणी वेळी १३६ (२९५) ८५(५३१) ८५ (१४२)

एकूण ३४०(७३८) १७० (१०६२) १७० (२८४)

टीप ः रासायनिक खतांची मात्रा माती परिक्षणानुसार द्यावी.

- डॉ.किरणकुमार ओंबासे, ७५८८९४४९८६

(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,पाडेगाव, ता.फलटण,जि.सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT