Fermented Organic Manure Agrowon
ॲग्रो विशेष

Farming Management : उत्पादन वाढीसह सुपीकतेसाठी किण्वित सेंद्रिय खत

Team Agrowon

मुकुंद पाटील, राजेंद्र कदम

Indian Agriculture : पूर्वी शेतकरी मोठ्या प्रमाणात शेणखतांचा वापर करत. त्याला जोड असे ती प्रामुख्याने लेंडी खत, मासळीचे खत, गोठ्यातील व शेतातील शिल्लक अवशेष यांची. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे जनावरांची संख्या ही भरपूर होती. पुढे काळाच्या ओघात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे गोठ्यातील जनावरांची संख्या कमी होत गेली आहे.

परिणामी शेणखतांसारख्या सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी झाली आहे. कृषी विद्यापीठांची शिफारस बहुतांश पिकांसाठी सर्वसाधारण दहा ते वीस बैलगाड्या शेणखताबरोबर नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची असे.

सेंद्रिय खते विकत घेऊन घालणे सर्वच पिकांसाठी शक्य होत नाही. बहुतांश सर्व शेतकरी सेंद्रिय खतांच्या शिफारशीकडे दुर्लक्ष करून रासायनिक खत वापरताना दिसतात. परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वेगाने कमी होत गेले आहे.

सेंद्रिय कर्बच जमिनीमध्ये नसल्यामुळे पिकांना खते शोषण्यामध्ये मदत करणाऱ्या सूक्ष्मजिवांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे केवळ रासायनिक खतांच्या वापरातून चांगले उत्पादन मिळणेही पुढे पुढे कमी होत गेले आहे. खर्च वाढूनही अपेक्षित उत्पादन येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या बाबींचा विचार करून भारत सरकारद्वारे पीएम प्रणाम (PM program for restoration, awareness, nourishment and amelioration of mother earth) ही योजना राबवली आहे. त्यामध्ये जमिनीचे आरोग्य व सुपीकता वाढविण्यासाठी राज्य व केंद्रशासित प्रदेश यांना पर्यायी खते उदा. सेंद्रिय अथवा जैविक खते यांचा वापर वाढविण्यासाठी अनुदानावर दिली जात आहेत.

त्यासाठी कृषी विभागाकडून रासायनिक खत पुरविणाऱ्या मोठ्या खत कंपन्यांना या खतांच्या विक्रीसंदर्भात सूचना दिल्या आहेत. या योजनेअंतर्गत, भारत सरकारने किण्वित सेंद्रिय खतासाठी (एफओएम) साठी प्रति टन रुपये पंधराशे इतकी रक्कम बाजार विकास सहकार्यासाठी (MDA) पुरवठादार किंवा उत्पादकांना देऊ केली आहे.

किण्वित सेंद्रिय खत (एफओएम) म्हणजे काय?

वनस्पती अथवा प्राण्यांचे अवशेष हवारहित स्थितीमध्ये कुजवून आंबविल्यानंतर तयार होणाऱ्या खतांना किण्वित सेंद्रिय खत (एफओएम) असे म्हणतात. या आंबविण्याच्या प्रक्रियेमध्ये ईस्ट, लाईम, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया आणि विविध प्रकारच्या सुमारे ८० सूक्ष्मजिवांच्या प्रजातींचे मिश्रण केले जाते.

एफओएमचे विशेष फायदे

मातीशास्त्र व कृषी रसायनशास्त्र कृषी संस्था, नैनी आणि सॅम हिंगिनबोटम तंत्रज्ञान व शास्त्र कृषी विद्यापीठ, प्रयागराज, उत्तर प्रदेश यांनी संयुक्तपणे हिरवा वाटाणा या पिकासाठी मातीमध्ये एफओएम आणि मायकोऱ्हायजा यांचा वापर करून प्रयोग केले. त्यामुळे मातीवर होणाऱ्या भौतिक व रासायनिक परिणामांचा अभ्यास करून काही नोंदी नोंदवल्या. त्यानुसार

जमिनीची सच्छिद्रता ४४.६८% वरून ५२.८१ टक्क्यापर्यंत (म्हणजेच ८.१९%) वाढली.

जलधारण क्षमता ४३.५२% वरून ४८.५३% (म्हणजेच पाच टक्के) इतकी वाढली.

या खतांच्या वापरामुळे जमिनीतील जिवाणूंची गुणवत्ता व संख्या वाढते. ते जमिनीतील अन्नद्रव्याचे खनिजांमध्ये रूपांतर करतात. ते जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन त्यांची साधी संयुगे तयार होतात. ती पिकांकडून सहजपणे शोषली जातात.

पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते व पीक निरोगी राहते.

मिथेन अथवा कार्बन डाय-ऑक्साइड सारखे हरितगृह वायू कमी होत असल्यामुळे पर्यावरण पूरक आहे.

जैविक खतांच्या उपलब्धतेमुळे रासायनिक खताची मात्रा निश्चितच कमी करता येते.

पीक उत्पादनाचा दर्जा व चव सुधारते.

हे खत १००% सेंद्रिय असून, पिकाच्या गरजेनुसार अन्नद्रव्याची उपलब्धता केली जाते.

रासायनिक खतामध्ये बचत झाल्यास त्याच्या आयातीसाठी खर्च होणारे परकीय चलन वाचू शकेल.

कॉम्प्रेसड् बायोगॅस उपलब्ध होऊन त्यातून ऊर्जा उपलब्ध होते.

यामुळे पिकांची व्यवस्थित वाढ होते. त्याबरोबर जमिनीतील कार्बन ः नत्र गुणोत्तरसुद्धा सुधारते.

शेणखताच्या तुलनेमध्ये टाकण्याची मजुरी, वाहतूक खर्च कमी राहतो. शेणखतातून गवताचे बी शेतात जाऊन वाढणारी तणांची समस्या टाळता येते.

या खतांसंबंधी नेदरलँडमधील ‘ॲग्रीटोन’ या संस्थेचे संचालक अँड्र्यूसिन कॉक यांनी नोंदवलेली निरीक्षणे :

फक्त कंपोस्ट खताचा वापर केलेल्या शेतातील गवत कापल्यानंतर सहा आठवड्यांपर्यंत साठवल्यानंतर त्याच वजन ६० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसले. तर एफओएम वापरलेल्या शेतातील गवताचे वजन फक्त तीन टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसले.

कार्बन ते नत्र गुणोत्तर १०:१ पासून वाढून १९:५ असे वाढले. हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणि सुपीकतेसाठी आणि पीक वाढीसाठी उपयुक्त आहे.

ॲग्रीटोन आणि वांगनियन येथील फीड इनोव्हेशन सर्व्हिसेस यांनी केलेल्या प्रारंभिक स्वतंत्र चाचण्यांमध्ये सेंद्रिय कचरा आंबल्याने कार्बन आणि सेंद्रिय पदार्थांचे नुकसान लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुढील पिकांना अधिक पोषण द्रव्य उपलब्ध होतात. भारतामध्ये सध्या एफओएम एक कोटी मेट्रिक टन प्रति वर्ष इतके तयार होते. देशभरामध्ये ५७० संयंत्रांमधून सुमारे सात कोटी टन इतके उत्पादन शक्य आहे.

एफओएम मधील महत्त्वाचे घटक व प्रमाण

आर्द्रता वजनानुसार ३०-७०%

नत्र, स्फुरद, पालाश १.२% पेक्षा जास्त

कमीत कमी सेंद्रिय वजनानुसार १४%

कार्बन ः नत्र गुणोत्तर कमाल ३०%

रोगकारक घटक ०

विद्युत वाहकता ४% पेक्षा कमी.

सामू ६.५-८.४

वापरण्याची वेळ आणि प्रमाण

या खताचा वापर रान बांधणीचे वेळी बेसल डोस म्हणून करावा.

ऊस, केळी, हळद, आले यासारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांसाठी खताची मात्रा विभागून द्यावी.

काही पिकांसाठी या खताच्या मात्रा

खालील प्रमाणे पीक वापरण्याचे प्रमाण

(किलो प्रति एकर)

द्राक्ष ८०० - १०००

डाळिंब ८०० - १०००

ऊस १००० - १२००

केळी १००० - १२००

आले, हळद १००० - १२००

कांदा, टोमॅटो ५०० - ६००

कापूस ५०० - ६००

उद्योजकतेला आणि सुपीकतेला चालना...

अनेक शेतकऱ्यांकडे मोठे गोठे किंवा पोल्ट्री असते. त्यातून निघणाऱ्या जैविक टाकाऊ घटकांपासून बायोगॅस निर्मितीचेही प्रकल्प आहेत. काही प्रगतिशील शेतकऱ्यांकडे गोबर गॅसही असतो, त्यातून ते घरगुती वापरासाठी मिथेन मिळवतात. अशा कोणत्याही प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या स्लरीवर हवारहित कक्षामध्ये (चेंबर) क्विण्वनाची प्रक्रिया करता येते. ते अर्धवट कुजलेली स्लरीवर किण्वनाची किंवा आंबवण्याची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी यिस्ट, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया, लाइम इ. अशा सूक्ष्मजिवांचे मिश्रण वापरता येऊ शकते. या ८० सूक्ष्मजिवांच्या मिश्रणाच्या निर्मितीसाठी जैवतंत्रज्ञान कंपन्यांनी स्वतः पुढे होऊन काम करण्याची गरज आहे. यातून स्थानिक पातळीवर संपूर्णपणे किण्वित झालेल्या सेंद्रिय खतांची उपलब्धता होऊ शकेल. त्यातून त्याच्या किमतीही सामान्य शेतकऱ्यांना परवडण्यायोग्य होतील, अशी आशा आहे. परिणामी सामान्य शेतकरीही त्याचा वापर करतील आणि जमिनीच्या सुपीकतेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.

मुकुंद पाटील, ९८६९०६९१८९ (निवृत्त कार्यपालक संचालक, विपणन व मानव संसाधन, आरसीएफ.)

राजेंद्र कदम, ९७६३४५८२७६ (निवृत्त मुख्य प्रबंधक -विपणन, आरसीएफ.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT