Organic Sugarcane Farming : ऊस शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाचे महत्त्व

Sugarcane Management : जमिनीची सुपीकता उत्तम ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब हा शाश्वत शेतीचा गाभा आहे. मात्र सतत एकच पीक घेत राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कमी होते.
Sugarcane Management
Sugarcane Management Agrowon
Published on
Updated on

डॉ. समाधान सुरवसे, डॉ. प्रीती देशमुख, डॉ. अशोक कडलग

ऊस हे महाराष्ट्रातील एक प्रमुख नगदी पीक आहे. ऊस पीक आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू हंगामात घेतले जाते. हे पीक सरासरी १२ ते १८ महिने शेतात वाढत असते. यासाठी वर्षभर भरपूर पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो. सद्यःपरिस्थितीत मातीच्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे जमिनीच्या सुपीकतेवर आणि उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो आहे.

सतत एकच पीक घेत राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कमी होत आहे. तसेच जमिनीत सेंद्रिय कर्ब खूपच कमी असल्यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या व जमिनीतील भौतिक, रासायनिक गुणधर्म यावर परिणाम होत आहे. शिवाय रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी झाली असून परिणामी उत्पादकता कमी होत आहे.

हेक्टरी उत्पादन कमी येण्याची कारणे

  • सेंद्रिय  कर्बाची कमतरता

  • रासायनिक खतांचा अति वापर

  • अन्नद्रव्यांचा असमतोल

  • अन्नद्रव्यांचा ह्रास

  • जमिनीचा  अल्कधर्मीय  सामू

  • क्षारयुक्त  व चोपण  जमिनी

  • चुनखडीयुक्त जमिनी

  • एक पीक पद्धतीचा  अवलंब

  • भारी काळ्या  जमिनी मशागतीसाठी कठीण

  • बियाणे बदलाचा अभाव

  • मुख्य वाढीच्या काळात पाण्याचा ताण

  • पाणी व्यवस्थापनाचा अभाव

Sugarcane Management
Sugarcane Fertilizers Management : आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन

मागील काही वर्षांपासून रासायनिक खतांचा बेसुमार वापर, पाण्याचा अति वापर आणि खूप आवश्यक असूनही सेंद्रिय खतांचा खूप कमी वापर या कारणांमुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादनकता कमी झाली आहे. सध्या ऊस उत्पादक भागांमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होत आहे. ऊस पिकाच्या जोमदार वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्यांसह दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील अत्यंत महत्त्वाची आहेत.

जमिनीच्या सुपीकतेचे जैविक, भौतिक आणि रासायनिक असे तीन प्रकार पडतात.

  • जैविक सुपीकता म्हणजे जमिनीत असणारे उपयुक्त जीवाणू. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या जितकी जास्त तितकी जमीन सुपीक असे मानले जाते.

  • भौतिक सुपेतेमध्ये जमिनीत असणारी मोकळी हवा, जमिनीची जलधारणा क्षमता, निचरा यांचा समावेश होतो. ऊसाच्या मुळांच्या निरोगी आणि भरघोस वाढीसाठी हे गुणधर्म महत्त्वाचे आहेत.

  • रासायनिक सुपीकतेत पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांची उपलब्धता समजते. माती परीक्षणानंतर आपल्या जमिनीचा सामु, क्षारांचे प्रमाण, उपलब्ध अन्नद्रव्य किती आहेत याची माहिती मिळते. उपलब्ध अन्नद्रव्यांमध्ये मुख्य, दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्य हे त्यांच्या पिकासाठी आवश्यकतेनुसार ठरतात. त्याचप्रमाणे जमिनीचे सेंद्रिय कर्ब, चुना यांची माहिती मिळते.

  • ऊस पिकाच्या दर्जेदार उत्पादकतेसाठी वरील तिन्ही प्रकारच्या सुपीकता जमिनीमध्ये असाव्यात. या तिन्ही सुपीकता उत्तम ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब हा शाश्वत शेतीचा गाभा आहे. म्हणून ऊस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.

सेंद्रिय कर्बावर परिणाम करणाऱ्या मुख्य बाबी

हवामान

तापमान जास्त असल्यास त्याचा सेंद्रिय कर्बावर अनिष्ट परिणाम होतो. थंड तापमानात सेंद्रिय कर्ब योग्य पातळी ठेवले जातो. महाराष्ट्रात तापमान तुलनेने जास्त असल्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढीसाठी मर्यादा येतात. उष्ण तापमानामुळे सेंद्रिय पदार्थाचे वेगाने विघटन होते. परिणामी सेंद्रिय कर्ब पातळीत वाढ होण्यात अडचणी येतात.

जमिनीतील जिवाणू व ओलावा

सेंद्रिय पदार्थांच्या वापरानंतर त्यांच्या जैविक आणि रासायनिक विघटनात जिवाणू अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. सेंद्रिय पदार्थ हे जिवाणूंचे अन्न आहे. तसेच जमिनीतील बुरशी, जिवाणू असे सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थ कुजवण्याची प्रक्रिया सुरू करतात. पूर्ण विघटानंतर सेंद्रिय कर्ब वाढतो, मात्र तापमान अधिक असल्यास जमिनीत अपेक्षित वाढ दिसत नाही. त्यामुळे जमिनीतील ओलावा योग्य प्रमाणात राखणे आवश्यक असते. तसेच अधिक ओलावा असल्यास देखील जिवाणूंची कार्यशक्ती व एकूणच विघटनाची प्रक्रिया ही मंदावते.

Sugarcane Management
Sugarcane Crop Management : पूरपरिस्थितीतील ऊस पिकाचे व्यवस्थापन

सेंद्रिय पदार्थांचे गुणधर्म

वापरलेल्या सेंद्रिय खतामधील सेंद्रिय कर्ब आणि नत्र यांचे गुणोत्तर हे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण व वेग ठरवते. उदा. ऊसाचे पाचट, गव्हाचे काड यांचे कर्ब ः नत्र गुणोत्तर जास्त आहे. त्यामुळे त्यांचे विघटन होण्यास अधिक कालावधी लागतो. जमिनीत नत्राचे प्रमाण खूप कमी असेल तर सेंद्रिय पदार्थ विघटनाची क्रिया मंदावते.

जमिनीचे गुणधर्म

जमिनीचा सामू जर ४. ५ पेक्षा कमी आणि ८. ५ पेक्षा जास्त असला तरी जिवाणूंवर अनिष्ट परिणाम होतो. सेंद्रिय पदार्थाचे विघटन मंद होते. लागवडीखाली असलेल्या जमिनीत पडीक जमिनीच्या तुलनेत सेंद्रिय कर्ब हा अधिक असतो. सुधारित तंत्रज्ञानाणे सेंद्रिय कर्बामध्ये वाढ करता येते.

सेंद्रिय कर्ब म्हणजे काय ?

जमिनीतील सजीवांनी जमिनीतील कोणत्याही पदार्थांचे अंशतः विघटन केल्यानंतर राहिलेला कर्ब किंवा कार्बन म्हणजेच सेंद्रिय कर्ब होय. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा सुपीकता निर्देशांक समजला जातो. अत्यंत चांगल्या परिस्थितीमधील जमिनीत व जंगलामध्ये सेंद्रिय कर्ब हा ५ टक्क्यांपेक्षा जास्त असतो.  जास्त पीक उत्पादनासाठी कर्बाचे प्रमाण कमीत कमी १ टक्का जमिनीत असणे गरजेचे आहे.  

माती तपासणीनंतर, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सुपीकता निकष

  • ०.२० टक्क्यांपेक्षा कमी अत्यंत कमी

  • ०.२१ ते ०.४० टक्के कमी

  • ०.४१ ते ०.६० टक्के मध्यम

  • ०.६१ ते ०.८० टक्के मध्यम जास्त

  • ०.८ ते १. ० टक्के जास्त

  • १. ० टक्के पेक्षा अधिक खूप जास्त

सेंद्रिय कर्बाचे फायदे

  • सेंद्रिय कर्ब जास्त असलेल्या जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या अधिक असते. परिणामी ऊसाला अन्नद्रव्यांची उपलब्धता अधिक होते.

  • जमिनीत सेंद्रिय पदार्थ अधिक असल्यामुळे जमिनीची भौतिक सुपीकता मोठ्या प्रमाणात सुधारते.

  • जमिनीची जलधारणाशक्ती, पोत सुधारतो, त्यामुळे क्षारांचा निचरा होण्यास मदत होते.

  • जमिनीत हवा खेळती राहिल्याने मुळांची निरोगी, जोमदार वाढ होते.

  • जमिनीचा सामू अधिक असल्यास तो कमी होण्यास मदत होते.

  • जीवाणूद्वारे सेंद्रिय आम्ले सोडली जातात. या आम्लांमुळे रासायनिक अभिक्रिया वाढून स्थिर झालेली सेंद्रिय व रासायनिक अन्नद्रव्येही पिकांना उपलब्ध होऊ लागतात. म्हणून सेंद्रिय कर्बाची पातळी वाढवणे जमिनीच्या जैविक, भौतिक आणि रासायनिक सुपीकतेसाठी महत्त्वाचे ठरते.

- डॉ. समाधान सुरवसे, ९८६०८७७०४९

(मृदशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु. ता. हवेली, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com