Snail Attack Agrowon
ॲग्रो विशेष

Snail Attack : दहशत गोगलगायींची!

Team Agrowon

Kharif Crop Pest : मागील चार-पाच वर्षे प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भात पावसाळा सुरू होताच वाणू अथवा पैसा या मिलिपीडवर्गीय किडीचा उद्रेक पाहावयास मिळाला. हे वाणू खरिपात उगवून आलेले सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आदी पिके फस्त करीत होते. काही ठिकाणी तर प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात होता, की अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती.

या वर्षी मात्र जूनमधील कमी पाऊसमानामुळे वाणूंचा तेवढा प्रादुर्भाव राज्यात कुठे दिसला नाही. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

खरीप पिकांबरोबर वांगी, कोबी, मिरची, मोसंबी, डाळिंब आदी भाजीपाला-फळे पिकांवर शंखी गोगलगायींचे आक्रमण झालेले आहे, मागच्या वर्षी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत खरीप-रब्बी हंगाम मिळून ५५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके शंखी गोगलगायींनी फस्त केले होते.

त्यामुळे आताच्या प्रादुर्भावाने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. शंखी गोगलगायींची एवढी दहशत आहे की फुलंब्री तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी मल्चिंगवर भाजीपाला घेतला होता. मात्र गोगलगायी दिवसा मल्चिंगखाली लपून बसत व रात्री पिके फस्त करीत. त्यामुळे या भागातील धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी या वर्षी मल्चिंगवर पिके घेतली नाहीत.

सततचे ढगाळ, दमट, पावसाळी वातावरणात शंखी गोगलगायींचे प्रजनन जलद होऊन त्यांची संख्या अनेक पटींनी वाढते. सध्याचे वातावरण शंखी गोगलगायींचे प्रजनन, प्रादुर्भाव आणि प्रसारास अत्यंत पोषक आहे. त्यामुळे प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. नदीकाठच्या शेतात गोगलगायींचा उपद्रव जास्त असतो.

आंतरराष्ट्रीय निसर्ग व नैसर्गिक स्रोत संवर्धन संघटनेने गोगलगायींचा समावेश जगातील शंभर सर्वांत जास्त उपद्रवी किडींच्या प्रजातींमध्ये केला आहे. शंखी गोगलगायी उभयलिंगी असतात. एकाच आकाराच्या दोन गोगलगायींचे मिलन झाल्यास दोन्ही गोगलगायी अंडी देतात. एक मोठी आणि दुसरी लहान गोगलगाय यांचे मिलन झाल्यास फक्त मोठी गोगलगाय अंडी देते.

यामुळे गोगलगायींची संख्या झपाट्याने वाढते. गोगलगायी साधारणतः निशाचर असल्या, तरी ढगाळ व आर्द्रतायुक्त वातावरणात दिवसाही सक्रिय असतात. शंखी गोगलगाय बहूभक्षी असून, ५०० पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजीविका करते. कोवळ्या वनस्पती, खरीप-रब्बी हंगामातील पिके तसेच फळझाडे, भाजीपाला, तुती आणि कुजलेल्या वनस्पतिजन्य पदार्थांवर उपजीविका करतात.

या वर्षी जसा पाऊस सुरू झाला तसा सकाळी उठून शेतातील गोगलगायी वेचून त्यांना पोत्यात भरून त्यात मीठ टाकून दूरवर फेकून देत, पिके वाचविण्याचा प्रयत्न फुलंब्री तालुक्यातील काही शेतकरी करीत आहेत.

यावरून ही कीड किती घातक आहे, हे आपल्या लक्षात आले असणार! मागील अनेक वर्षांपासून शंखी गोगलगायींचा उद्रेक पाहावयास मिळताना त्यांच्या नियंत्रणाबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड गोंधळ आहे. गोगलगायींच्या प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपायांबाबत शेतकऱ्यांचे योग्य प्रबोधन झालेले नाही.

त्यामुळे प्रादुर्भाव झाल्यास वैयक्तिक पातळीवर शेतकरी कृषी सेवा केंद्रचालकांच्या सल्ल्याने केवळ रासायनिक कीडनाशकांचा वापर करताहेत. एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब सामूहिक पातळीवर झाल्याशिवाय गोगलगायींचे प्रभावी नियंत्रण होणार नाही, हे शेतकऱ्यांना सांगून पटवून द्यावे लागेल.

उन्हाळी खोल मशागत, नदी-नाल्याचे काठ, शेताचे बांध स्वच्छता, सापळे रचून गोगलगायी जमा करून नष्ट करणे, चुन्याच्या पट्ट्या, निंबोळी पावडर-अर्काचा वापर आदी उपाय सामूहिक पातळीवर झाले पाहिजेत.

रासायनिक कीडनाशकांमध्ये मेटाल्डीहाइडचा वापर सर्रास होतो. परंतु पाऊस पडल्यावर मेटाल्डीहाइड प्रभावी ठरत नाही. शिवाय यातून माती प्रदूषणाबरोबर निसर्गातील अनेक प्राणी-पक्षी यांना धोका संभवतो.

मेटाल्डीहाइडऐवजी आयर्न फॉस्फेटचा वापर केल्यास ते पाऊस पडल्यावरही दोन आठवड्यांपर्यंत क्रियाशील राहते. आयर्न फॉस्फेट हे पाळीव प्राणी, मानव, मासे, पक्षी, मित्रकीटकांसाठी सुरक्षित आहे. अशा व्यवस्थापन तंत्राने गोगलगायींच्या दहशतीतून शेतकरी मुक्त होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT