Amaravati News : पारा वाढता असल्याने संत्रापट्ट्यात फळगळतीचा सामना बागायतदारांना करावा लागत आहे. त्यावर उपाय म्हणून बागेतील तापमान नियंत्रणाच्या उद्देशाने ओलावा राखण्याकामी सिंचन केले जाते. परंतु भुगर्भातच पाण्याची उपलब्धता नसल्याने यातही अडचणी येत आहेत. परिणामी अनेक बागायतदारांनी झाडे तशीच वाळण्याची शक्यता पाहता बागा जेसीबीच्या सहाय्याने काढण्यावर भर दिला आहे.
नागपूरला ऑरेंज सिटी म्हटले जात असले तरी संत्र्याखालील सर्वाधिक लागवड क्षेत्र हे अमरावती जिल्ह्यात आहे. राज्याच्या एकूण दीड लाख हेक्टरपैकी सुमारे एक लाख हेक्टर अमरावती, २५ हजार उर्वरित राज्य तर २५ हजार हेक्टर नागपूर जिल्ह्यात आहे. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात संत्रापट्ट्यातील बागायतदारांना तापमानातील वाढीच्या समस्येचा सामना करावा लागतो.
त्यावर उपाय म्हणून बागेतील तापमान नियंत्रणासाठी शेतकरी सिंचनाचा मार्ग अवलंबितात. बागेत ओलावा कायम ठेवत त्या माध्यमातून फळगळती नियंत्रणाचा उद्देश काही अंशी साधला जातो. परंतु वीज कंपनीकडून पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने अनेकदा सिंचनात अडचणीत निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यातच रात्री-अपरात्री वीजपुरवठा केला जातो. त्यामुळेदेखील ओलिताचे काम जिकरीचे ठरत असल्याचे सांगण्यात आले.
अचलपूर तालुक्याच्या काही भागांत पाण्याचा सातत्याने उपसा होत असल्याने पाणी पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. त्याच्या परिणामी सिंचनकामी पाणी उपलब्धतेचे आव्हान देखील अचलपूर तालुक्यातील संत्रापट्ट्यात आहे.
अशा स्थितीत संत्रा बागा जगविणे किंवा त्यांच्याकरिता पाण्याची सोय करण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून हतबल शेतकरी उभ्या संत्रा झाडांवर कुऱ्हाड चालवित आहेत. काही शेतकऱ्यांनी बागांसाठी पाण्याची सोय करणे आव्हानात्मक असल्याचे लक्षात येताच थेट जेसीबीच्या साहाय्याने बाग काढून टाकण्यावर भर दिला आहे.
तापमानातील वाढ, त्यामुळे होणारी फळगळती आणि ती रोखण्यासाठी सिंचनकामी पाण्याची उपलब्धता नसणे, अशा अनेक अडचणी आहेत. टॅंकर व इतर पर्यायांद्वारे पाणी उपलब्ध केले तरी हंगामात दर काय राहतील याबाबत साशंकता आहे. त्यामुळे पाच एकर क्षेत्रापैकी दोन एकरांतील झाडे काढून टाकली.- विलास श्रीखंडे, शेतकरी
बाजारात मिळणारा कमी दर आणि तुलनेत व्यवस्थापनावर होणारा अधिक खर्च अशा कारणांमुळे तोटा सहन करावा लागणार हे लक्षात आले. त्यामुळे वाढलेल्या नैराश्यापोटी दोन एकरांतील झाडे काढली आहेत.- गोपाळ पवार, शेतकरी
फळगळती नियंत्रणाबरोबरच बागा वाचविणे सध्या आव्हानात्मक आहे. बागेत ओलावा कायम राहिल्यास गळती रोखता येईल. परंतु सिंचनकामी संरक्षित स्रोतांमध्ये पाणीच नाही. अशा परिस्थितीत बागेच्या व्यवस्थापनावर केलेला खर्च वाया जाणार आहे. त्यामुळेच चार एकरांतील बाग काढून टाकली.- श्रीकांत चिमोटे, शेतकरी, काकडा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.