Ratnagiri News : पावसाचे सावट असल्यामुळे यंदा रत्नागिरीतील शेतकऱ्यांनी दिवाळीची पहिली आंघोळ केल्यानंतर थेट शिवार गाठले. सकाळच्या सत्रात भात कापणीची कामे आटपून दुपारनंतर सुकवलेले भात घरामध्ये नेण्याची धावपळ सुरू केली. दोन दिवसांपूर्वी पावसाने उघडीप घेतल्यामुळे बळीराजाने निःश्वास सोडला होता. मात्र बुधवारी अचानक पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या आनंदावर पाणी पडले.
दिवाळीला खऱ्या अर्थाने गुरुवारपासून सुरुवात झाली. सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहायला मिळत होते. नवे कपडे, फटाक्यांची आतषबाजी असे चित्र ठिकठिकाणी होते. मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरात पहाटेच्या सुमारास धावपळ सुरू होती, ती शेतामध्ये जाण्याची.
पहाटेला उठून दिवाळीची पहिली आंघोळ झाल्यानंतर लगेचच कुटुंबाबरोबर फराळाची चव चाखायला सुरुवात केली. मात्र ती चव जिभेवर विरघळण्यापूर्वीच शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती, ती शेतावर जाण्याची. भात कापणीसाठीची हत्यारांना धार काढून ती डोक्यावर कपडा आणि हातामध्ये पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन शेतावर धावणारा वर्गे सकाळच्या सत्रात पहायला मिळाला.
बुधवारी रत्नागिरी, राजापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे घालमेल अधिकच होती. पावसात भिजलेली रोपे पुन्हा कडकडीत उन्हात सुकवण्यासाठी ठेवावी लागणार होती. त्यामध्ये भाताच्या ओंब्या पडून जाणार नाहीत ना याची काळजी घेणारा शेतकरी शेतात राबत होता. सायंकाळच्या सुमारास पावसाची टांगती तलवार असल्यामुळे आहे त्या स्थितीत भात कापणी आटोपून घेण्यावर प्रत्येकाचा भर होता. यामध्येच दिवाळीचा पहिला दिवस सरला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.