Mumbai News : भातपिक हे प्रामुख्याने गरवे, निम गरवे व हळवे अशा स्वरूपात विभागले जात असून ऐन दिवाळीच्या तोंडावर त्याच्या कापणीला प्रारंभ करण्यात आला आहे. वरकस किंवा उखारु जमिनीवरचे हळवे भातकापणीला आले आहेत. मात्र परतीच्या पावसाने भातपीक आडवे होऊन मोठ्या प्रमाणात त्याचे नुकसान झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. मागील काही दिवसात एकूण तीन हजार मिमी इतका पाऊस कोसळल्याने भातकापणीसाठी शेतकरी धजावत नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.
मुरूड तालुक्यात ३९०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. यंदा ३८९० हेक्टर क्षेत्रात भात लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यंदा जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या असल्या तरी जुलैमध्ये हा अनुशेष भरून काढल्याने भातपिकास पोषक पर्जन्य मिळाले. परिणामी भातपीक जोमदार वाढल्याने बळीराजा आनंदात आहे.
भाताच्या विविध जाती विकसित होत असल्या तरी जया, चिंटू, सुवर्णा या वाणांचे उत्पादन जमिनीला पोषक असल्याने जुन्याच वाणांना शेतकरी पसंती देत आहेत. जया व चिंटू पीक तयार झाले असून काही भागात कापणीला प्रारंभ झाला आहे. सतत पाऊस कोसळत असला तरी यंदा कीडीचे प्रमाण फारसे नसल्याने विशेष नुकसान दिसत नाही. भातपीक तयार झाल्यानंतर परतीच्या पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याने पीक आडवे झाले आहे. उभ्या पिकापेक्षा जमिनीवर लोळलेल्या ओंब्या पक्षी अधिक फस्त करत असल्याने नुकसान होत आहे.
पीकविम्याचे निकष बदला
पंतप्रधान पीक योजनेच्या बाबतीत मात्र शेतकऱ्यांनी विशेष लक्ष न दिल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना आजमितीस रुपयाची ही भरपाई विमा कंपन्या देत नसल्याची तक्रार आहे.
मुरुड तालुक्यात केवळ ११७७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. चोला मंडळ जनरल इन्सुरन्स कंपनीने काढणी पश्चात भाताचे नुकसान झाल्यास विम्याचे संरक्षण देण्याचे जाहीर केल्याने या प्रकारात शेतकरी बसत नसल्याने कोकणात पीक विम्याचे निकष बदलले पाहिजेत, अशी मागणी किसान क्रांती राज्य संघटनचे उपाध्यक्ष श्रीधर जंजिरकर यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.