Satara News : वाठार स्टेशन, जि. सातारा : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन व भाडळे भागातील शेतशिवारामध्ये रब्बी हंगामामध्ये पिके बहरलेल्या अवस्थेत असताना शेतकऱ्यांना रानडुकरांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. शेतातील उभे ज्वारी पीक डुकरांचे टोळके आडवे करत असल्याचे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ग्रामसेवक व तलाठी यांनी पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला ही पाऊस झाल्याने जमिनीतील पुरेशा चांगल्या ओलीनंतर शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये गहू, हरभरा, ज्वारीची आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या पिके बहरलेल्या अवस्थेत असून, वसना आणि वंगणा नदीवरील बंधाऱ्यात पाणी असल्यामुळे भागामध्ये वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
यात उपद्रवी असणाऱ्या रानडुकरांची संख्या वाढली असून, शेतातील उभ्या पिकांना नष्ट करण्याचे काम सध्या ते करत आहेत. आधीच अस्मानी संकटांनी भरडला गेलेला शेतकरी निसर्ग निर्मित या संकटामुळे मेटाकुटीला आला आहे. तालुक्यातील चिलेवाडी येथील वसंत शेडगे यांनी यावर्षी त्यांच्या मालकीच्या चार एकर क्षेत्रावर रब्बीत ज्वारीची पेरणी केली आहे. या ज्वारीमध्येही रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. शेतामध्ये पिकांचे नुकसान केले असून, शेतकरी हतबल झाले आहेत. वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांमधून होत आहे.
तार कुंपणाद्वारे संरक्षण
दिवसा ही रानडुकरे उसात लपून राहतात. अनेक शेतकरी रानडुकरांपासून पिकाच्या बचावासाठी तारांतून विद्युत प्रवाह खेळता ठेवतात. यामुळे याचा शेतकऱ्यांनाही धोका होऊ शकतो. या रानडुकरांना हाकलून देण्यास प्रयत्न केला असता, ते अंगावर धावून येतात. गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी याबाबत वन विभागाकडे नुकसानीचे अर्ज दिले आहेत.
हातातोंडाशी आलेले पीक फस्त
वाठार स्टेशन परिसरातील जाधववाडी, फडतरवाडी, दाणेवाडी, विखळे, तसेच भाडळे खोऱ्यातील चिलेवाडी, नागेवाडी, हासेवाडी, ही गावे डोंगरालगत असल्याने निर्जन ठिकाणी डोंगरदऱ्यात असणारी रानडुकरे रात्रीच्या वेळी शेतात जाऊन हातातोंडाशी आलेले ज्वारीचे पीक फस्त करत आहेत. ही रानडुकरे ज्वारी खाण्यापेक्षा त्याची नासाडी मोठ्या प्रमाणात करत आहेत.
ज्वारी या पिकापासून शेतकऱ्यांना वर्षभर लागणारे धान्य, तसेच जनावरांचा चारा उपलब्ध होतो. मात्र, रानडुकरे ज्वारीची नासाडी करत असल्याने डोंगरालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांपुढे येणाऱ्या काळात चारा टंचाई भासणार आहे, तरी वन विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.