Kolhapur Farmers Damage : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांना वन्यजीव प्राण्यांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चंदगड, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात बिबट्या अनेकवेळा समोर आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तर चंदगड तालुक्यातील किटवडे जंगल परिसरात मंगळवारी (ता.३१) गस्त घालण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकाला सायंकाळी चार वाजता जंगलातून वाघाच्या डरकाळीचे आवाज ऐकू आले. त्यामुळे वन विभागाची एकच तारांबळ उडाली.
दरम्यान, चंदगड तालुक्यात दोन नव्हे तीन वाघ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात ३३ गव्यांच्या कळपाने शेती पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेकजण जंगलात पार्टी करण्यासाठी जातात. यामुळे जंगलात वणवे लागू शकतात. याला प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाने ठिकठिकाणी नजर ठेवली आहे. त्याचबरोबर गस्ती पथके तयार केली आहे. यापैकी एक पथक काल(ता.३१) किटवडे जंगल परिसरात गस्तीसाठी गेले होते. त्यांना किटवडे जंगलातील तळीच्या परिसरातून वाघाच्या डरकाळ्या ऐकू आल्या. त्यांनी घाबरून पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. महिनाभरात वाघांनी गवे, रानडुकरांचीही शिकार केली आहे. त्यामुळे आजऱ्याच्या जंगल परिसरात जंगलात तीन वाघ असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
सर्फनाला धरणामुळे पारपोली हे गाव विस्थापित झाले आहे. पण, तेथे असलेल्या ग्रामदैवतावर ग्रामस्थांची श्रद्धा आहे. दोन दिवसांपूर्वी महिला धार्मिक कार्यासाठी या परिसरात गेल्यावर त्यांना वाघाच्या डरकाळ्या ऐकू आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी या परिसरातून काढता पाय घेतला.
पन्हाळा शाहूवाडी तालुक्यात शेतकरी हतबल
गव्यांचा कळप शेतात ऊस व शाळू खाण्यासाठी येतो. शेतकरी पिकांची राखण करत आहेत. मात्र, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गव्यांनी दहा-बारा एकरांतील शाळू फस्त केला आहे. शाळू पिकाचे केवळ धाटच शिल्लक राहत आहे. या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
जोतिबा, पोहाळे परिसरात गव्यांसाठी पाण्याचे तलाव आहेत, तसेच पोहाळे भागात हिरवीगार ऊस, शाळू, मका शेती आहे. त्यामुळे गवे या परिसरातच वावरतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गव्यांनी ऊस, शाळू फस्त केला असून, शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. गव्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.